श्री दत्तगुरूंची तीर्थक्षेत्रे !
।। श्री क्षेत्र गाणगापूर ।। (गंधर्वपूर)
‘दत्त संप्रदायाची काशी’ म्हणून गाणगापूर तीर्थाचे महत्त्व आहे ! श्री नृसिंहसरस्वतींनी त्यांच्या ८० वर्षांच्या कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले, तर अत्यंत प्रिय अशा कृष्णा नदीस सोडून नृसिंहसरस्वती भीमा-अमरजा संगमावरील गाणगापूर या क्षेत्रावर २० वर्षे राहिले ! अखेरीस निजधामास जातांना पुनः ते श्रीशैल्य कर्दळीच्या वनात जाण्यासाठी कृष्णा तीरावर गेले. दत्त संप्रदायात गाणगापूर क्षेत्र म्हणजे सर्वस्व आहे. नरसोबाची वाडी आणि गाणगापूर ही २ स्थाने पंढरपूरसारखी आहेत. दत्तभक्त नित्य येथे येतात.
अत्यंत प्राचीन आणि पवित्र अशा गाणगापूर क्षेत्राचे महत्त्व वाढवावे, या परिसरातील तीर्थाची शुद्धता करावी, त्याचे पावित्र्य वाढवावे, तसेच या भागातील भक्तांना मुक्ती द्यावी, त्यांची पीडा हरण करावी, हा त्यांचा गाणगापूर क्षेत्री वास्तव्य करण्याचा हेतू होता. इतकेच नाही, तर नृसिंहसरस्वतींनी भक्तांना वचन दिले आहे, ‘आम्ही नित्य गाणगापुरी असणार आहोत. मठात आमचे वास्तव्य असेल. इष्ट भक्तांना आम्ही दर्शन देऊन त्यांच्या कामना पूर्ण करू.’ नृसिंहसरस्वती दुपारी भीमातटी भिक्षेसाठी येत असल्याने गाणगापूरला भिक्षेचे अत्यंत महत्त्व आहे. सर्व भक्त भिक्षा करीत असतात. गाणगापूर या तीर्थाचे आणखी एक विशेष म्हणजे पिशाच्च बाधा, मनोरुग्ण, समंध पीडा या परिसरात दत्तात्रेयाच्या सान्निध्यामुळे या ठिकाणी, अशा शक्ती येत नाहीत. पितृदोष, पिशाच्च दोष याचे निराकरण या ठिकाणी होते. नृसिंहसरस्वतींनी ‘गाणगापूर परिसरातच सर्व तीर्थे आहेत’, असे सांगून येथील तीर्थांची माहिती सांगितली.
१. ठारकूल तीर्थ
‘येथे भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमात ठारकूल हे तीर्थ आहे. या ठिकाणी भीमा नदी ही उत्तरवाहिनी आहे. भीमा, अमरजा या नद्या म्हणजे गंगा आणि यमुनाच आहेत. ‘या ठिकाणी स्नान केल्यास शतपटीने पुण्य प्राप्त होते’, असे सांगून नृसिंहसरस्वतींनी अमरजा नदीचे आख्यान भक्तांना सांगितले.
२. मनोरथ तीर्थ
वरील संगमाच्या पुढे अश्वत्थ वृक्षाच्या समोर ‘मनोरथ’तीर्थ आहे. मनोरथ म्हणजे कामनापूर्ती करणारे. या तीर्थामध्ये स्नान करणे, हे कामनापूर्ती करणारे आहे. हे काम्यक तीर्थ आहे. कल्पवृक्षासमान असे या तीर्थाचे फल आहे; कारण ‘अश्वत्थ’ हा कल्पवृक्ष या ठिकाणी आहे. गुरुचरित्रामध्ये अश्वत्थमहिमा सविस्तरपणे आला आहे. नृसिंहसरस्वती सदैव या ठिकाणी वास करून असतात. येथे गरुड, तसेच गिधाडे दृष्टीस पडतात.
३. संगमेश्वर
कल्पवृक्षाची पूजा करून आणि मनोहर तीर्थामध्ये स्नान करून संगमेश्वर या ठिकाणी येतात. येथे शिवमंदिर आहे. नंदीला नमस्कार करून या शिवाला प्रदक्षिणा करावी. ‘श्रीशैल्य पर्वतावरील ‘मल्लीकार्जुन’ समजूनयाची अर्चना केल्यास इंद्रपदाची प्राप्ती होते’, असे या याचे महत्त्व आहे.
