रामजन्माचे प्रयोजन
२२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार असल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या सोहळ्याची वाट संपूर्ण देश पहात आहे, तो सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ज्या श्रीरामाची आपल्यावर इतकी मोहिनी आहे, त्या श्रीरामाचा एक राजकुमार ते मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम हा प्रवास आपण नीट समजून घ्यायला हवा.
१. रामाचा जन्म केवळ रावणवधासाठी होता का ?
प्रभु श्रीरामाविषयी नेहमीच म्हटले जाते, ‘रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला होता.’ काही रावणप्रेमी असेही म्हणतात, ‘रावण इतका मोठा होता की, त्याला मारण्यासाठी प्रत्यक्ष देवाला अवतार धारण करून रानावनांत अनवाणी पायाने फिरावे लागले.’ मग खरेच रामाचा जन्म केवळ रावणवधासाठी झाला होता का ? रावण एवढा महान होता का की, देवाने केवळ त्याचा वध करण्यासाठी जन्म घ्यावा ? कि आणखीही काही कारणे किंवा कार्ये होती का ? ज्यासाठी भगवान विष्णु परमेश्वरी अवतार घेऊन पृथ्वीवर आले. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला रामाच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घ्यावा लागेल.
२. असंख्य यज्ञांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म !
अयोध्येचा राजकुमार म्हणूनच प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. महान ‘इक्ष्वाकु’ वंशीय अयोध्यापती दशरथ आणि महाराणी कौसल्या यांचा पुत्र श्रीराम. लहानपणीच रामाला शिक्षणासाठी महर्षि वसिष्ठ यांच्या आश्रमात जावे लागले. राजपुत्र म्हणून तेथे त्याचे कोणतेही लाड झाले नाहीत. त्याला अन्य सामान्य मुलांसारखेच शिक्षण घ्यावे लागले. बालपणानंतर त्याचे खरे आयुष्य चालू होते आणि इथूनच चालू होतो रामाचा, प्रभु श्रीराम बनण्याचा प्रवास !
आश्रमातून घरी परत आल्यानंतर रामाला महर्षि विश्वामित्र यांच्यासमवेत जावे लागते. यज्ञ चालू केल्यानंतर अनेक राक्षस येऊन तो यज्ञ उद्ध्वस्त करत. अशा वेळी त्या राक्षसांचा वध करण्यासाठी महर्षि विश्वामित्रांना रामाला घेऊन जायचे होते. ते म्हणतात, ‘‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा.’’ राम हसतमुखाने महर्षि विश्वामित्रांसमवेत जायला सिद्ध होतो. राजकुमार असूनही तो महर्षि विश्वामित्रांसमवेत पायी चालत सिद्धाश्रमी जायला निघतो. ऐश्वर्यात असलेला एक राजकुमार पायी काट्याकुट्यांमधून चालत निघतो; कारण त्याला स्वत:च्या कार्याची जाणीव असते. आपण ऐश्वर्यात लोळण्यासाठी नव्हे, तर धर्मरक्षणासाठी जन्म घेतला आहे, हे त्याला ठाऊक असते. असे अनेक यज्ञ कायमचे भयमुक्त व्हावेत, यासाठी त्राटिका वध, मारीच आणि सुबाहू यांचा पराभव रामाने केला. असंख्य यज्ञांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला होता.
३. अहिल्येचा उद्धार !
त्यानंतर विश्वामित्र राम-लक्ष्मणांना घेऊन मिथिलेला निघाले. रस्त्यात त्यांनी अहिल्येला वंदन केले. माता अहिल्या रामाची वाट पहात होती. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘अहल्या शिळा राघवें मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ।।’, म्हणजे शिळेप्रमाणे झालेल्या अहिल्येला रामाने चरणस्पर्श केल्यावर ती मुक्त झाली. या शिळेसारख्या झालेल्या महातपस्विनी अहिल्येच्या उद्धारासाठी रामाचा जन्म झाला होता.
४. ‘भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते’, हे दर्शवणारे श्रीराम !
