श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली दैवी सूत्रे आणि त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘सनातनच्या साधकांचे भाग्य थोर म्हणून त्यांना प्रत्यक्ष श्रीविष्णूचा अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्री महालक्ष्मीचा अवतार असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे गुरुरूपात लाभले आहेत. साधकांना त्यांचे सगुण रूपात दर्शन आणि मार्गदर्शन मिळत आहे. आपण आतापर्यंत त्यांच्या अनेक गुणांचे वर्णन दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वाचले आहे. त्यांच्या अस्तित्वाने, दर्शनाने, त्यांच्याशी बोलल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे साधकांमध्ये आमूलाग्र पालट घडत आहेत.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात आलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने येथे मांडत आहे. २४.१२.२०२३ या दिवशीच्या अंकात यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/748016.html
५. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलल्यावर वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटणे आणि आनंद मिळून मन स्थिर अन् शांत होणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा स्वभाव पुष्कळ बोलका आहे. आताही त्या कधी भेटल्या किंवा त्यांचा भ्रमणभाषवर संपर्क झाला की, त्या त्यांना दौर्यामध्ये येत असलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना भरभरून सांगत असतात. त्यांच्या आवाजात पुष्कळ गोडवा आणि चैतन्य आहे. त्यांच्याशी बोलून झाल्यावर मला एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते. त्या वेळी मला पुष्कळ आनंद मिळतो आणि माझे मन स्थिर अन् शांत होते.
६. अवतारी तत्त्व आणि चैतन्यमय वाणी यांमुळे भारतभरातील महत्त्वाच्या मंदिरांतील पुजारी अन् विश्वस्त यांना सनातनशी जोडून ठेवणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सप्तर्षींच्या आज्ञेने भारतभरातील अनेक मंदिरांना भेट देतात आणि सनातनच्या कार्यासाठी तेथील देवतांचे आशीर्वाद घेतात. त्या जेथे जातात, तेथे सर्वांना आपलेसे करून टाकतात. वर्ष २०२२ मध्ये आम्ही कुटुंबीय तिरुपति येथे श्री बालाजीच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा आम्ही तेथील वराहस्वामींच्या जागृत मंदिरात गेलो होतो. त्या वेळी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) यांनी तेथील पुजार्यांना आम्ही येत असल्याचे कळवले होते. आम्ही तेथे गेल्यावर ‘तेथील मुख्य पुजारी मंदिराच्या बाहेर येऊन आम्हाला शोधत होते’, असे आमच्या लक्षात आले. आमच्यासाठी हे आश्चर्यकारकच होते. त्या देवस्थानच्या माहात्म्यामुळे तेथे पुष्कळ गर्दी असते. त्यामुळे कुणीही पुजारी आपल्याला सहज भेटू शकत नाहीत आणि भेटले, तरी ओळखणे अवघड आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील अवतारी तत्त्व आणि त्यांची चैतन्यमय वाणी यांमुळे अशा महत्त्वाच्या व्यक्ती सनातनशी सहज जोडल्या जातात. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भारतभरातील अनेक महत्त्वाच्या मंदिरांतील पुजारी आणि विश्वस्त यांना सनातनशी जोडून ठेवले आहे.
७. संत आणि साधक यांच्यावरील प्रीती !
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ कधी देवद आश्रमात आल्या, तर त्या सर्व संतांना एकत्र भेटतात आणि त्यांना दौर्यातील दैवी अनुभव सांगतात.
त्या दौर्यावर असतांना त्यांना सात्त्विक रंग आणि नक्षीकाम असलेल्या साड्या, पंजाबी पोषाख अथवा साधिकांसाठी उपयुक्त अन्य काही वस्तू दिसल्यास, तसेच पुरुष साधकांसाठीही सदर्याचे कापड, धोतर किंवा अन्य उपयुक्त साहित्य मिळाल्यास त्या आश्रमात पाठवतात. त्यामुळे आश्रमातील साधकांचा पेठेत जाण्या-येण्याचा वेळ वाचतो आणि त्यांना सात्त्विक कपडे सहज उपलब्ध होतात.
८. कैलास मानसरोवर येथे गेल्यावर भ्रमणभाषवरून दिव्य कैलास पर्वताचे दर्शन घडवणे
त्या कैलास पर्वत आणि मानसरोवर येथे गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणाहून मला भ्रमणभाषवरून कैलास पर्वत आणि तो परिसर दाखवला. इतरांविषयी एवढा विचार केवळ देवीच करू शकते ! ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला दिव्य कैलास पर्वताचे दर्शन घडवले’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
९. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ करत असलेले दैवी कार्य !
९ अ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महर्षींच्या आज्ञेने भारतभरातील अनेक देवस्थानांना भेटी देऊन तेथे पूजा, यज्ञ इत्यादी करणे : ‘सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती व्हावी, गुरुकार्यातील अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना होणारे त्रास दूर व्हावेत अन् त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे’, यासाठी त्यांनी महर्षींच्या आज्ञेने भारतभरातील अनेक जागृत आणि दुर्गम ठिकाणी असणार्या देवस्थानांना भेटी दिल्या. तेथे त्यांनी पूजा, यज्ञ आणि अनेक धार्मिक विधी अन् प्रार्थना केल्या. अजूनही त्यांचे हे कार्य चालूच आहे. त्यांचे हे समष्टी कार्य समजून घेणे आमच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे.
९ आ. विश्वातील अद्वितीय आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ भारतभर भ्रमण करतात. त्यांचा हा दैवी दौरा खडतर आहे. या दौर्यात असतांना त्या आध्यात्मिकदृष्ट्या अनेक मौल्यवान वस्तू गोळा करून आश्रमात पाठवत असतात.