४. वाराणसी तीर्थ
संगमेश्वरची पूजा करून १-२ कोस अंतरावर नागेशी गाव आहे. या ठिकाणी वाराणसी हे तीर्थ आहे. नृसिंहसरस्वती म्हणतात, ‘असे हे काशी तथा वाराणसी तीर्थ आहे. कोणताही संशय न धरता येथे स्नान करा आणि मुक्त व्हा.’
५. पापविनाशिनी तीर्थ
गाणगापूर क्षेत्रातील हे महत्त्वाचे तीर्थ आहे. नावाप्रमाणे या तीर्थात स्नान केले असता पापविनाश होतो. नृसिंहसरस्वतींची बहीण रानाई हीस त्यांनी या तीर्थामध्ये स्नान करण्यास सांगितले. त्यानंतर तिचे कुष्ठ दूर झाले.
६. कोटी तीर्थ
पर्वकाळी स्नान करावे, दानादी कार्य करावे, असे महत्त्व या तीर्थाचे महत्त्व आहे. कोटी गुणांनी दानाचे फळ प्राप्त होते, असे हे कोटी तीर्थ आहे.
७. रुद्रपाद तीर्थ
रुद्रपाद तीर्थाचे महत्त्व गया तीर्थाप्रमाणे आहे. पितृकर्म आदी विधी या ठिकाणी केल्यास कोटी गुणांनी लाभ होतो. कोटी जन्मांचे पाप नष्ट होते.
८. चक्र तीर्थ
या अतीविशेष तीर्थाजवळ केशवाचे सान्निध्य आहे. या ठिकाणी स्नान केल्याने ज्ञानवृद्धी होते. येथे अस्थिविसर्जन केले असता त्या चक्रांकित होतात. मृताला मोक्ष प्राप्त होतो. नृसिंहसरस्वतींनी सर्वांना या तीर्थात स्नान करण्यास सांगितले.
९. मन्मथ तीर्थ
पूर्वेकडे कल्लेश्वर महादेवाचे स्थान आहे. याचे महात्म्य गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राइतके आहे. मन्मथ तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे. त्याची पूजा करावी. प्रजावृद्धी आणि अष्ट ऐश्वर्याची प्राप्ती भक्ताला होते, असे हे पुण्यप्रद तीर्थ आहे.
।। श्री क्षेत्र नृसिंहवाडी ।। (नरसोबाची वाडी)
‘दत्त संप्रदायाची पंढरी’ म्हणून ज्याला म्हणतात, ते तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र नृसिंहवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून दंडकारण्यातील हे क्षेत्र अत्यंत पवित्र आहे. म्हणूनच नृसिंहसरस्वती यांनी या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या वास्तव्यामुळे ते ‘अविमुक्त’ असे काशीपूर, म्हणजे ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध झाले.
असे जे महान पुण्यक्षेत्र आहे. नृसिंहसरस्वती यांच्या वास्तव्याने पुनित झालेला येथील पंचगंगा संगम हा प्रयागासमान पवित्र संगम म्हणून याचा नावलौकिक आहे.
वाराणसीमध्ये पंचगंगायुक्त भागीरथी आहे, तर नृसिंहवाडीमध्ये पंचगंगायुक्त कृष्णा नदी आहे; म्हणून दक्षिण भागाची कृष्णा नदी, ही साक्षात् भागीरथी गंगा आहे. दत्तात्रेय देवता आणि कृष्णा नदी यांचा अन्योन्य असा संबंध आहे. कृष्णा नदी ही साक्षात् त्रैमूर्ती देवता जलस्वरूपात आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे कुरवपुरात १३ वर्षे वास्तव्य करून राहिले. ते कुरवपूर क्षेत्र कृष्णाकाठी आहे. नृसिंहसरस्वती या ठिकाणी रहात असल्याने पुढे या स्थानास ‘नृसिंहवाडी’ किंवा ‘नरसोबाची वाडी’, असे नाव पडले. पुढे अनेक सिद्ध योग्यांनी या स्थानावर तप केले, अशी ही तपोभूमी नृसिंहवाडी म्हणून प्रसिद्ध झाली.
