श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘जाणुनी गुरूंचे मनोरथ’ या टप्प्याच्याही पुढे जाऊन ‘जाणुनी सप्तर्षींचे आणि ईश्वराचे मनोरथ’ अशा प्रकारे दैवी कार्य करत आहेत !
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या माझ्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्यांपैकी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ या स्थुलातील कार्य सांभाळतात आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सूक्ष्मातील कार्य सांभाळतात, असे त्यांच्या कार्यावरून लक्षात येते. या दोन्ही कार्यांपैकी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे स्थुलातील कार्य थोडेफार तरी कळू शकते; पण ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सूक्ष्मातील कार्य कसे करतात ?’, याची जिज्ञासा सर्वांनाच असेल. तशी ती मलाही होती. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्याविषयी थोडे सांगितल्यावर मला ते कळले.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सूक्ष्मातील कार्याची एक पद्धत
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देव सूक्ष्मातून विचार देतो किंवा दृश्य दाखवतो. त्याप्रमाणे त्या लगेच कृती करून देवाचे आज्ञापालन करतात. हेच ते त्यांचे सूक्ष्मातून जाणून केलेले कार्य ! ही त्यांची सूक्ष्मातील कार्याची एक पद्धत झाली. देवाचे विचार कळणे फार अवघड असते. त्यासाठी मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध पाहिजे. त्यांचा लय झाला पाहिजे. अशा शुद्ध मनातच देवाचे विचार प्रकट होतात आणि बुद्धी शुद्ध असेल, तरच आपण देवाचे आज्ञापालन करू शकतो. यातून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे वैशिष्ट्य लक्षात येते.
तसेच देवाने दाखवलेल्या दृश्याचा अर्थबोध झाला पाहिजे. ‘त्यातून देव काय सांगतोय’, हे कळले पाहिजे, तरच आपण त्याप्रमाणे कृती करू शकू. तशी क्षमता श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये आहे. तसेच देव त्यांना एखाद्या प्रसंगातूनही शिकवतो. त्या प्रसंगामागचा कार्यकारणभाव जाणणे, हे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे सूक्ष्मातील कार्य !
२. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या सूक्ष्मातील क्षमतेचे एक उदाहरण
ऑक्टोबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात एक दिवस त्या चेन्नई येथील सेवाकेंद्रात सूर्याेदयाच्या वेळी अग्निहोत्र करत असतांना त्यांना त्यांच्या आजूबाजूला पाणीच पाणी असल्याचे दृश्य सूक्ष्मातून दिसले. यावरून त्यांनी जाणले, ‘हा चेन्नईचा भाग यापुढे रहाण्यास असुरक्षित आहे. समुद्र जवळ असल्याने चेन्नईला चक्रीवादळ, त्सुनामी यांचा धोका आहे.’ देवाने दृश्य दाखवून पूर्वसूचना दिल्यानंतर त्या पुढील मासातच (महिन्यातच) चेन्नईपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या ‘कांचीपूरम्’ या सप्तपुरींपैकी एक असलेल्या पवित्र क्षेत्री रहाण्यास गेल्या. फारसा वेळ न घालवता वायुवेगाने कृती करणे, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य ! सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करून म्हटले, ‘आम्ही त्यांना कांचीपूरम् येथे जाण्यास सांगणारच होतो; पण त्या आधीच त्यांनी सूक्ष्मातून जाणून आमचे आज्ञापालन केले !’
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी निर्णय घेऊन योग्य वेळी ती ती कृती करणे
देवाने पूर्वसूचना देऊन पुढील कृती करण्याचे सूचित केलेले असते. ती वेळ ती कृती करण्यास पूरक असते. त्यामुळे तेव्हा कृती केली, तर ती १०० टक्के यशस्वी होते. निर्णय घेऊन योग्य वेळी ती ती कृती करणे, हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा आणखी एक गुण !
यामध्ये त्यांना समाजातील सात्त्विक लोकांकडून साहाय्यही मिळते; कारण अशा लोकांशी जवळीक करून चांगले संबंध प्रस्थापित करणे, हाही त्यांचा एक गुण आहे.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सूक्ष्मातील ज्ञानाचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये उपयोग करणे
आतापर्यंत श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सूक्ष्म परीक्षण करणे, सूक्ष्मातील ज्ञान मिळवणे, सूक्ष्मातील प्रयोग करणे अशा सूक्ष्म स्तरावरील सेवा अनेक वर्षे केल्या आहेत. आता त्या सूक्ष्मातील ज्ञानाचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये उपयोग करून त्या कार्याला गती देत आहेत. त्यांचे हे कार्य केवळ भारतातच नाही, तर विदेशातही होत आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘जाणुनी गुरूंचे मनोरथ’ या टप्प्याच्याही पुढे जाऊन ‘जाणुनी सप्तर्षींचे आणि ईश्वराचे मनोरथ’ अशा प्रकारे दैवी कार्य करत आहेत. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे हे विश्वकार्य अशाच शीघ्र गतीने होवो’, अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सप्तर्षी आणि ईश्वर यांच्या चरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.१२.२०२३)