बसुर्ते, बेळगाव येथील कु. कल्पना जोतिबा मेलगे यांना साधना करू लागल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. नामजप करण्यास आरंभ केल्यावर काही स्वभावदोष दूर होणे

‘मी साधना चालू करण्यापूर्वी मला ‘साधना म्हणजे काय ? किंवा नामजप का करावा ?’, हे ठाऊक नव्हते. मी नामजपाला आरंभ केल्यापासून माझ्यामधील काही स्वभावदोष दूर झाले.

२. ‘सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने देशसेवा करायची संधी मिळणार नाही’, असे वाटणे

मला देशसेवा करायला फार आवडते. सैन्यामध्ये (‘आर्मी’मध्ये) भरती होण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी २ परीक्षा दिल्या होत्या; पण नशिबाने मला साथ दिली नाही. मी त्या परीक्षांत अनुत्तीर्ण झाले. तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटले. ‘माझे स्वप्न आता केवळ स्वप्नच राहिले. मला देशसेवा करायची संधी मिळणार नाही’, असे मला वाटले.

३. ‘हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी जीवन वेचावे’, असे वाटणे

मी साधनेत येऊन नामजप चालू केल्यावर ‘देशसेवा करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार’, असे मला वाटते. मला वाटते, ‘जीव द्यावा लागला, तरी चालेल; पण मला हिंदु राष्ट्रासाठी जीवन वेचायचे आहे. प्रत्येकाने हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी जीवन वेचले पाहिजे. हा हिंदु बांधवांचा हक्काचा देश आहे.’

४. साधना केल्यामुळे स्वतःतील स्वभावदोष न्यून होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होत असणे

‘सैन्यामध्ये जाण्यासाठी शारीरिक क्षमतेची परीक्षा द्यावी लागते. आपण त्यात अनुत्तीर्ण होण्याची शक्यता असते; पण साधना केल्यामुळे आपण जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो. आपण नामजप केल्यामुळे आपल्यात ईश्वराप्रती भाव निर्माण होऊन आपली साधना होते. त्यामुळे आपल्यामधील स्वभावदोषही न्यून होतात आणि आपली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होतेच, तसेच मोक्षप्राप्तीही होते. साधना केल्यामुळे पुष्कळ लाभ आहेत. केवळ आपल्यामध्ये भाव पाहिजे’, असे माझ्या लक्षात आले.

५. अनुभूती

५ अ. ‘वाईट शक्ती पुष्कळ त्रास देत आहेत’, असे जाणवल्यावर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे आणि ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र सभोवती फिरत असून त्याने वाईट शक्तींना दूर नेले’, असे जाणवणे : एकदा रात्री मला ‘वाईट शक्ती पुष्कळ त्रास देत आहेत’, असे जाणवत होते. तेव्हा मला पुष्कळ भीती वाटली. मला ‘काय करावे ?’, हे समजत नव्हते. तेव्हा मी मनात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला, तरीही मला पुष्कळ भीती वाटत होती. थोड्या वेळाने माझ्या अंथरूणाभोवती प्रकाश पडला. ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र माझ्या सभोवती फिरत असून त्याने वाईट शक्तीला माझ्यापासून दूर नेले’, असे मला जाणवले.

५ आ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर त्यामध्ये परात्पर गुरुमाऊलींचा चेहरा दिसणे : एकदा मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर मला त्यात परात्पर गुरुमाऊलींचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) चेहरा दिसला. मी परात्पर गुरुमाऊलींच्या छायाचित्राकडे बघितल्यावर मला त्यांचा चेहरा गुलाबी दिसत होता. ‘परात्पर गुरुमाऊली माझ्याकडे बघून हसत आहे’, असे मला जाणवले.

हे श्रीकृष्णा आणि परात्पर गुरुमाऊली, आपल्याच कृपाशीर्वादाने हे सर्व होत आहे. गुरुमाऊली, तुम्हीच हे माझ्याकडून लिहून घेतले. त्याबद्दल मी तुमच्या कोमल चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. कल्पना जोतिबा मेलगे, बसुर्ते, बेळगाव. (८.६.२०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.