दत्तात्रेयांचे निजस्थान म्हणून कृष्णा -पंचगंगा हा श्रीक्षेत्र वाडी येथील संगम आहे. स्वतः श्री नृसिंहसरस्वती म्हणतात, ‘‘आम्ही नित्य वास करून असतो, ती ठिकाणे म्हणजे औदुंबर, नृसिंहवाडी आणि गाणगापूर !’’ अन् या ठिकाणी त्यांचा नित्य आणि सदैव वास गुप्तरूपाने असतो, याची अनेकांनी प्रचीती घेतली आहे.
पुजारी जेरे यांच्या कुळाचा उद्धार !
नृसिंहसरस्वती येथे खरे तर येथील परंपरागत पुजारी जेरे कुळाचा उद्धार करण्यासाठी जणू आले होते ! श्रीपाद भट जेरे येथे अलासहून प्रतिदिन नृसिंहस्वामींच्या दर्शनास येत असत. श्रीपादशास्त्री जेरे यांचे पुत्र भैरवभट हे पुजारी म्हणून येथे होते. भैरवभट हे स्वतः वेदांती होते. पंचक्रोशीत त्यांना मान होता. ते पौरोहित्य करत होते. त्यांची पत्नी ही सुद्धा सुशील आणि पतिव्रता होती. पित्याकडून त्यांना वेद-शास्त्राचा वारसा मिळाला होता. अर्चक म्हणून ‘मनोहर’ पादुकापूजन त्यांच्याकडे आले.
नृसिंहसरस्वती भैरवभटांना म्हणाले, ‘‘एका शिळेवर पादुका प्रकट होतील. त्या पादुकांचे तुम्ही पिढ्यान्पिढ्या पूजन करावे. आम्ही गंधर्वनगरी म्हणजे गाणगापूर येथे जाणार आहोत; पण ‘मनोहर’ पादुकांच्या रूपाने आम्ही येथे नित्य वास करून राहू.’’ असे म्हणून नृसिंह सरस्वतींनी औदुंबर वृक्षाखाली काळ्या पाषाणावर कमंडलूतील पाणी कृष्णाजल प्रोक्षण केले. त्यावर स्वतःच्या बोटांनी ॐकार रेखाटला आणि मानवी पावलांच्या आकृत्या काढल्या. बघता बघता शुभचिन्हांसह पदयुगुल शीळेवर प्रकट झाले. नृसिंहसरस्वती म्हणाले, ‘‘आपण आणलेली शिधासामुग्री ही पादुकांजवळ ठेवा. जगदंबा अन्नपूर्णा अवतरणार आहे. तिचे पूजन करा.’’ अन्नपूर्णा प्रकट झाली. भैरवभट त्या ठिकाणी पर्णकुटी बांधून राहिले. त्यांना ६४ योगिनींनी दर्शन दिले. ‘‘काशीक्षेत्रात वास करणार्या या देवकन्या योगिनी कृष्णेच्या पूर्वतिरी वास करून आहेत’’, असे नृसिंह सरस्वती यांनी सांगितले. स्वतः अन्नपूर्णा माता नृसिंहसरस्वतींना भिक्षा देत असे. रामचंद्र योगिनींनी सुद्धा भैरवभटांची चौकशी केली. त्यांच्या भाग्याचे त्यांना कौतुक आणि आनंद वाटला. त्यांनी भैरवभटांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांच्या अवताराविषयी माहिती दिली. नृसिंहसरस्वतींनी स्वतः पूजाविधान सांगितले.
नृसिंहसरस्वतींनी हातात दंडकमंडलू घेतला. भैरवभटांनी महाराजांचे चरण घट्ट पकडून ठेवले. तेव्हा नृसिंहसरस्वती म्हणाले, ‘‘आम्ही येथेच आहोत.’’ ते पूर्वाभिमुख झाले. कृष्णा नदीजवळ आले. प्रवाह दुभंगला. फुलांचा दुतर्फा मार्ग निर्माण झाला. महाराज पुढे गेले आणि गुप्त झाले. त्यांनी त्यांचा प्रवास गाणगापूरच्या दिशेने चालू केला. प्रत्यक्ष नृसिंहसरस्वतींचा सहवास भैरवभटांना लाभला.
