तालिबान भारताच्या साहाय्याने बांधणार कुनार नदीवर धरण : पाकला संताप !
पाकच्या २० लाख नागरिकांवर ओढावू शकते दुष्काळाचे संकट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – तालिबानी राजवटीला अफगाणिस्तानातून वहाणार्या कुनार नदीवर धरण बांधायचे आहे. त्यासाठी भारतीय आस्थापनाचे साहाय्य घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. यामुळे ४५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून ३४ सहस्र हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या घोषणेवरून पाकिस्तानातून विरोधाचे सूर येऊ लागले आहेत. बलुचिस्तान प्रांताचे माहितीमंत्री जान अचकझाई यांनी चेतावणी दिली आहे, ‘जर तालिबानने पाकिस्तानला सहभागी न करता हे धरण बांधण्यासाठी पावले उचलली, तर हे दोन्ही देशांमधील युद्धाच्या आरंभीचे पहिले पाऊल मानले जाईल.’
सौजन्य इंडिया वेब न्यूज
१. पाकच्या या धमकीचे कारण असे की, तालिबानची धरण योजना यशस्वी झाल्यास खैबर पख्तूनख्वा प्रांतातील २० लाख लोकांना पाणी मिळणे कठीण होईल.
२. कुनार नदीचे पाणी काबुल नदीला मिळते. काबुल नदी या प्रांतातील पाण्याची आवश्यकता पूर्ण करते.
३. कुनार नदीचा उगम पाकिस्तानात होऊन ती अफगाणिस्तानात जाते आणि पुन्हा पाकिस्तानात येऊन काबुल नदीला मिळते.
४. अफगाणिस्तानच्या क्षेत्रात येणार्या कुनार नदीवर धरण बांधल्यास पाकला यामुळेच फटका बसणार आहे. दुसरीकडे काही जलतज्ञांच्या मते पाककडे कुनार नदीला अफगाणिस्तानमध्ये जाण्याआधीच तिचा प्रवाह वळवण्याची क्षमता आहे.
५. पाकने असे केले, तर अफगाणिस्तानच्या मोठ्या भागात दुष्काळ पडेल. असे झाले, तरी एकूण काबुल नदीवर त्याचा परिणामच होणार आहे, म्हणजेच दोन्ही पर्यायांत पाकला फटका बसेल.
असे आहे पाण्याचे पाकिस्तानचे गणित !
सिंधु नदी पाकमधील सर्वांत मोठी नदी आहे. काबुल नदी ही सिंधु नदीची उपनदी आहे, तर कुनार नदी ही काबुलची उपनदी आहे.
१८ कोटींहून अधिक लोकांसाठी सिंधु नदीचे पाणी मुख्य स्त्रोत आहे. कुनारचे पाणी अल्प झाल्याचा थेट परिणाम सिंधु नदीच्या खोर्यावर होणार आहे. पाकिस्तानची ८० टक्के लोकसंख्या सिंधु खोर्यात रहाते. सकल देशांतर्गत उत्पादनात सिंधुचे योगदान तब्बल २५ टक्के आहे.