पंचमहाभूतांनी आणि कांचीपूरम् येथील सेवाकेंद्रावर बसलेल्या पोपटांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या आदिशक्ती असल्याविषयी दिलेल्या अनुभूती !

१. चेन्नई सेवाकेंद्रातील शीतकपाट बांधण्यासाठी (पॅकिंग करण्यासाठी) बाहेर घेतल्यावर अकस्मात् पाऊस येणे आणि तो वरुणदेवाचा आशीर्वाद अन् शुभसंकेत असणे

‘३०.१०.२०२३ या दिवशी आम्ही चेन्नईहून कांचीपूरम् येथे जाणार होतो. आदल्या रात्री आम्ही सर्व साहित्य बांधून बैठककक्षात ठेवले होते. केवळ शीतकपाट बांधायचे राहिले होते. बाहेरचे वातावरण पावसाचे नव्हते; म्हणून साधकांनी शीतकपाट बांधण्यासाठी (पॅकिंग करण्यासाठी) ते सेवाकेंद्राच्या बाहेर आणले. त्याच क्षणाला पाऊस चालू झाला. ‘पाऊस येण्याचे चिन्ह नसतांना पाऊस आला’, याचे आम्हाला आश्चर्य वाटले. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आपण चेन्नई सेवाकेंद्र सोडून निघालो आहोत’, यासाठी वरुणदेवाने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. हा आपल्यासाठी शुभसंकेत आहे. यातून ‘आपला मार्ग योग्य आहे’, हेच देव आपल्याला सांगत आहे.’’

२. सेवाकेंद्रातील कपाट आवरतांना मिळालेली नाणी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी अर्पण पेटीत टाकल्याक्षणी आकाशात वीज कडाडणे आणि तो पंचमहाभूतांनी दिलेला आशीर्वाद अन् आपत्काळ चालू झाल्याचा संकेत असणे

चेन्नई सेवाकेंद्रात २ अर्पणपेट्या आहेत. ३०.१०.२०२३ या दिवशी चेन्नई सेवाकेंद्रातील कपाटे आवरतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना एका कपाटात काही नाणी मिळाली. ती त्यांनी एका अर्पण पेटीत टाकली. मलाही माझे कपाट आवरतांना २ नाणी मिळाली. ती घेऊन मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे गेलो आणि त्यांना प्रार्थना केली, ‘‘तुम्ही तुमच्या हाताने ही नाणी दुसर्‍या अर्पण पेटीत टाकावी आणि ‘धर्मकार्य अन् हिंदु राष्ट्राची उभारणी यांसाठी धन कधीही न्यून पडणार नाही’, असा आम्हाला आशीर्वाद द्यावा.’’ श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ती नाणी पेटीत टाकल्याक्षणी आकाशात प्रचंड मोठ्या आवाजात वीज कडाडली. नाणी पेटीत पडल्याचा आवाज आणि विजेचा आवाज एकाच वेळी झाला. क्षणभर ‘काय झाले ?’, ते कुणालाच कळले नाही. वीज पडल्यावर आवाज होतो, तसा तो आवाज होता. हे इतके अकस्मात् घडले की, आम्ही ४ ही साधक अवाक् झालो. आम्ही श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना प्रार्थना करून विचारले, ‘‘हे काय घडले ? यामागील सूक्ष्मातील शास्त्र आम्हाला सांगावे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अर्पण करताक्षणी वीज कडाडणे, म्हणजे आपल्याला पंचमहाभूतांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि देवाने आपत्काळ चालू झाल्याचा संकेतही दिला आहे.’’

दूरदर्शनवर रामायण किंवा महाभारत या मालिकांमध्ये काही विशेष प्रसंग घडतांना ‘जोराचा वारा, विजांचा कडकडाट किंवा मोठा पाऊस’ यातून दैवी संकेत दाखवले जातात, तसा दैवी संकेत आम्हाला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळे प्रत्यक्ष अनुभवता आला.

३. चेन्नई सेवाकेंद्र सोडून कांचीपूरम् येथे जाण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ गाडीत बसून गाडी काही अंतर पुढे गेल्यावर वरुणाशीर्वाद मिळणे

चेन्नई सेवाकेंद्र व्यवस्थित आवरून बंद करून आम्ही सेवाकेंद्रातून बाहेर पडलो. आम्ही चेन्नई येथून निघालो, तेव्हा पावसाचे चिन्ह नव्हते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ गाडीत बसून गाडी थोडी पुढे गेल्यावर लगेच पाऊस आला. तेव्हा मला वाटले, ‘वरुणदेवता श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना निरोप द्यायला आली आहे. चेन्नई येथील पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या (समष्टी) संत) आणि काही साधक श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना निरोप द्यायला आले होते. ‘त्यांची पावसामुळे अडचण होऊ नये’, अशी काळजीही वरुणदेवाने घेतली.’

