वीर सावरकर यांच्यावरील आरोप दाखल्यानिशी खोडून काढा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
रत्नागिरीत ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी – भारताला स्वातंत्र्य कुणामुळे मिळाले, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांना एका पत्रकाराने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विचारले तेव्हा सावरकर म्हणाले की, सशस्त्र क्रांतीकारक, अहिंसक आंदोलन करणारे आणि सर्वसामान्य माणसांनी देवपूजा करतांना स्वातंत्र्य मिळण्याकरता प्रार्थना केली त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सशस्त्र क्रांतीकारकांना न्यून लेखण्यात आले. त्यामुळे त्यांना न्यून लेखू नका. वारंवार खोटे आरोप केले म्हणून सत्य लपत नाही. अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन टीकाकारांचे म्हणणे खोडले पाहिजे, तरच नव्या पिढीला या क्रांतीकारकांची माहिती मिळेल, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
येथील गोगटे -जोगळेकर महाविद्यालयात ‘२४ डिसेंबर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मृत्युंजय दिना’निमित्त मुंबई तरुण भारत प्रकाशित ‘निवडक कालजयी सावरकर’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, पतितपावन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष अधिवक्ता बाबा परुळेकर, विशेष अतिथी भाजपचे माजी आमदार बाळ माने आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सच्चिदानंद शेवडे पुढे म्हणाले की, गडकिल्ल्यांवर ‘टाईमपास’ म्हणून जाऊ नका, ‘डिजे’ लावू नका, हुल्लडबाजी करून दारू पिऊ नका. या किल्ल्यावरची माती स्वत:च्या कपाळावर लावा. रक्तरंजित अंदमानला तुम्ही एकदा तरी भेट द्या. अंदमानात तुम्हाला किंकाळ्या ऐकू येतील. त्या भावनेने पहा. वीर सावरकरांवर वाट्टेल ते बडबडायचे. या आरोपांना उत्तर दिले की, दुसरा आरोप, मग तिसरा आरोप केला जातो. मराठी माणूस मराठी माणसाबद्दलच असे बोलतो, यापेक्षा वाईट काय असावे? परंतु सावरकर यांनी विदेशी कपड्यांची होळी केली. अंदमानात काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगली. सावरकर हे गीतकार, बॅरिस्टर, नाटककार होते. सावरकर कालजयी होते. ते पन्नास वर्षे पुढचा विचार मांडायचे. आज त्याची प्रचीती येत आहे.
विशेष सत्कार
याप्रसंगी सुमती अर्हम मंडळाचे विक्रम जैन, वाल्मीकि मंडळाचे अमर राठोड, सावरकर वक्तृत्व स्पर्धेची विजेती कश्ती शेख आणि मुक्या प्राण्यांवर उपचार करणार्या शुभांगी वारेकर यांना या वेळी आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी आणि अंदमान कारागृहे ही तीर्थक्षेत्रेच ! – अधिवक्ता बाबा परुळेकर
वीर सावरकर रत्नागिरीमध्ये साडेतेरा वर्षे वास्तव्यास होते. त्यांनी सामाजिक सेवेचे क्रांतीपर्व उभे केले. यातील कार्यक्रमांची शताब्दी साजरी करण्याचे भाग्य फक्त रत्नागिरीकरांनाच मिळणार आहे. अंदमानातून कैद भोगून आलेला माणूस येथे क्रांती घडवतो. विशेष कारागृह हे तीर्थक्षेत्र आहे आणि दुसरे तीर्थक्षेत्र अंदमान आहे. या दोन्ही ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे.
रत्नागिरीकरांचे नेहमीच सहकार्य ! – माजी आमदार बाळ माने
वीर सावरकर आणि रत्नागिरीकर यांचे अजरामर नाते आहे. नव्या पिढीला वीर सावरकर समजले पाहिजेत याकरता विविध माध्यमांतून कालजयी सावरकर पोचवले पाहिजे. त्यासाठी आयोजित कार्यक्रमांना रत्नागिरीकर म्हणून नेहमी सहकार्य करत राहू. राष्ट्र प्रथम या भावनेने विचारांची बांधीलकी घेऊन काम केले पाहिजे.