सानपाडा (वाशी) येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन !
नवी मुंबई – ठाणे-बेलापूर पट्टीतील सर्वांत पुरातन म्हणून ओळखल्या जाणार्या सानपाडा येथील श्री दत्त मंदिरात भव्य दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ सानपाडा आयोजित श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने २२ डिसेंबरपासून कीर्तन, प्रवचन सप्ताह होत आहे. पहाटे काकड आरती, नंतर श्री. दगडू वास्कर हे श्री गुरुचरित्र पारायण करत आहेत. सायंकाळी हरिपाठ, आरती आणि रात्री सुश्राव्य कीर्तन सादर केले जात आहे. २६ डिसेंबर या दिवशी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहाटे सुवर्ण पादुकांवर अभिषेक, श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत विविध भजनी मंडळे भजने सादर करणार आहेत. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत ह.भ.प. एकनाथ महाराज सागोळकर हे श्री दत्तजन्माचे कीर्तन सादर करणार आहेत. कु. लतिका ठाकूर आणि सौ. नितिशा वास्कर या श्री दत्तजन्माचा पाळणा म्हणणार आहेत. रात्री ७ नंतर महाप्रसाद वितरण करण्यात येणार असून रात्री ७.३० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तुर्भे आणि वाशी येथे दत्तजयंती सोहळा !
वाहतूक पोलिसांच्या तुर्भे शाखेच्या वतीने दत्तजयंती सोहळा आणि सत्यनारायणपूजा, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशी येथील श्री दत्तगुरुनगरमधील श्री दत्तगुरु धर्मदाय ट्रस्टच्या वतीने दत्तजयंती निमित्त २० ते २७ डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. यामध्ये प्रवचनकार ह.भ.प. महेश महाराज बाळसराफ असून किर्तन ह.भ.प. १००८ महंत आचार्य स्वामी राज राजेश्वरानंद यतिजी (शास्त्री), ह.भ.प. बाळासाहेब महाराज शिंदे, ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार, ह.भ.प. प्रियांकाताई महाराज साखरे आदी सुश्राव्य कीर्तन सादर करणार आहेत.