सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला मनसेने केले २५ सहस्र रुपये अर्पण !
महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला मिळत असलेल्या तुटपूंज्या निधीचे प्रकरण !
मालवण (जि. सिंधुदुर्ग), २४ डिसेंबर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरातील पूजा-अर्चा, कार्यक्रम आणि देखभाल यांसाठी मनसेच्या वतीने २५ सहस्र रुपये अर्पण स्वरूपात मंदिराच्या पुजार्यांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. या रकमेत प्रतिवर्षी वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक आणि मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. काही दिवसांपूर्वी हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारकडून मंदिराला वार्षिक ६ सहस्र रुपये मिळत असल्यावरून आवाज उठवला होता. नागपूर येथील नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही या विषयावर वाचा फोडण्यात आली. मालवण येथील शासकीय विश्रामगृहात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली. यानंतर पत्रकारांना राणे म्हणाले,
१. शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्या तुटपुंज्या निधीविषयी विविध वृत्तवाहिन्या, तसेच वृत्तपत्रे यांतून बातम्या प्रसारित झाल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवण येथे किल्ल्यावर जाऊन वस्तूस्थिती जाणून घेण्याविषयी सांगितले. त्यानुसार येथे येऊन शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही दर्शन घेतले, तसेच मंदिरासाठी प्राथमिक टप्प्यात २५ सहस्र रुपये अर्पण दिले आहेत.
२. आम्ही दिलेली रक्कम फार मोठी नाही; मात्र हे मानधन प्रतिवर्षी देण्यात येणार असून त्यात उत्तरोत्तर वाढ केली जाईल. यासह शासनाकडून देण्यात येणारे मानधन वाढवून मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
३. सिंधुदुर्ग किल्ल्यावर लाखो पर्यटक येत असतात. त्यांना किल्ल्याची परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी किल्ल्यात संग्रहालय होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे स्मारक असणारे सिंधुदुर्ग किल्ल्यासारखे अनेक गड-किल्ले ढासळत आहेत. त्यामुळे शासनाने सिंधुदुर्ग किल्ल्यासह अन्य किल्ल्यांच्या देखभालीकडे अधिक लक्ष द्यावे, या मागणीसाठी सह्यांची मोहीम मनसेच्या वतीने राबवण्यात येणार आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तुटपुंज्या निधीसंदर्भात मांडलेला विषय ‘सनातन प्रभात’ने व्यापक स्तरावर केला होता प्रसारित !नुकतेच नागपूर येथे झालेले हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्या तुटपुंज्या निधीविषयी आवाज उठवला होता. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक श्री. सुनील घनवट आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्या आंदोलनाला आणि मांडलेल्या भूमिकेला ‘सनातन प्रभात’ने व्यापक स्तरावर प्रसिद्धी दिली होती. ‘सनातन प्रभात’ने यू ट्यूब व्हिडिओद्वारे या विषयाला वाचा फोडली. |
संपादकीय भूमिकाविषयाची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन मनसेने उचललेले हे पाऊल अनुकरणीयच आहे. या निमित्ताने त्याचे अभिनंदन ! |