४. मार्गात अकस्मात् एका गायीचे दर्शन होणे आणि देवाने गायीच्या माध्यमातून शुभसंकेताची प्रचीती देणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना कांचीपूरम् येथे गाडीने सोडण्यासाठी चेन्नई येथील सौ. सुगंधी जयकुमार (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि त्यांचे यजमान श्री. जयकुमार आले होते. आम्ही चेन्नई शहराच्या बाहेर पडतांना एका थांब्याच्या (‘सिग्नल’च्या) ठिकाणी आमची गाडी थांबली होती. अकस्मात् एक तपकिरी रंगाची गाय मार्गावरून जातांना आमच्या गाडीच्या पुढे येऊन थांबली. तिला थांबलेले पाहून आम्ही तिचे मनोभावे दर्शन घेतले. ती गाय काही वेळ तिथेच थांबून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पहात होती. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘देवाने यापेक्षा अजून कुठलीही प्रचीती द्यायची बाकी ठेवलेली नाही !’’

५. निसर्गालाही आनंद झाला असून तो ‘आदिशक्ति श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे पंचमहाभूतांच्या माध्यमातून कांचीपूरम् येथे स्वागत करत आहे’, असे जाणवणे

एका नाडीवाचनामध्ये महर्षींनी सांगितले होते, ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे यापुढील कार्य हे कांचीपूरम् या तीर्थक्षेत्रातून होणार आहे.’ कांचीपूरम्ला जातांना प्रवासात मला महर्षींच्या या वाक्याची आठवण आली. त्या दिवशी मला ‘आज दिवाळी आहे’, असेच वाटत होते. दिवाळीच्या दिवशी जसे उत्सवाचे वातावरण असते, तसे त्या दिवशी होते. प्रभु श्रीरामाचा जन्म झाल्यावर सृष्टी आनंदाने ओसंडून गेली होती. ते जसे शब्दांत मांडू शकत नाही, केवळ अनुभवू शकतो, तशी आजही सृष्टी आनंदाने ओसंडून वहात होती. मध्येच पाऊस येत होता, मध्येच ऊन येत होते आणि त्यानंतर लगेच थंड हवाही येत होती. यातून ‘निसर्गालाही जणू पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला वाटत होते. सप्तपुरी आणि त्यांच्या संबंधित देवतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – १. अयोध्या – श्रीराम, २. मथुरा – श्रीकृष्ण, ३. माया (हरिद्वार) – श्रीविष्णु, ४. काशी – शिव, ५. कांचीपूरम् – श्री कामाक्षीदेवी, ६. अवन्तिका (उज्जैन) – शिव आणि ७. द्वारका – श्रीकृष्ण. अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची ह्यवन्तिका । पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः ।।
– नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक ३५

अर्थ : अयोध्या, मथुरा, मायावती (हरिद्वार), काशी, कांची, अवन्तिका (उज्जैन) आणि द्वारका या ७ मोक्ष प्रदान करणार्‍या नगरींचे मी स्मरण करतो.

या सप्तपुरींपैकी ‘कांचीपूरम्’ हे देवीचे एकमेव स्थान आहे. बाकी सर्व स्थाने पुरुष देवतांची आहेत. जणू पंचमहाभूतांच्या साक्षीने आदिशक्ति श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आगमन कांचीपूरम् येथे झाले.

६. कांचीपूरम् सेवाकेंद्राच्या बांधकामावर बसलेल्या पोपटांमुळे ‘सेवाकेंद्राची इमारत ही आदिशक्ति श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे निवासस्थान आहे’, याची प्रचीती मिळणे

सध्या कांचीपूरम् येथे रहाण्यासाठी आम्ही एक घर भाड्याने घेतले असून त्या घराच्या जवळच सेवाकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम चालू आहे. कांचीपूरम् येथे गेल्यावर दुसर्‍या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि मी ‘सेवाकेंद्राचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे ?’, ते पहाण्यासाठी चालत तिकडे गेलो. ते बांधकाम एका बाजूने पाहून झाल्यावर दुसर्‍या बाजूने पहातांना इमारतीचे खांब उभे करण्यासाठी लावलेल्या लोखंडी सळ्यांवर ६ पोपट येऊन बसले. ते सर्व आवाज करत होते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्या पोपटरूपी देवतांचे दर्शन घेतले. आमचे दर्शन घेऊन झाल्यावर एका क्षणात ते सर्व पोपट कांचीपूरम् च्या दिशेने उडून गेले. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘येथे रहायला आल्यानंतर मी विचार करत होते, ‘मला पोपट का दिसत नाहीत ?’ आज लक्षात आले, ‘देवाने पोपटांच्या माध्यमातून ‘माझे निवासस्थान येथे आहे’, हे दाखवून दिले. (टीप) याच ठिकाणाहून पुढील धर्मकार्य आणि पुढील साधनाप्रवास होणार आहे.’’

