Chhatrapati Sambhajinagar : (म्हणे) ‘न्यायालयाचा निकाल येईपर्यंत न्यायालयीन कामकाजात ‘औरंगाबाद’चा ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख करण्याचा निर्णय मागे घ्या !’ – याचिकाकर्त्यांची मागणी
मुख्य याचिकाकर्त्यांची मागणी !
छत्रपती संभाजीनगर – ‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’ शहराचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या विरोधात सुनावणी चालू असतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे निबंधक पी.बी. घुगे यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे कामकाज ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हणून करण्याचा आदेश लागू केला. या निर्णयावर मुख्य याचिकाकर्ते महंमद हिशाम उस्मानी आणि संजय वाघमारे यांनी आक्षेप घेत ‘हे परिपत्रक मागे घ्या, अन्यथा मुख्य न्यायाधिशांकडे तक्रार करू’, अशी चेतावणी प्रशासनाला एका पत्राद्वारे दिली.
८ जानेवारी २०२४ या दिवशी सुनावणी !
कामकाजात ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ’धाराशिव’ असा उल्लेख करावा’, असे आदेशात म्हटले होते. ‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ या शहरांच्या नामांतराविषयी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी मुख्य न्यायाधिशांसमोर चालू आहे. याविषयीची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२४ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. या वेळी न्यायाधिशांसमोर वरिष्ठ परिषदेकडून युक्तीवाद केला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील नावेही पालटायला प्रारंभ !
या परिपत्रकाचा वापर करून प्रशासनाने सर्व ठिकाणी नाव पालटण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचाली वाढवल्या आहेत. यासमवेतच ‘उस्मानाबाद’ जिल्हा न्यायालयाचे नाव पालटून तिथे ‘धाराशिव’ असे नाव देण्यात आले आहे. प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गावरील नावेही पालटायला प्रारंभ केला आहे.