शरिराच्या दुखणार्या भागावर सनातन निर्मित सात्त्विक नामपट्टी आणि चित्र लावले असता दुखणे दूर झाल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती
१. घसा दुखण्याचा त्रास होत असतांना गळ्यावर ‘निर्गुण’ ही नामपट्टी लावल्यावर आलेल्या अनुभूती
१ अ. घसा दुखत असतांना आधुनिक वैद्यांकडून १५ दिवस औषधे घेऊनही बरे न वाटणे : ‘डिसेंबर २०१९ मध्ये माझा घसा काही दिवस दुखत होता. मी आधुनिक वैद्यांना दाखवल्यानंतर ‘माझ्या ‘टॉन्सिल्सना (घशातील लसिका ग्रंथींना)’ सूज आली आहे’, असे लक्षात आले. त्यांनी मला १५ दिवसांची औषधे देऊन सांगितले, ‘‘१५ दिवस ही आैषधे घेऊन बघा. बरे वाटले नाही, तर औषध पालटून देऊ. औषध चालू असतांना आंबट पदार्थ खाऊ नका.’’ नंतर मी १५ दिवस औषधे घेऊनही मला बरे वाटले नाही.
१ आ. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करायला सांगणे; मात्र नोकरी आणि नंतर अकस्मात् घोषित झालेल्या दळणवळण बंदीमुळे शस्त्रकर्म होऊ न शकणे : मी आधुनिक वैद्यांकडे पुन्हा गेल्यानंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘कदाचित् शस्त्रकर्म करावे लागेल’’; परंतु मी नोकरी करत असल्याने मला शस्त्रकर्म करून घेण्यासाठी वेळ मिळत नव्हता. तेव्हा मी विचार केला, ‘आणखी काही दिवस औषधे घेऊन बघूया. बरे वाटले नाही, तर मार्च २०२० नंतर शस्त्रकर्म करून घेऊया.’ मार्च २०२० मध्ये अकस्मात् घोषित झालेल्या दळणवळण बंदीमुळे माझे शस्त्रकर्म होऊ शकले नाही.
१ इ. गळ्यावर सनातनची ‘निर्गुण’ ही नामपट्टी लावली असता घसा दुखण्याचा त्रास दूर होणे आणि ‘टॉन्सिल्सना’ आलेली सूज अल्प होणे : मी केवळ १ मास औषधे घेतली. मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. मी गळ्यावर ‘निर्गुण’ या नामजपाची पट्टी लावत होते. त्यानंतर मी आंबट पदार्थ खाऊनही मला काहीच त्रास झाला नाही. माझा घसा दुखण्याचा त्रास दूर झाला आणि हळूहळू ‘टॉन्सिल्सना’ आलेली सूजही अल्प होऊ लागली.
२. डोके दुखत असतांना डोक्यावर श्रीकृष्णाचे चित्र लावल्यावर डोकेदुखी २ दिवसांत दूर होणे
२ – ३ दिवस माझ्या डोक्यावरील शिरा ओढल्या जाऊन माझे डोके दुखत होते. मला ‘काहीच करू नये’, असे वाटत होते. तेव्हा आईने सांगितल्याप्रमाणे मी डोक्यावर श्रीकृष्णाचे चित्र लावले. त्यानंतर माझी डोकेदुखी २ दिवसांतच दूर झाली.
‘हे भगवान श्रीकृष्णा, परात्पर गुरु डॉ. आठवले, आपल्याच कृपेमुळे मला या अनुभूती आल्या आहेत, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्रिया खत्री, उज्जैन, मध्यप्रदेश. (१०.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |