दोडामार्ग (सिंधुदुर्ग) तालुक्यात हत्तीमुळे लाखो रुपयांची हानी : ५ हत्तींचा कळपही पडला दृष्टीस !
दोडामार्ग : तालुक्यातील वीजघर परिसरात आलेल्या एका हत्तीने आतापर्यंत शेतकर्यांची शेती आणि बागायती यांची ९ लाख रुपयांहून अधिकची हानी केली आहे. एका हत्तीने एवढी हानी केली असतांना २ दिवसांपूर्वी ५ हत्तींचा कळप या भागात दिसला. अन्नाच्या शोधात हत्ती शेती आणि बागायती यांची हानी करत असून आता ते थेट लोकवस्तीत येऊ लागल्याने शेतकरी अन् ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२० दिवसांपूर्वी या भागात एक हत्ती आला होता. त्याने आतापर्यंत ८५५ केळी, १५ माड आणि १५० सुपारीची झाडे उद्ध्वस्त केली आहेत. बांबर्डे येथील एका शेतकर्याच्या घराजवळ एक हत्ती आला होता; मात्र ग्रामस्थांनी आरडाओरड करून त्याला पिटाळून लावले होते; मात्र त्यानंतर लगेचच ५ हत्तींचा कळप वावरत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. हत्तींना हुसकावण्याचा वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना हवे तसे यश मिळत नाही.
संपादकीय भूमिका
अनेक वर्षे हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |