सनातन-निर्मित दत्तगुरूंच्या सात्त्विक चित्रात पालट करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१. सेवा करतांना सर्व प्रार्थना श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना होणे अन् प्रयत्न करूनही दत्तगुरूंविषयी भावजागृती न झाल्याने खंत वाटणे
‘२८.११.२०१४ या दिवशी छपाईच्या दृष्टीने सनातन-निर्मित दत्तगुरूंच्या सात्त्विक चित्रात काही पालट करायचे होते. या सेवेत प.पू. डॉक्टरांचे अमूल्य मार्गदर्शन मिळत होते. ही सेवा करत असतांना माझ्या मनात सतत ‘प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे चित्र व्हायला पाहिजे’, असा विचार होता; पण प्रयत्न करूनही दत्तगुरूंविषयी भावजागृती होत नव्हती. त्याची मनाला खंतही वाटत होती, तरीही सर्व प्रार्थना श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांनाच होत होत्या.
२. दत्तगुरूंचे दर्शन झाल्यावर कृतज्ञताभाव दाटून येणे आणि त्यांच्या आशीर्वाद देणार्या हातातून पिवळ्या रंगाचा झोत स्वतःकडे येतांना दिसणे
चित्रातील मुख्य सुधारणा पूर्ण झाल्यावर मी प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटून हात जोडले. तेव्हा सूक्ष्मातून मला पुष्कळ प्रकाश दिसू लागला आणि त्या प्रकाशात साक्षात् दत्तगुरूंचे दर्शन झाले. संपूर्ण दृश्य पुष्कळ मोहक होते आणि मला ‘हे घडत आहे’, यावर विश्वासच बसत नव्हता. दत्तगुरूंचे दर्शन झाल्यावर आपोआप कृतज्ञताभाव दाटून आला. त्यांच्या आशीर्वाद देणार्या हातातून पिवळ्या रंगाचा झोत माझ्याकडे येतांना दिसला.
३. पूर्वजांच्या त्रासातून मुक्त केल्याचे दत्तगुरूंनी सांगितल्यावर भरून येणे, दत्तगुरूंना प्रार्थना केलेली नसतांनाही त्यांनी सेवेची संधी दिल्याविषयी कृतज्ञता वाटणे
दत्तगुरु स्मित करून मला उद्देशून म्हणाले, ‘मी तुला आता पूर्वजांच्या त्रासातून मुक्त करतो. त्याचे दायित्व माझ्यावर राहील. तू काळजी करू नकोस.’ एवढे बोलून दत्तगुरु अदृश्य झाले आणि मला पुष्कळ भरून आले. ‘मी त्यांना एकही प्रार्थना केली नसतांना त्यांनी माझ्यासाठी एवढे केले. माझी जराही पात्रता नसतांना प.पू. डॉक्टरांनी मला सेवेची संधी दिली आणि साक्षात् दत्तगुरूंनी मला दर्शन दिले’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
– सौ. आरती पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०१४)
४. वरील अनुभूतीला पूरक अशी दुसर्या साधिकेला आलेली अनुभूती (सहसाधिकेला त्रास असल्याने सेवेच्या माध्यमातून तिच्यावर उपाय होणार असल्याचे वाटून आनंद होणे आणि सेवेच्या माध्यमातून सहसाधिकेला होणारे पूर्वजांचे त्रास दूर होत असल्याचे दत्तगुरूंनी सांगणे !
‘चित्रात शेवटच्या टप्प्यातील काही पालट करत असतांना मी दत्तगुरूंशी सूक्ष्मातून आपोआप बोलू लागले. त्या वेळी ‘ही सेवा सौ. आरती यांना मिळाल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला; कारण त्यांना त्रास आहे आणि या सेवेतून त्यांना देवतेचे चैतन्य मिळेल’, तेव्हा दत्तगुरूंनी सांगितले, ‘या सेवेच्या माध्यमातून सौ. आरती यांच्यावर मी आध्यात्मिक उपाय करत आहे आणि तिला त्यातून चैतन्य मिळून तिचे पूर्वजांचे त्रास दूर होत आहेत.’ हे ऐकून ‘देवाचे प्रत्येकावर किती लक्ष आहे आणि प्रत्येक साधकाला आवश्यक ते देव देतोच’, हे अनुभवता आले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०१४)
(साधिकांच्या उत्कट भावामुळे त्यांना श्रीदत्तगुरूंविषयी वरील अनुभूती आल्या.)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |