बेळगाव जिल्ह्यातील श्री रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर येथून भाविक रवाना !
कोल्हापूर – बेळगाव जिल्ह्यातील श्री रेणुकादेवीच्या (यलम्मा) यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रेणुकाभक्त मोठ्या संख्येने २२ डिसेंबरला रवाना झाले. यंदा ४ लाखांहून अधिक रेणुकाभक्त यात्रेसाठी जाणार आहेत. कोल्हापूर जिल्हा रेणुकाभक्त संघटना आणि अन्य भाविक संघटना यांच्या माध्यमातून १२२ ‘एस्.टी.’ बसगाड्या रवाना झाल्या. २५ डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केल्याविषयी ‘कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना’, ‘लक्षतीर्थ वसाहत रेणुका भक्त मंडळ’, ‘डावरे ग्रुप रेणुका भक्तमंडळ’ यांच्या वतीने संभाजीनगर आगार व्यवस्थापक शिवराज जाधव, आगारप्रमुख कुंदन भिसे आणि सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी सतीश डावरे, सुशांत पाटील, विनोद चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.
प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, तसेच अन्य सिद्धता !
मंदिर व्यवस्थापन समिती, तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून यात्रेसाठी जय्यत सिद्धता करण्यात येत आहे. यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, केरळ येथून ८ दिवस भक्तांची अलोट गर्दी असते. २५ डिसेंबरला सायंकाळी देवीच्या कंकण विसर्जनाचा सोहळा होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था यांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विविध ठिकाणी वाहनतळांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण डोंगरावर प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.