सीतामातेशी विवाह करून राम अयोध्येला परतले. काही वर्षे गेल्यावर पुन्हा त्यांच्या आयुष्यात एक नवीन वादळ आले. दशरथाने रामाचा राज्याभिषेक करायचे निश्चित केले. सगळीकडे आनंदी आनंद पसरला; पण राणी कैकयीची दासी मंथरा हिने कैकयीचे कान भरले आणि तिने रामाला वनवासाला पाठवायला दशरथाला भाग पाडले. किती मोठा आघात असेल, तो रामासाठी ! कालपर्यंत आपल्या राज्याभिषेकाची सिद्धता चाललेली असतांना अचानक वनात निघून जायचे, तेही १४ वर्षांसाठी; पण राम वनात जायला सिद्ध झाला; कारण त्याला आपल्या राज्याभिषेकापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे होते. वनात जाऊन सहस्रो राक्षसांचा वध करून लोकांना सुखी-समाधानी करायचे होते. अनेक ऋषींची भेट घेऊन त्यांना मुक्ती द्यायची होती. यासाठी रामजन्म झाला होता. त्यासाठीच कदाचित् रामवनवास पूर्वनियोजित होता. याखेरीज ‘मातापित्यांची आज्ञाही कितीही कठीण असली, तरी तिचे पालन करायचे असते’, हा आदर्शही रामाला घालून द्यायचा होता; म्हणून राम वनवासाला गेला. चित्रकूट पर्वतावर भरतभेट झाली. भरताला रामाने समजावून परत जायला सांगितले. ‘भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते’, हे दाखवून द्यायला रामजन्म झाला होता.
५. रामजन्माची विविध कारणे !
सीताहरण झाल्यावर वाटेत माता शबरीशी रामाची भेट झाली. माता शबरीही डोळ्यांत प्राण आणून रामभेटीची आस लावून बसली होती. या शबरीच्या भेटीसाठी रामजन्म झाला होता. सुग्रीवाशी भेट झाली. हनुमान लंकेला गेला. लंकादहन करून माता सीतेची भेट घेऊन परत आला. येतांना रावणाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देऊन तो परत आला. बिभीषणाने रामाची भेट घेतली. बिभीषणाच्या भक्तीसाठी रामजन्म झाला होता. प्रचंड सेतू उभारून राम लंकेला गेला आणि घनघोर युद्ध करून रावणवधही केला. माता सीता परत आली. रावणाने कैदेत ठेवलेल्या देवतांना रामाने मुक्त केले. या देवतांच्या मुक्तीसाठी रामजन्म झाला होता.
रामाने ठरवले असते, तर रावणवधासाठी अयोध्येचे साहाय्य मागता आले असते. इतर कुठलाही राजा साहाय्यासाठी उभा राहिला असता; पण रामाने कुणाचेही साहाय्य न घेता बालीने राज्य हिसकावून घेतलेल्या सुग्रीवाचे साहाय्य घेतले. त्याला त्याचे राज्य परत मिळवून दिले आणि मग अशक्य वाटणारे कार्य त्याच्याकडून घडवून आणले. यात रामाने सुग्रीव, अंगद, हनुमान अशा अनेक नेतृत्वांची निर्मिती केली. यासाठी रामजन्म झाला होता. कितीही मोठे संकट आले, तरी न डगमगता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो, या आदर्शासाठी रामजन्म झाला होता.
६. रामराज्य
रामराज्य हा उल्लेख आपण सतत ऐकतो. ते नक्की कसे होते ? तर तेथे लोकांची देवावर श्रद्धा होती. लोक स्वत:च्या कामाविषयी प्रामाणिक होते. आपल्या राज्यावर त्यांचे प्रेम होते. राज्यासाठी कितीही कष्ट करण्याची आणि मोठे बलीदान देण्याची त्यांची सिद्धता होती. असे राज्य म्हणजे रामराज्य ! याची निर्मिती करण्यासाठी रामजन्म झाला होता. अशी अनेक कारणे रामावतारामागे होती.
७. ‘माणसाने कसे जगावे ?’, हेही सांगण्यासाठी रामाचा जन्म !
रावण अजेय नव्हता. याआधीही वाली, सहस्रार्जुन यांनी त्याचा पराभव केला होता. त्यामुळे केवळ रावणवधासाठी श्रीरामाचा जन्म झाला, असे म्हणणे चुकीचे ठरेल. इतर अनेक महान कार्य त्यांनी या अवतारात केली. रामाचे संपूर्ण आयुष्य हे आदर्श घालून देणारे आहे. एक आदर्श पुत्र, पती, भाऊ, राजा, मित्र असा आयुष्यातील प्रत्येक नात्याविषयीचा आदर्श रामाने घालून दिला आहे. हा सगळा प्रवास मनुष्यजन्माच्या मर्यादा पाळून केलेला आहे. एक सामान्य राजपुत्र ते मर्यादापुरुषोत्तम हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. यात अनेक संकटे आली, अनेकदा भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व द्यावे लागले. श्रीरामाने ते सगळे केले; कारण त्याला एक आदर्श घालून द्यायचा होता. माणसाने कसे जगावे ? हे त्याला सांगायचे होते. कदाचित् हे सांगण्यासाठीच रामजन्म झाला होता.
– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१५.१२.२०२३)