वंटमुरी (जिल्हा बेळगाव) प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ! – शिवसेना
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका प्रेमी युगुलाने गावातून पलायन केले. या प्रकरणी युवतीच्या कुटुंबियांनी युवकाच्या घरावर आक्रमण करून घर जाळले, तसेच त्याच्या आई-वडिलांना अमानुष मारहाण केली. या प्रकरणी युवकाच्या आईला निर्वस्त्र करून गावातून धिंड काढून गावातील चौकात खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या प्रकरणी आरोपींना कठाेर शिक्षा होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गडहिंग्लज येथे निदर्शने करण्यात आली.
या संदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख संजय संकपाळ म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध होऊ नये; म्हणून काँग्रेस सरकारने प्रयत्न केला. तरी केंद्र सरकारने या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ या प्रसंगी दत्तात्रय कोरवी, राहुल खोत, विनायक इंदुलकर, सचिन पोवार, चंद्रकांत पोवार, मंथन भडगावकर उपस्थित होते.