फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय ३ वर्षे) याच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !
एक दिवस देवतांचा नामजप केल्यावर ३ वर्षांच्या चि. पद्मनाभच्या पोटातील आतड्यांची गुंतागुंत सुटणे‘२८.११.२०२२ या दिवशी सौ. अश्विनी साळुंके यांनी मला संपर्क करून त्यांचा ३ वर्षांचा मुलगा चि. पद्मनाभ याचे पोट दुखण्याचे कारण ‘मोठे आतडे लहान आतड्यामध्ये ४ सेंटीमीटरपर्यंत आत जाऊन अडकले जाणे’, हे असल्याचे सांगितले. या त्रासावर मी देवतांचा जप शोधला. तेव्हा मला पुढीलप्रमाणे जप मिळाला – ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा जप मी त्यांना प्रतिदिन २ घंटे करायला सांगितला. दुसर्या दिवशी मी चि. पद्मनाभ याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांना संपर्क केला, तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘पद्मनाभचे मोठे आतडे लहान आतड्यात अडकले होते, ते सुटले. आता त्याला बरे वाटत आहे. कृतज्ञता !’’ मला आश्चर्य वाटले. गुरुकृपेने देवतांच्या जपाचा परिणाम १ दिवसातच झाला होता. मी त्यांना ‘पुन्हा पद्मनाभच्या आतड्यांची गुंतागुंत होऊ नये’, यासाठी तो जप करणे १ मास (महिना) चालू ठेवण्यास सांगितले.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. |
१. चि. पद्मनाभच्या पोटात पुष्कळ दुखणे, बालरोगतज्ञ (सौ.) अमृता देशमाने यांनी ‘त्याला ‘इंटसससेप्शन’ झाले असण्याची शक्यता असून त्याची ‘अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी’ ही चाचणी करा’, असे सांगणे
‘नोव्हेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पोटात जंतूसंसर्ग होऊन चि. पद्मनाभला जुलाब झाले. बालरोगतज्ञ (सौ.) अमृता देशमाने यांनी सांगितल्यानुसार त्याला औषधे दिल्यावर तो बरा झाला. त्यानंतर २३.११.२०२२ या दिवशी मी पद्मनाभला घेऊन देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात गेले. आम्ही देहली येथे पोचल्यावर ३ दिवसांनी (२६ नोव्हेंबर या दिवशी) पद्मनाभच्या पोटात वेदना चालू झाल्या. त्या वेदना इतक्या तीव्र होत्या की, तो ३ – ४ मिनिटे भूमीवर कळवळून लोळायचा. वेदना थांबल्यावर तो शांत व्हायचा आणि पुन्हा २० ते २५ मिनिटांनी त्याला वेदना व्हायच्या. ‘हवा पालट झाल्यामुळे त्याला त्रास होत असावा’, असे वाटून आम्ही (मी आणि यजमान श्री. कार्तिक साळुंके) त्याला औषध देत होतो; परंतु त्याच्या वेदना न्यून न होता वाढतच गेल्या. मी गोवा येथील बालरोगतज्ञ (सौ.) अमृता देशमाने यांना संपर्क करून सर्व स्थिती सांगितली. ते ऐकून त्या म्हणाल्या, ‘‘त्याला ‘इंटसससेप्शन’ (Intussusception) (जंतूसंसर्गामुळे पोटातील आतडी नाजूक होऊन ती एकमेकांमध्ये अडकणे) झाल्याची शक्यता वाटते. त्याची ‘अल्ट्रासाउंड सोनोग्राफी’ (विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी) करा. त्यानुसार त्याची ‘अल्ट्रासाऊंड’ चाचणी केल्यावर त्याला ‘इंटसससेप्शन’ झाले आहे’, असे लक्षात आले. त्याचे मोठे आतडे लहान आतड्यामध्ये ४ सेंटीमीटरपर्यंत आत जाऊन अडकले होते. त्यामुळे त्याला तीव्र पोटदुखी होत होती.
२. पद्मनाभला ‘वर्धमान महावीर सफदरजंग’ रुग्णालयात भरती केल्यावर त्याच्यावर ‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ प्रक्रिया केली जाणे, त्याने केवळ १ सें.मी. आतडे मोकळे होणे
२७.११.२०२२ या दिवशी आम्ही पद्मनाभला ‘वर्धमान महावीर सफदरजंग’ रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्याला भरती केल्यावर तेथील आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘उद्या आपण ‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ (एनिमाद्वारे पोटात पाणी सोडून पाण्याच्या दाबाने आतड्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला जाणे) ही प्रक्रिया करूया. याने परिणाम झाला नाही, तर त्याचे शस्त्रकर्म करावे लागेल.’’ २८.११.२०२२ या दिवशी दुपारी २ वाजता पद्मनाभवर ‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ ही प्रक्रिया केली; पण त्यामुळे त्याचे केवळ १ सें.मी. आतडे मोकळे झाले. पद्मनाभला पुष्कळ वेदना होत असल्यामुळे त्यांनी आम्हाला आपत्कालीन विभागात ठेवले.
