पुणे जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका !
पुणे – भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्या अन्वये जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे. सर्वेक्षणानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ४४ गावांमध्ये संरक्षणात्मक कामे, उपाययोजना अंतर्गत ६८ कोटी १७ लाख रुपयांचा अहवाल सिद्ध केला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तींचे सौम्यीकरण करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाद्वारे निधी संमत केला आहे. त्या दृष्टीने विविध आपत्तीमुळे होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी उपाययोजना अंतर्गत व्यवस्थापन आराखडा सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २३ गावे दरड प्रवण आहेत. पीडब्ल्यूडीने ४४ गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरक्षात्मक आणि संरक्षणात्मक कामांची प्रत्यक्ष पहाणी करून संरक्षण भिंत बांधणे, पाण्याचा प्रवाह काढणे, झाडे लावणे किंवा तात्पुरत्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे अशी अनेक कामे करणे आवश्यक आहे.