सकाळची शाळा !
शाळांच्या सकाळच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने शाळांच्या वेळा पालटण्याची सूचना राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाला दिली. राज्यपालांची सूचना योग्य असली, तरी शहरासारख्या ठिकाणी विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत भरवल्या जातात. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार दोन्ही सत्रांत किमान ५ घंटे शाळा भरवणे बंधनकारक असल्याने सकाळच्या शाळा उशिरा भरवल्या, तर त्याचा परिणाम दुसर्या सत्रावर होईल. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांना राज्यपालांची सूचना अव्यवहार्य वाटत आहे. या विषयावर महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनातही चर्चा झाली असून सरकारसुद्धा सकारात्मक असल्याचे चिन्ह दिसत आहे. पूर्वीपासूनच शाळा लवकर भरतात. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आताच कसा निर्माण झाला ? मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, हे सत्य असले, तरी झोप पूर्ण का होत नाही, हे पहाणे आवश्यक आहे.
शहरासारख्या ठिकाणी आज बहुतेकांच्या घरी ‘स्मार्ट टीव्ही’ नाही, तर ‘केबल टीव्ही’ आहे. मुलांच्या परीक्षांचे दिवस वगळता अन्य दिवशी पालकांकडून रात्री उशिरापर्यंत यांवर चित्रपट अथवा मालिका पाहिल्या जातात. याखेरीज आज प्रत्येकाच्या हाती ‘स्मार्ट फोन’ आले आहेत. सध्याचे पालक आपल्या ७ वी, ८ वीच्या मुलांनाही ‘स्मार्ट फोन’ घेऊन देतात. या ‘स्मार्ट फोन’वर पालकांसमवेत मुलेही छोटी चलचित्रे अथवा ‘गेम’ खेळत रात्री जागी रहातात. बहुतेक लहान मुले पालकांसमवेत झोपायला जात असल्याने पालक उशिरापर्यंत जागे रहातात म्हणून त्यांच्यासमवेत मुलांचेही झोपणे विलंबाने होते. पालकांनी त्यांच्या नोकरी-व्यवसायानुसार त्यांचे वेळापत्रक बनवलेले असते. मुलांना अधिक झोप आवश्यक असते. मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी ‘त्यांना लवकर झोपवणे पालकांकडून होत आहे का ?’, या योग्य उपायाकडे न जाता शाळेची वेळ पालटण्याचा उपाय कितपत योग्य ? शास्त्रानुसार प्रत्येकाने सकाळी सूर्योदयापूर्वी उठायला हवे. मुलांना लवकर उठण्याची सवय लहानपणापासून लागणे आवश्यक आहे. रात्रीचे वातावरण तामसिक, तर सकाळचे वातावरण सात्त्विक असते. सकाळी लवकर उठून केलेला अभ्यास अधिक स्मरणात रहातो. सकाळच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा मिळून दिवसभर ताजेतवाने वाटते. त्यामुळे शाळांच्या वेळा पालटण्यापेक्षा पालकांनी स्वआचरण करत मुलांमध्ये पालट करणे श्रेयस्कर आहे !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.