भैरवभटांना नरहरभट, जावणभट, श्रीपादभट आणि सखारामभट अशी चार अपत्ये झाली. यातूनच पुढे पुजारी वंश वाढला. आजपर्यंत हे वंशज महाराजांची सेवा करत आहेत. संपूर्ण कुळावर त्यांची कृपा आशीर्वाद आहे. ही जेरे मंडळी वेदविद आहेत.
प.प. टेंबेस्वामींनी नृसिंह सरस्वतींच्या पूजेची शिस्त लावून दिली. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत पूजा होते. प्रतिदिन पालखी असते. भजन, अभंग गायले जातात. मोठा प्रेक्षणीय असा हा कार्यक्रम असतो.’
– श्री. गणेश हरि कुलकर्णी, डोंबिवली, (साभार : ‘गुरुतत्त्व-एक मार्गदर्शक’, फेब्रुवारी २०२०)
।। श्री क्षेत्र औदुंबर ।।
‘वर्ष १४२६ मध्ये नृसिंहसरस्वती हे औदुंबर या क्षेत्रामध्ये भुवनेश्वरीच्या सान्निध्यात अाले. ‘क्षेत्र औदुंबर’ म्हणून या क्षेत्राचे नाव नंतर पडले. पूर्वी भिल्लवडी म्हणून हा परिसर ओळखला जात होता.
‘दत्तपादुकांवर चंदन लेपन करणे’, हे औदुंबर क्षेत्रातील दत्त पादुकांचे विशेष असे स्वरूप आहे. त्या शिवाय चैत्र मासामध्ये कृष्णाबाई उत्सव, श्रीपादश्रीवल्लभ आणि नृसिंहसरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती, असे अनेक कार्यक्रम असतात. नित्य आरती, पूजा, अन्नदान या गोष्टी असतात.
संत जनार्दनस्वामी आणि संत एकनाथ यांना या ठिकाणी दत्तदर्शन झाले होते. याच ठिकाणी नृसिंहसरस्वतींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला होता, ‘माझा नित्य वास या वृक्षामध्ये आहे. या वृक्षाची नित्य पूजा आणि वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण जो करेल, अशा भक्ताला निश्चितपणे अनुभूती येईल आणि शतगुणांनी फल प्राप्त होईल.’ अशा या औदुंबर क्षेत्राला ४ मास राहून, नृसिंहसरस्वती वारणासंगम या ठिकाणी आले. सांगलीजवळ हरीपूर या ठिकाणी वारणा तथा वारूणी नदी आणि कृष्णा नदीचा संगम आहे. संगमेश्वरला महादेवाचे स्थान आणि अश्वत्थ वृक्ष आहे. काही काळ वास्तव्य करून नृसिंहसरस्वती पुढे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे गेले. भुवनेश्वरी आणि दत्तात्रेय, यांचे पवित्र आणि सिद्ध असे हे स्थान तपोभूमी म्हणजे ‘क्षेत्र औंदुबर’ होय.
कृष्णा नदीच्या पात्रात पवित्र तीर्थे आहेत. प्रत्यक्ष भुवनेश्वरी माता, तसेच अनेक सिद्धांनी या ठिकाणी वास्तव्य करून तीर्थक्षेत्रे निर्माण केली आहेत.’
– श्री. गणेश हरि कुलकर्णी, डोंबिवली, (साभार : ‘गुरुतत्त्व-एक मार्गदर्शक’, फेब्रुवारी २०२०)
दत्तात्रेयांची अन्य तीर्थक्षेत्रे
१. माहूर (जि. नांदेड, महाराष्ट्र) २. गिरनार ( सौराष्ट्र, गुजरात) ३. कारंजा (महाराष्ट्र) ४. कुरवपूर, (कर्नाटक) ५. पीठापूर (आंध्रप्रदेश) ६. वाराणसी (उत्तरप्रदेश) ७. श्रीशैल्य (हैद्राबादजवळ, तेलंगणा) ८. भट्टगाव (भडगाव) (काठमांडू, नेपाळ) ३५ कि.मी. अंतरावर आहे. ९. पांचाळेश्वर : (जिल्हा बीड, महाराष्ट्र)