टीप – एका पुराणामध्ये असा उल्लेख आहे, ‘देवी पार्वतीने साधना करण्यासाठी पृथ्वीलोकामध्ये जन्म घेतला, तेव्हा ‘देवी कुठे आहे ?’, हे शोधण्यासाठी देव पोपटाच्या रूपामध्ये आले होते.’

७. वाळत घातलेले कपडे काढेपर्यंत शेषनागाने सेवाकेंद्रावर सूक्ष्मातून फणा धरल्यामुळे सर्वत्र पाऊस पडूनही सेवाकेंद्रावर पाऊस न पडणे

१४.११.२०२३ या दिवशी मी कपडे धुऊन आगाशीत (गच्चीत) वाळत घातले होते. काही वेळाने अकस्मात् पाऊस चालू झाला; म्हणून मी कपडे आणण्यासाठी आगाशीत गेलो. तेव्हा सर्वत्र पाऊस पडतांना दिसत होता; पण सेवाकेंद्रावर (सध्या रहात असलेल्या वास्तूवर) पाऊस पडत नव्हता. मी वाळत घातलेले कपडे दोरीवरून काढल्यानंतर लगेच सेवाकेंद्रावरही पाऊस पडू लागला. ‘देव कसे साहाय्य करतो ?’, हे पाहून माझी भावजागृती झाली. मी हे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘काल रात्री सौ. सायलीला (श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची मुलगी सौ. सायली करंदीकर यांना) स्वप्नात ‘एक सोनेरी नाग संपूर्ण सेवाकेंद्राला (सध्या रहात असलेल्या वास्तूला) वेटोळे घालून सेवाकेंद्रावर फणा काढून बसला आहे’, असे दृश्य दिसले.’’ तेव्हा मला वाटले, ‘या सूक्ष्म नागाने सेवाकेंद्रावर छत्र धरल्यामुळे मी आगाशीतून कपडे काढेपर्यंत सेवाकेंद्रावर पाऊस पडला नाही.’

८. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ अग्निहोत्र करतांना पाऊस थांबणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ येथे प्रतिदिन आगाशीत बसून अग्निहोत्र करतात. ३.१२.२०२३ या दिवशी सकाळी पाऊस पडत होता. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना अग्निहोत्र करायचे होते. त्यांनी मला ‘पाऊस थांबला का ?’, हे पहायला सांगितले. तेव्हा पाऊस न्यून झाला होता; म्हणून मी त्यांना तसे सांगितले आणि आगाशीतील अग्निहोत्र करण्याची जागा स्वच्छ केली; पण त्यानंतर पुन्हा पाऊस चालू झाला; म्हणून मी त्यांना ‘पाऊस चालू झाला’, असे सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आपले अग्निहोत्र होईपर्यंत पाऊस पडणार नाही. तू अग्निहोत्र करण्याची सिद्धता कर.’’ त्यानंतर त्या अग्निहोत्र करत असतांना पाऊस थांबला. अग्निहोत्र संपल्यानंतर पुन्हा पाऊस पडू लागला. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आपल्यासाठी पाऊस थांबला होता; कारण सध्या दक्षिण भारतामध्ये वादळ आले आहे. त्यापासून साधकांचे रक्षण होण्यासाठी अग्निहोत्र करायचे होते.’’

९. पंचमहाभूतांवर प्रभुत्व प्राप्त असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ !

आम्हाला वरील सर्व दैवी अनुभूती श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळे आल्या. यावरून मला एक प्रसंग आठवला, ‘एकदा एका हितचिंतकाने प.पू. गुरुदेवांना विचारले होते, ‘‘आपल्याकडे शस्त्रे नसतांना पुढे युद्धकाळामध्ये आपले रक्षण कसे होणार ?’’ तेव्हा गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘आपण तशी कठोर साधना करायला हवी.’’ आजपर्यंत श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये जी शक्ती सुप्त रूपाने होती, ती तिन्ही गुरूंच्या कृपेने आम्हाला स्थूल रूपामध्ये दिसू लागली आहे. ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्त्वे अखंड असतात’, याची देव आम्हाला प्रत्येक क्षणाला अनुभूती देत आहे’, याची मला अनुभूती आली.’

– श्री. वाल्मिक भुकन, कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.१२.२०२३)