हिंदु राष्ट्र असलेला भारत विश्वगुरु बनेल ! – अविनाश धर्माधिकारी
|
जळगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु असणे म्हणजे काय ? तर ‘नमस्ते’ आणि ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु…..’ हे दोन प्रार्थनारूपी मंत्र हिंदु धर्मातील समानता व्यक्त करतात. जगातील सर्वांत प्राचीन धर्माची शाश्वत संस्कृती सांगणारी ही सूत्रे आहेत; परंतु हिंदूंना पराभवाचा विकृत इतिहास सांगितला जातो. सर्वांनी ‘हिंदु संस्कृती’ समजून घेणे, हिंदु आचरण करणे प्रारंभ केले, तर सनातन हिंदु राष्ट्र असलेला भारत विश्वगुरु बनेल, असे प्रतिप्रादन माजी प्रशासकीय अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ डिसेंबर या दिवशी शहरातील शिवतीर्थ मैदानात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी कृतीप्रवण होण्याचा निर्धार केला. जळगाव जिल्ह्यातील हिंदूंवरील विविध आघातांना वाचा फोडण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्णठरली ! सभेला सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी त्यांच्या जाज्वल्यपूर्ण भाषणांतून उपस्थित हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचे बीज रोवले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते.
अशी पार पडली सभा !
१. प्रारंभी श्री. नीलेश तांबट यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.
२. वेदमूर्ती पुरुषोत्तम शुक्ल, श्रीराम जोशी, गजानन फडे, लोकेश जोशी आणि प्रवीण जोशी यांनी वेदमंत्रपठण केले.
३. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडला.
४. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले.
५. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सनातनने प्रकाशित केलेल्या ‘आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांची ओजस्वी भाषणे !
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हत्या प्रकरणांत विनाकारण गोवल्या गेलेल्या सनातन संस्थेला न्याय मिळून साधक निर्दाेष मुक्त होतील ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समाजात जे कुणी सनातन धर्मरक्षणाचे कार्य करतात, त्यांना ‘भगवे आतंकवादी’ असे संबोधून हिंदूंना दडपण्याचे कारस्थान चालू आहे. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या. पुरोगामी आणि साम्यवादी यांनी विनाकारण सनातन संस्थेला दोषी ठरवले; पण यात संस्थेचा काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी सनातनच्या ७०० निष्पाप साधकांची चौकशी करून त्यांना त्रास दिला. डॉ. दाभोलकर हिंदूंच्या धर्मश्रद्धांना ‘अंधश्रद्धा’ म्हणत होते. त्यांनी कायद्याचे उल्लंघन करून विदेशातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या. त्यांच्या न्यासात प्रचंड आर्थिक घोटाळे झाले आहेत. नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनांच्या सूचीमध्येही त्यांच्या संघटनेचे नाव होते; परंतु त्यांचे अन्वेषण न करता केवळ सनातनला लक्ष्य करण्यात आले. तोच प्रकार कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी झाला. या हत्यांच्या प्रकरणी सनातनला दोषी ठरवण्यात आले, तरी न्यायदेवता आणि ईश्वर यांच्यावर आमची श्रद्धा आहे. संतांचे सनातनला आशीर्वाद आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळून आमचे साधक निर्दाेषमुक्त होतील.
जळगाव जिल्ह्यातील वक्फ बोर्डाने बळकावलेल्या भूमी परत मिळवण्यासाठी संघर्ष करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
शिवछत्रपतींच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने या भूमीने रामराज्य, मौर्य शासन, विजयनगरचे साम्राज्य, हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आता श्रीराममंदिराची स्थापना झाल्यावर रामराज्यही पहाणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारने ज्या पद्धतीने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातली, त्यापद्धतीने आता छत्तीसगड शासन कृती करणार आहे. महाराष्ट्र शासनानेही हा निर्णय घ्यावा. वक्फ बोर्डाने देशातील अनेक जागा बळकावल्या आहेत. सावदा एरंडोलचा पांडववाडा, पारोळा येथील भोई समाजाची स्मशानभूमी आणि कानळदा येथील ९ एकर शेतभूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या भूमी परत मिळवण्यासाठी हिंदूंनी कायदेशीर संघर्ष करावा. श्रीराममंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आता रामराज्यासाठी वानरसेना बनून कार्यास प्रारंभ करूया. अर्जुन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे शारीरिक सामर्थ्यासमवेत आध्यात्मिक बळ वाढवून हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होऊया. यासाठी शक्तीची उपासना करूया. ‘श्रीराम मंदिर तो झाँकी है, अभी मथुरा-काशी बाकी है ।’ देशभरातील ४ लाख ५० सहस्र मंदिरांना मुक्त करण्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदु स्त्रियांची सुटका करण्याची चळवळ श्रीराममंदिरातून उभी रहावी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
