Kamiya Jani : कामिया जानी गोमांसला भक्षण करते आणि त्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत अटकेची केली मागणी !

यू ट्यूब चॅनल चालवणार्‍या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन

यू ट्यूब चॅनल चालवणार्‍या कामिया जानी

भुवनेश्‍वर (ओडिशा) – यू ट्यूबवर सक्रीय असणार्‍या कामिया जानी यांनी पुरी येथील जगन्नाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. या संदर्भातील एक व्हिडिओ जानी यांनी स्वतःच्या ‘कर्ली टेल्स’ या यू ट्यूब चॅनलवरून प्रसारित केला आहे. यात त्या आणि बिजू जनता दलाचे नेते व्ही.के. पांडियन मंदिरामध्ये महाप्रसाद घेतांना दिसत आहेत. भाजपने कामिया जानी यांच्या मंदिरातील प्रवेशाला आक्षेप घेतला आहे. भाजपने म्हटले आहे, ‘कामिया हिने गोमांसाचा प्रचार केला होता. तिच्या मंदिरात दर्शनाने कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तिला अटक झाली पाहिजे.’ कामिया यांनी यापूर्वी एक व्हिडीओ प्रसारित केला होता ज्यामध्ये ती गोमांसाला प्रोत्साहित करण्याविषयी बोलली होती.

ओडिशातील भाजपचे सरचिटणीस जतिन मोहंती म्हणाले की, गोमांसाचा प्रचार करणार्‍यांवर मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी आहे, तरीही कामिया जानी आणि पांडियान यांना प्रवेश देण्यात आला. त्यांनी महाप्रसादही स्वीकारला. मंदिरात कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे; पण कामियाने चित्रीकरण केले. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्यासाठी तिला अटक झाली पाहिजे. तिला अटक न झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ.

भाजप खोट्या बातम्या पसरवत आहे ! – बिजू जनता दल

बिजू जनता दलाचे खासदार मानस मंगराज यांनी सामाजिक माध्यमांतून म्हटले आहे की, कामिया यांनी चार धामला भेट दिली आहे. त्या रामललांच्या दर्शनालाही गेल्या होत्या.

खासदार मंगराज यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रश्‍न विचारतांना लिहिले की, तुम्हीच सांगा काय अडचण आहे ? तुम्ही खोट्या बातम्या का पसरवत आहात ? ओडिशातील लोकांचा अपमान का करायचा ?

मी गोमांस कधी खाल्ले नाही ! – कामिया जानी यांचा दावा

कामिया जानी यांनी इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय असल्याने भारतीय संस्कृती आणि वारसा जगासमोर नेणे हे माझे ध्येय आहे. मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंग आणि ४ धाम यांना भेट दिली आहे. मी गोमांस खात नाही आणि गोमांस कधी खाल्ले नाही.

संपादकीय भूमिका

ओडिशा सरकारने या आरोपाची चौकशी करून सत्य बाहेर आणले पाहिजे. जर आरोप खरे असतील, तर कारवाई केली पाहिजे !