व्यापार्याने ‘कचरा टाकू नये’, या फलकासमवेत देवतांच्या चित्रांचा फलक लावला !
राजू यादव यांनी जाब विचारून फलक काढण्यास भाग पाडले !
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – गांधीनगर येथे एका व्यापार्याने त्याच्या खासगी जागेमध्ये ‘कचरा टाकू नये’, अशा फलकासमवेत देवतांच्या चित्राचा फलक लावला होता. या फलकामुळे देवतांचा अवमान होत असल्याचे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी तात्काळ तेथे जाऊन त्या व्यापार्याला जाब विचारला. या प्रसंगी गांधीनगर ग्रामपंचायतीमधील सदस्यांना घटनास्थळी बोलवून याविषयी विचारणा केली असता त्यांनी अशी कोणतीही अनुमती दिली नसल्याचे सांगितले. यानंतर श्री. राजू यादव यांनी सदरच्या व्यापार्यास देवतांच्या प्रतिमा असलेले फलक काढण्यास भाग पाडले. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने, तसेच धर्माभिमान नसल्याने ‘कचरा टाकू नये’, अशा फलकासमवेत ते देवतांच्या चित्रांचा फलक लावतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षण किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! – संपादक)
या प्रसंगी श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘पोलीस प्रशासनाने अशाप्रकारे कुणी देवतांची विटंबना करत असेल, तर कडक कारवाई करावी. देवतांच्या प्रतिमा लावून अशा प्रकारे विटंबना सहन केली जाणार नाही. यापुढे अशी घटना झाल्यास ‘सेना पद्धतीने उत्तर देण्यात येईल.’’ या वेळी त्या व्यापार्याने याविषयी क्षमा मागून ‘परत अशी घटना घडणार नाही’, असे सांगितले. या प्रसंगी वळीवडेचे ग्रामपंचायत सदस्य श्री. वैजुनाथ गुरव उपस्थित होते. (देवतांचे विडंबन रोखण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणारे श्री. राजू यादव यांचा आदर्श इतर हिंदूंनी घ्यावा ! – संपादक)