परात्पर गुरु डॉक्टर रुग्णाईत असल्याने त्यावर उपाय म्हणून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तिरुपतीचे दर्शन घ्यायला जातांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या दैवी अनुभूती आणि त्यांनी व्यक्त केलेली अनोखी कृतज्ञता !
१. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून तिरुपतीच्या चेहर्यावरही सुंदर स्मित पसरले’, असे महर्षींनी सांगणे !
महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ४.२.२०२१ या दिवशी कर्नाटकमधील ‘अहोबिलम्’ येथे रामराज्याच्या स्थापनेसाठी नरसिंह याग करण्यात आला. त्यानंतर ‘अहोबिलम्’ सोडतांना महर्षींनीही आम्हाला सांगितले, ‘तिरुपती बालाजीसुद्धा येथे येऊन दर्शन घेऊन गेला. त्यामुळे तुम्हालासुद्धा येथील नरसिंहाचे दर्शन घेतल्यानंतर तिरुपतीचे दर्शन घ्यावेच लागेल.’ त्याप्रमाणे आम्ही ५.२.२०२१ या दिवशी तिरुपतीच्या दिशेने प्रवास चालू केला. आम्ही साडेचार घंट्यांत तिरुपतीला पोचलो आणि एक घंट्यातच आम्हाला तिरुपतीचे दर्शन झाले. याविषयी सांगतांना नाडीवाचनात महर्षि म्हणाले, ‘कार्तिकपुत्रीला पाहून तिरुपती बालाजीलाही पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी त्याच्या चेहर्यावर सुंदर स्मित पसरले.’ हे ऐकून मला वाटले, ‘देवतासुद्धा आपल्या भक्तावर किती प्रेम करतात ?’
२. परात्पर गुरु डॉक्टर थोडे रुग्णाईत झाले असल्याने त्यावर उपाय म्हणून महर्षींनी तिरुपतीचे दर्शन घ्यायला सांगितले असणे
या दिवशी गुरुदेवांची प्रकृती बरी नव्हती. त्यांचा रक्तदाब वाढला होता आणि त्यांच्या अंगात थोडा तापही होता. महर्षि आम्हाला म्हणाले, ‘आम्ही याच दिवशी तुम्हाला तिरुपतीचे दर्शन घ्यायला सांगितले; कारण त्याच दिवशी गुरुदेव रुग्णाईत होते.’ यातून महर्षींची सर्वज्ञता लक्षात येते. त्यांनी आम्हाला आधीच उपाय सांगितले होते. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आम्ही रात्री चेन्नईला पोचलो.’
३. अनुभूती
३ अ. दुपारी नाडीवाचनापूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ थोडा वेळ पहुडल्या असतांना त्यांना झोपेत देवतेच्या तारक आणि मारक डोळ्यांचे दर्शन झाल्याचे जाणवणे : दुसर्या दिवशी महर्षींनी आम्हाला नाडीवाचनासाठी दुपारी ३.३० वाजता बोलावले होते; म्हणून दुपारी १२ नंतर मी काही वेळ झोपले होते. तेव्हा मी जागीही नव्हते आणि धड झोपलेही नव्हते. त्या वेळी मला अर्धवट झोपेत प्रथम एक सुंदर डोळा दिसला. ‘तो डोळा कुणातरी देवतेचाच असावा’, असे मला जाणवले. त्यानंतर तोच डोळा लाल दिसला, म्हणजेच त्या देवतेचे मारक रूप दिसले आणि त्यानंतर मग एक सुंदर ज्योत दिसली.
३ अ १. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या या स्थितीचे वर्णन महर्षींनी ‘आज कार्तिकपुत्री देवलोकात झोपली होती’, असे करणे : माझ्या या स्थितीचे वर्णन करतांना महर्षि माझ्या समवेत असलेल्या साधकांना म्हणाले, ‘आज कार्तिकपुत्री देवलोकातच झोपली होती. तुम्ही तिला उठवले नाहीत, ते बरे झाले.’ यावरून लक्षात आले, ‘महर्षींना सर्वच कळते.’ त्याविषयी त्यांनी नाडीपट्टीत आवश्यकतेप्रमाणे लिहूनही ठेवले आहे.
४. ‘महर्षींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी सर्व लिहून ठेवले आहे’, यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या हाताला मानसरित्या तेल लावून ते चेपून देऊन महर्षींप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
आपल्या जीवनात साधनेच्या अनुषंगाने किंवा इतरही ज्या प्रमुख घटना घडत असतात, त्यांचे यथासांग वर्णन महर्षि नाडीपट्टीत करून ठेवतात. ‘महर्षींनी आपल्यासाठी एवढे सारे लिहून ठेवण्याची सेवा किती निःस्वार्थ भावाने केली आहे !’, याचेच मला कौतुक वाटले. मला महर्षींविषयी कृतज्ञता वाटली. त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी एवढे सारे लिहिले आहे; म्हणून मी त्यांच्या हाताला मानसरित्या तेल लावून देऊन त्यांचे हात चेपून दिले. त्या वेळी माझ्या डोळ्यांत कृतज्ञतेची आसवे दाटली होती.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू (७.२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |