‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’, याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता निवडणुकीत घेईल ! – भाजपचे खासदार प्रताप सिंहा
संसदेत घुसखोरी करणार्यांना पास देणारे भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांचे विधान !
नवी देहली – ‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’ याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेईल’, असे विधान कर्नाटकातील म्हैसुरू येथील भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांनी केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी १३ डिसेंबर २ तरुणांनी लोकसभेत जाऊन प्रेक्षक सज्जेतून सभागृहात उड्या मारल्या होत्या आणि रंगीत धूर सोडला होता. या दोघांना प्रताप सिंहा यांच्या शिफारसीमुळे संसदेत प्रवेश करण्याचा पास मिळाला होता. यावरून खासदार सिंहा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यावरून सिंहा यांनी वरील विधान केले आहे.
सौजन्य : इंडिया टूडे
काही दिवसांपूर्वी प्रताप सिंहा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन ‘दोन्ही घुसखोरांना पास का दिला ?’, याचे स्पष्टीकरण दिले होते. ‘घुसखोरी करणारा डी. मनोरंजन याचे वडील माझ्या मतदारसंघात रहात असून त्यांनी मुलाला संसद पहायची असल्याचे सांगून प्रवेशपत्रिका मागितली होती. माझ्या मतदारसंघातील असल्यामुळे मी त्यांना पास देऊ केला होता. तसेच याव्यतिरिक्त या तरुणांची कोणतीही माहिती नाही’, असे सिंहा यांनी सांगितले होते.