मी येथे शौर्यजागृतीपर असे काही न बोलता हिंदु समाजाला त्यांच्या जखमा दाखवायला आलो आहे. आपण केवळ ५ वर्षांतून एकदा मत द्यायचे, असे नसून आपल्यालाही आता लढायचे आहे. या लढाया कुठल्या ? तेही लक्षात घ्यायला हवे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठापना होईल. अर्थात् श्रीराममंदिर हा ‘टुरिझम स्पॉट’ (पर्यटन क्षेत्र) नाही. रावणाचा वध करणारा श्रीराम ही रामाची ओळख आहे. प्रश्न हाच आहे की, आज भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदु स्त्रिया पळवून नेल्या जात असतील, तर आपल्याला श्रीराममंदिरातून काय हवे ? रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीलंकेत जाऊन सीतेला परत घेऊन येणार्या हनुमानाला श्रीरामाने त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. याप्रमाणे आपल्याला असा हनुमान बनायला हवे, अशी वानरसेना बनली पाहिजे की, जी आवश्यकता भासली, तर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे घुसून हिंदु स्त्रियांची सुटका करील. ‘हिंदु स्त्रिया म्हणजे तुमची मालमत्ता नाही’, असे त्या देशांतील शत्रूला ठणकावून सांगेल. मंदिरातून असे संस्कार व्हायला हवेत. ‘श्रीराममंदिरातून ती चळवळ उभी रहावी’, अशी आमची इच्छा आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
१. श्री. सुनील घनवट यांनी केलेल्या आवाहनानंतर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदा लागू करावा, गोहत्या बंद व्हावी, संपूर्ण भारतात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि देशाला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र घोषित करावे, या मागण्यांसाठी हिंदूंनी भ्रमणभाषच्या विजेरीचा (‘टॉर्च’चा) प्रकाश दाखवून उत्स्फूर्तपणे अनुमोदन दिले.
२. सभास्थळाच्या परिसरात सर्वच हिंदूंमधील हिंदुत्व जागृत झाल्याने वीरश्री निर्माण झाल्याचे जाणवत होते.
३. शहराच्या विविध भागांतून धर्माभिमानी ढोल-ताशांच्या गजरात सभास्थळी पोचले.
४. जळगावचे भाजपचे आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे यांनी अधिकाअधिक हिंदूंनी सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले होते.
ग्रामबैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद !
सभेचे निमंत्रण गावागावांत देण्यासाठी शहरालगतच्या शिरसोली, पाळधी, लाडली, नाचणखेडा, पहूर, कानळदा, नांद्रा, आवार, धामणगाव, मन्यारखेडा, जाडगाव, बामणोद, साक्री, भुसावळ, झिपरूआण्णानगर (नशिराबाद), पाडळसे, बेळी, बोरनार, मोहाडी, दापोरा, ममुराबाद, साकळी, धानोरा, पिंप्राळा, एकलग्न, आव्हाणे, चमगाव, वराड, रिंगणगाव, पिंपरी, डोणगाव, खर्ची, पथराड, शेरी, भोद, हिंगोली, पिंपळकोठा, चिंचपुरा, निमखेडी, बाभूळगाव, वैजनाथ, सातखेडा, वंजारी, म्हसावद, हनुमानखेडा, टाकळी, टाकरखेडा, पिंपळेसिम, बांभोरी, खेडी, मुसळी आदी गावांमध्ये ग्रामबैठका घेण्यात आल्या. या बैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सभास्थळी लक्षवेधी बालकक्ष !
सभेच्या प्रवेशद्वाराजवळ क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्यासाठी बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता. बालचमू हे क्रांतीकारक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून घोषणा देत होते.
सभेला उपस्थित प्रतिष्ठित : महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. ललित चौधरी, ओंकारेश्वर देवस्थानचे श्री. दीपक जोशी, नगरसेवक श्री. कैलास आप्पा सोनवणे
सभेला उपस्थित संत आणि महंत : श्रीराम मंदिर देवस्थानचे श्री. राम जोशी, ह.भ.प. मुकुंद धर्माधिकारी, श्री स्वामी नारायण मंदिराचे स्वामी नयन प्रकाशदासजी महाराज, भारताचार्य ह.भ.प. शामजी महाराज राठोड, इस्कॉन मंदिराचे चैतन्यदासजी महाराज, ब्रह्मपूर येथील गणपति मंदिराचे श्री. बाल्या महाराज
सहभागी हिंदुत्वनिष्ठ आणि धार्मिक संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, धर्मरथ फाऊंडेशन, रौद्र शंभू फाऊंडेशन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