Offerings For RamMandir : अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी आतापर्यंत मिळाली ३ सहस्र ३०० कोटी रुपयांची देणगी !  

  • सूर्यकिरण प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर पडण्याची वेळ ‘रामतिलक महोत्सव’ म्हणून साजरी होणार !

  • ‘विदेशी अंशदान विनियमना’ची अडचण दूर, विदेशातूनही मिळणार निधी !

अयोध्या श्रीराममंदिर

नागपूर : श्रीरामनवमीच्या दिवशी मध्यान्हाला ‘सूर्याचे किरण प्रभु श्रीरामललाच्या कपाळावर पडावेत, अशा प्रकारचे तंत्र वापरावे’, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसार बालरूपातील ५१ इंचांची श्रीराममूर्ती सिद्ध करण्यात आली आहे. सूर्याचे किरण कपाळावर पडण्याची वेळ यापुढे ‘रामतिलक महोत्सव’ म्हणून साजरी केली जाईल. आतापर्यंत देशांतर्गत ३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या देणग्या श्रीराम मंदिरासाठी आल्या आहेत. त्यापैकी मंदिराच्या उभारणीवर १ सहस्र ४०० कोटी रुपये व्यय झाले आहेत. उर्वरित २ सहस्र ९०० कोटी रुपये शेष आहेत. विदेशातून एक रुपयाही देणगी आली नाही; कारण ट्रस्टला ‘विदेशी अंशदान विनियमन’ म्हणजेच ‘एफ्.सी.आर्.ए.’ कायद्यानुसार विदेशातून देणगी घेण्याची अनुमती नव्हती. आता ती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे विदेशातील श्रीराम भक्तांना देणगी देता येईल, अशी माहिती अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीच्या दिली. ‘दिव्य मराठी’चे संकेतस्थळवर ही मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. या वेळी पुढील प्रश्‍नोत्तरे झाली.

स्वामी गोविंददेवगिरी महाराज

प्रश्‍न : श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमागे २२ जानेवारी या दिवशीचा मुहूर्त निवडण्यामागे काय कारण आहे ?

स्वामी गोविंददेवगिरी महाराज : मकरसंक्रांतीपर्यंत धनुर्मास असतो. त्या काळात प्रतिष्ठापना करता येत नाही. यासाठी आम्ही संक्रांतीनंतरचा मुहूर्त शोधत होतो. २५ जानेवारी या दिवशी प्रयाग येथील माघ मेळावा चालू होतो. अयोध्येतील सर्व संत तिथे १ मास रहातात. त्यापूर्वीचा, म्हणजे १५ ते २५ जानेवारी यामधील चांगला मुहूर्त म्हणून २२ जानेवारी हा दिवस आम्ही निवडला आहे. देशातील ७ प्रख्यात ज्योतिर्विदांशी संपर्क केला. त्यांचे सर्वांचे एकमत होऊन २२ जानेवारी हा दिनांक निवडला आहे.

प्रश्‍न : श्रीराम मंदिराचे सूत्र आगामी निवडणुकीशीही जोडले जात आहे, याविषयी काय सांगाल ?

स्वामी गोविंददेवगिरी महाराज : लोक सवयीप्रमाणे विचार करतात. आम्हाला त्यात जायचे नाही. श्रीराममंदिर मुक्तीसाठी शतकानुशतके संघर्ष झाला आहे. ७० वर्षांहून अधिक काळ श्रीरामलला तंबूत राहिले आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला भव्य श्रीराममंदिर बांधायचे होते. ती संकल्पपूर्ती आता झाली आहे; मात्र याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

प्रश्‍न : तुम्हाला सर्वांत अल्प आणि सर्वाधिक देणगी किती अन् कुठून प्राप्त झाली ?

स्वामी गोविंददेवगिरी महाराज : आम्ही असा भेदभाव करणार नाही. प्रत्येक जण यथाशक्ती देणगी देत असतो. हा ओघ अजूनही चालूच आहे. १०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत देणगीची कमाल रक्कम आहे. ३०० कोटी रुपयांच्या वरही देणगी येत होती; पण आम्ही ती नाकारली. विशेष म्हणजे सर्व देणगी या ‘धनादेश आणि ‘डिमांड ड्राफ्ट’ने घेण्यात आल्या. काही भाविक सोने-चांदी, हिरे, माणके, जडजवाहीर, सोन्या-चांदीचे दागिने आणि विविध वस्त्रालंकारही देत आहेत. या सर्व वस्तू आणि रकमेची पावती दिली जाते. सर्व व्यवहार चोख आहेत.

प्रश्‍न : श्रीराममूर्ती नेमकी कशी असेल ?

स्वामी गोविंददेवगिरी महाराज : गर्भगृहात ५ वर्षांच्या आतील बालरामाची मूर्ती असेल. एकूण ३ मूर्ती सिद्ध केल्या जात आहेत. त्यांपैकी एकच विराजमान होईल. मूर्ती साकारतांना पाषाणात काही दोष असले, तर प्रश्‍न निर्माण होईल. यासाठी ३ मूर्तींचा पर्याय ठेवला आहे.