१. विविध संतांची हस्ताक्षरे (यांत समर्थ रामदासस्वामींचेही हस्ताक्षर आहे.)
२. विविध संतांनी वापरलेल्या चैतन्यमय वस्तू, उदा. पलंग, गाद्या, त्यांच्या वापरातील कपडे, भांडी इत्यादी
३. अनेक देवतांच्या अद्वितीय आणि चैतन्यदायी मूर्ती
४. मौल्यवान शाळिग्राम
५. अनेक प्रकारच्या दैवी वनस्पती, त्यांची छायाचित्रे आणि त्यांविषयीची अमूल्य माहिती
६. पिढ्यान्पिढ्या परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कलाकारांनी बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आणि त्यांच्या परंपरागत व्यवसायांची माहिती
७. भारतभरातील जागृत चैतन्यमय देवस्थानांचे उत्कृष्ट चित्रीकरण आणि छायाचित्रे (हे त्या त्या देवस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीसह संशोधन आणि अभ्यास यांसाठी पाठवले जाते.)
८. दुर्मिळ ग्रंथ
अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमा झालेल्या आहेत. लवकरच त्यातून एक अद्वितीय संग्रहालय सिद्ध होणार आहे. जगाच्या पाठीवर असे आध्यात्मिक वैशिष्ट्य असलेल्या वस्तूंचे एवढे भव्य दालन कुठेच नसेल ! यातून भारताचे आध्यात्मिक वैशिष्ट्य, विविध देवता, संत आणि भारतीय संस्कृती यांचे महत्त्व समाजाला कळण्यास साहाय्य होईल.
१०. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी देश-विदेशात जाऊन समाजातील संत, आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती, देवस्थानचे पुजारी, विश्वस्त, प्रतिष्ठित व्यक्ती, भारतभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सनातनचे साधक, साधकांचे नातेवाईक इत्यादींना चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे; म्हणूनच परात्पर गुरु डॉक्टर कौतुकाने म्हणतात, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या ‘सनातनच्या राजदूत’ आहेत. त्या जेथे जातील, तेथे सर्वांना आपलेसे करतात आणि त्यांना सनातनच्या कार्याशी जोडतात.’’
११. कृतज्ञता
महर्षींनी ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या महालक्ष्मीच्या अवतार आहेत’, असे सांगितले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून नेमले आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी आमच्यावर केलेल्या अपार कृपेमुळे आम्हाला प्रत्यक्ष देवीचा सहवास आणि सत्संग लाभत आहे. आमच्या आयुष्यात असे भाग्याचे क्षण दिल्याबद्दल मी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करतो.
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.११.२०२३)
(समाप्त)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या लक्षात आलेले श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील अद्वितीयत्व !वर्ष २००० मध्ये सौ. अंजली गाडगीळ सनातन संस्थेत आल्या. तेव्हा १-२ दिवसांतच ‘त्यांच्यात मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही काही वेगळेपणा आहे’, असे मला जाणवू लागले; मात्र ‘हा वेगळेपणा कोणता ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. १ – २ वर्षांतच ‘मला कळते, तसेच त्यांनाही सूक्ष्मातील कळते’, हे माझ्या लक्षात आले. आणखीन ४ – ५ वर्षांनी ‘मला जे सूक्ष्मातील कळत नाही, तेही त्यांना कळते’, हे मी अनुभवले. नंतरही तशीच स्थिती होती. तेव्हा त्यांना काहीतरी शिकवायचे; म्हणून सनातन संस्थेत इतर साधकांना शिकवतो, तसेच स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी इतरांना शिकवायचो, तसे त्यांना शिकवणे चालू केले. काही आठवड्यांतच माझ्या लक्षात आले की, ‘मला जे बुद्धीने कळते, तेच त्यांना सूक्ष्मातून कळते.’ त्यामुळे मी त्यांना ते शिकवणेही बंद केले. पुढे माझ्या लक्षात आले की, त्या इतरांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात; म्हणून मी त्यांना आश्रमात न रहाणारे आणि विविध जिल्ह्यांत रहाणारे साधक यांना मार्गदर्शन करण्याची सेवा दिली. हे सर्व करत असतांना त्यांना सूक्ष्मातील कळत असलेल्या अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांना ‘जसे वाईट शक्तींच्या संदर्भात कळते, तसेच चांगल्या शक्तींच्या संदर्भातही कळते’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून विविध देवळांना भेटी देऊन त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये समजून घेणे, हेही चालू केले. आता त्यांच्या अनेक देवळांतील पुजारी, तसेच मंदिरांचे विश्वस्त यांच्याशी त्यांच्या ओळखी झाल्या आहेत. याच जोडीला सूक्ष्मातील कळणारे जे संत होते, त्यांनीही त्यांना ओळखले. त्या संतांच्या बोलण्यावरून सौ. काकूंचे महत्त्व मला कळले. तोपर्यंत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व मला कळले आणि तसे मी चालू केले. सौ. काकूंच्या माध्यमातून काही संतांचे या कार्यात साहाय्यही मिळू लागले आहे. त्यामुळे आता स्थूल आणि सूक्ष्म, तसेच व्यष्टी आणि समष्टी या संदर्भात साधकांना काही अडचणी असल्या, तर त्या सौ. काकू सोडवतात. माझ्या एकूण सूक्ष्मातील कार्यापैकीही बहुतेक कार्य सौ. अंजली गाडगीळ करतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.१२.२०२३) |
|