ठाणेकरांचे श्रद्धास्थान – श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर !
ठाणे – ठाणे हे जसे तलावांप्रमाणे मंदिरांचे शहरही आहे. ठाण्यात जी काही प्रसिद्ध आणि जुनी मंदिरे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे दमाणी इस्टेट या भागातील श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर आहे. श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर हे ११० वर्षे जुने आहे. मोठ्या प्रमाणात भाविक येथे भेट देतात. दत्त जयंतीनिमित्त येथे पूजा, हवन, अन्नदान असा मोठा कार्यक्रम असतो. या मंदिरात सर्व सण उत्साहात साजरे होतात. त्यामुळे श्री विठ्ठल सायन्ना मंदिर हे ठाणेकरांचे श्रद्धास्थान आहे. कै. विठ्ठल सायन्ना यादव यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक नंद महाराज यांच्या सांगण्यानुसार वर्ष १९१२ मध्ये त्यांनी या मंदिराची उभारणी केली. शिर्डीचे साईबाबा, प.पू. कलावतीदेवी, राष्ट्रसंत तुकोडी महाराज, गाडगे महाराज आदी संतांनी भेटी दिल्या, तसेच बालगंधर्व, सवाई गंधर्व आदी कलाकारांचे कार्यक्रम येथे होत असल्याने ते एक तत्कालीन आध्यात्मिक आणि कलेचे क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. वर्ष १९८६ मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. हे मंदिर इतके शांत आणि सात्त्विक आहे की तिथे बसून शांतपणे नामजप करू शकतो. गेली अनेक वर्षे येथील मंदिरामध्ये दत्तजयंतीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात येते. अनेक वर्षे येथे प्रतिसप्ताह सनातन संस्थेच्या वतीने सत्संग घेण्यात येत असे. हे मंदिर बांधल्यापासून यादव यांची पाचवी पिढी मंदिराच्या परिसरात राहून या मंदिराची देखभाल करत आहे.
कै. विठ्ठल सायन्ना यांचा परिचय !या मंदिराचे बांधकाम मुंबईतील ब्रिटीश काळातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि नेहमी गरिबांना साहाय्य करणारे दानशूर अन् कनवाळू कै. विठ्ठल सायन्ना यादव यांनी केले आहे. कै. विठ्ठल सायन्ना यांनी त्या काळात मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर मध्ये ब्रिटिशांच्या अनेक वास्तू बांधल्या. मुंबईतील पोस्ट ऑफीस, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, लघु वाद न्यायालय, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एल्फिन्स्टन टेक्निकल स्कूल, ठाणे-कळवा पूल, इत्यादी प्रसिद्ध वास्तूंची बांधकामे विठ्ठल सायन्ना यांनी केली आहेत. त्यांनी अन्नछत्र उभारले होते. पुण्यातील भावे शाळेची पुनर्निर्मिती स्वखर्चाने केली. |