३. ‘सफदरजंग’ या सरकारी रुग्णालयातील वातावरण पाहून मनाची स्थिती फारच अस्वस्थ होणे
‘सफदरजंग’ हे देहलीतील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. त्या रुग्णालयातील वातावरण पाहून आमच्या मनाची स्थिती फारच अस्वस्थ झाली. आमच्या डोळ्यांसमोरच २ मुलांचा मृत्यू झाला. त्यातच पद्मनाभ सतत कळवळून रडत असल्यामुळे आम्ही घाबरून गेलो. आधुनिक वैद्यांना सांगूनही कुणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सारखा पाठपुरावा करण्यात आणि आधुनिक वैद्यांना शोधण्यातच आमचा वेळ जात होता; पण काहीच होत नव्हते. त्यामुळे आम्ही केवळ गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) धावा करत होतो.’
– सौ. अश्विनी साळुंके आणि श्री. कार्तिक साळुंके (चि. पद्मनाभचे आई-वडील), देहली सेवाकेंद्र (२२.४.२०२३)
४. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘काळजी न करता नामजपादी उपाय करा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष असून ते सर्वकाही चांगलेच करणार आहेत’, असे सांगणे
‘सफदरजंग रुग्णालयाची स्थिती पाहून माझ्या मनात आले, ‘आपण इकडे न थांबता खासगी रुग्णालयात जाऊया’; पण आम्ही ज्यांना विचारले, ते म्हणाले, ‘‘तुम्ही आहात, तिकडेच थांबा. दुसरीकडे कुठे जाऊ नका.’’ मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना पद्मनाभची स्थिती सांगितली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्वकाही व्यवस्थित होणार आहे. नामजपादी उपाय चालू ठेवा.’’ त्यांनी मला आध्यात्मिक दृष्टीकोन दिल्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘मी समोर आलेली परिस्थिती स्वीकारीन.’’ सद्गुरु पिंगळेकाका मला म्हणाले, ‘‘परिस्थिती स्वीकारण्याच्या समवेतच ‘देव जे काही करणार आहे, ते आपल्या चांगल्यासाठीच करणार आहे’, असा भाव ठेवा. काळजी करू नका. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तुमच्याकडे लक्ष असून ते सर्वकाही चांगलेच करणार आहेत.’’ त्यांचे हे धिराचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत झाला.
५. पद्मनाभचे शस्त्रकर्म करण्याचे निश्चित होणे
२८.११.२०२२ या दिवशी ‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ची प्रक्रिया सफल न झाल्यामुळे आधुनिक वैद्यांनी दुसर्या दिवशी पद्मनाभचे शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला. ‘देव जे करील, ते चांगल्यासाठीच’ हा भाव ठेवून मी नामजप करत होतो. पद्मनाभचे शस्त्रकर्म करण्याविषयी देवाने आम्हा दोघांच्या (मी आणि सौ. अश्विनी यांच्या) मनाची सिद्धता करून घेतली.
६. पद्मनाभला शस्त्रकर्मासाठी नेण्यापूर्वी पुन्हा एकदा ‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ प्रक्रिया केल्यामुळे त्याचे आतडे मोकळे होऊन शस्त्रकर्म टळणे
दुसर्या दिवशी सकाळी पद्मनाभला शस्त्रकर्मासाठी नेण्यापूर्वी एक आधुनिक वैद्या तिथे आल्या. त्या सुटीवर गेल्या होत्या. त्या रुग्णालयात आलेल्या पहिल्याच दिवशी त्यांच्याकडे पद्मनाभ हाच पहिला रुग्ण होता. त्या म्हणाल्या, ‘‘मुलाला शस्त्रकर्मासाठी नेण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा त्याची ‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ प्रक्रिया करूया. त्याने काही लाभ झाला नाही, तर त्याला त्वरित शस्त्रकर्मासाठी नेऊया.’’ हे ऐकून आमच्या मनामध्ये ‘काल काहीच उपयोग झाला नाही. आता पुन्हा यात किती वेळ जाणार ?’, असे विचार आले; पण आमच्यासमोर दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्ही प्रक्रिया करण्याच्या ठिकाणी गेलो. देवाच्या कृपेने तिथे गर्दी नव्हती आणि ‘अल्ट्रासाऊंड’ चाचणी करणारे तज्ञ अन् अनुभवी वैद्यही उपस्थित होते. त्यांनी लगेच पद्मनाभला उपचारासाठी घेतले. १५ – २० मिनिटांतच ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि यशस्वीही झाली. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘त्याचे आतडे मोकळे झाले आहे. आता शस्त्रकर्माची आवश्यकता नाही.’’ तेव्हा माझा कृतज्ञताभाव जागृत होऊन गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. कार्तिक साळुंके, देहली सेवाकेंद्र (२२.४.२०२३)
७. नापजपादी उपायांचे जाणवलेले महत्त्व !
७ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यामुळे पद्मनाभला वेदना सहन करण्याचे बळ मिळणे : ‘पद्मनाभला पोटात वेदना होऊ लागल्या, तेव्हापासून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ नामजपादी आध्यात्मिक उपाय सांगत होते. हे नामजपाचे उपाय माझी आई श्रीमती विजया विभांडिक, जळगाव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि माझ्या सासुबाई सौ. शोभा साळुंके करत होत्या. आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे पद्मनाभला बळ मिळून तीव्र वेदना सहन करता येत होत्या.
७ आ. ‘पद्मनाभवर उपचार करतांना अडथळे येऊ नयेत’, यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय दिल्यामुळे उपचारात अडथळे न येता ते व्यवस्थित होणे : पद्मनाभवर उपचार करण्यामध्ये पुष्कळ अडथळे येत होते. या अडथळ्यांच्या निवारणासाठीही सद्गुरु गाडगीळकाकांनी नामजपादी उपाय दिले. त्यामुळे दुसर्या दिवशी उपचार निर्विघ्नपणे झाले. एरव्ही त्या ठिकाणी पुष्कळ गर्दी आणि आपत्कालीन रुग्ण असतात; पण पद्मनाभवर उपचार करण्याच्या वेळी तिथे कुणीही रुग्ण नव्हते. इतके दिवस सुटीवर असलेल्या आधुनिक वैद्या नेमक्या त्याच दिवशी रुग्णालयात उपस्थित झाल्या आणि त्या अनुभवी होत्या.
७ इ. पद्मनाभसाठी प्रार्थना करणे : पद्मनाभवरील उपचाराच्या कालावधीत आणि त्याचे शस्त्रकर्म होणार असल्याने त्याला काही खायला द्यायचे नव्हते; पण त्याला पुष्कळ भूक लागून तो सतत खायला मागत असे. तेव्हा माझ्याकडून गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘पद्मनाभला तुमच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करता येऊ दे. त्या चैतन्यानेच त्याची भूक शमू दे. तुम्हीच त्याला जवळ घ्या. त्याला बरे करू शकणारे आणि या प्रसंगातून तारून नेणारेही तुम्हीच आहात.’
८. केवळ गुरुकृपा आणि नापजपादी उपाय यांमुळेच पद्मनाभवरील उपचार शीघ्रतेने होणे
रुग्णालयातील एका बाळाची आई आम्हाला म्हणाली, ‘‘या रुग्णालयात केवळ आपला क्रमांक लागण्यासाठीच १ ते २ मास जातात आणि त्यानंतर आधुनिक वैद्यांशी भेट होते. ऐनवेळी शस्त्रकर्म रहितही होते. रुग्णाला पुनःपुन्हा बोलावले जाते. रुग्णालयात बरेच दिवस रहावेही लागते. त्यामुळे बालरुग्णांना पुष्कळ त्रास होतो; पण तुमचे सर्व लवकर झाले.’’ ते ऐकून ‘केवळ गुरुकृपा आणि नापजपादी उपाय यांमुळेच पद्मनाभवर शीघ्रतेने उपचार होऊ शकले’, असे माझ्या लक्षात आले.
९. कृतज्ञता
‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ ही प्रक्रिया चालू असतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले असून तेच पद्मनाभवर उपचार करत आहेत’, असे मला वाटत होते. तिथे मला त्यांचे अस्तित्व जाणवत होते. पद्मनाभचे आतडे मोकळे झाले, हा दैवी चमत्कारच होता. ‘गुरुदेवांना अशक्य असे काहीच नाही’, ही अनुभती मला ‘याची देही, याची डोळा’ अनुभवता आली. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
‘हे गुरुदेवा, तुम्ही आमच्या समवेत सतत आहात’, अशी दृढ श्रद्धा तुम्हीच आमच्या अंतरी निर्माण करा’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अश्विनी साळुंके, फोंडा, गोवा. (२२.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |