अंतर्गळचे (‘हर्निया’चे) शस्त्रकर्म झाल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती
१. शस्त्रकर्म झाल्यानंतर
१ अ. शस्त्रकर्माच्या पूर्वी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि सहसाधिका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे : ‘मी शस्त्रकर्माच्या आधी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी मला सांगितलेला ‘एकं’ हा नामजप मणिपूरचक्राजवळ आकाशदेवाची मुद्रा (अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावून) करून केला. श्रीमती गीता प्रभु मला म्हणाल्या, ‘‘शस्त्रकर्म कक्षात (ऑपरेशन थिएटरमध्ये) मानसरित्या गोमूत्र शिंपड आणि चारही बाजूंच्या भिंतींवर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप सूक्ष्मातून लिहून ठेव.’ त्याप्रमाणे मी सर्व उपाय केले.
१ आ. श्वास घ्यायला थोडा त्रास होत असल्याचा संदेश प.पू. पराशर जोशीबाबांना केल्यावर त्यांनी ‘प्रार्थना करतो’, असे सांगणे आणि काही क्षणांत सर्व व्यवस्थित होणे : १३.८.२०२२ या दिवशी जोगेश्वरी (मुंबई) येथील पू. परूळेकर रुग्णालयात माझे अंतर्गळचे (‘हर्निया’चे) शस्त्रकर्म झाले. मी बाहेर आल्यावर थोडा वेळ मला प्राणवायू लावावा लागला. आधुनिक वैद्य आशिष परूळेकर मला ‘‘लांब श्वास घ्या’’, असे सांगून गेले. १६.८.२०२२ या दिवशी मला कळत नव्हते की, मला बहुतेक श्वास पुरत नसल्याने माझी थोडी तगमग चालू होती. मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘गुरुभक्ती विशेषांक’ समवेत आणला होता. मला काहीच सुचत नव्हते; म्हणून मी तो अंक माझ्या छातीवर लपेटला. मी प.पू. पराशर जोशीबाबांना संदेश केला की, ‘मला श्वास घ्यायला थोडा त्रास होत आहे.’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘मी प्रार्थना करतो.’’ काही क्षणांतच सर्व व्यवस्थित झाले.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीचे विश्वप्रीतीमय गुलाबी तेजोमय हसरे मुखदर्शन अनुभवता येणे : दुपारी माझी मुलगी श्रुती आली होती. तिच्याशी बोलत असतांना मी माझ्या उजव्या खांद्याजवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीचा हसरा चेहरा अनुभवत होते. मी मुलीकडे वळून पहात होते आणि परत उजव्या खांद्याकडे वळून पहात होते. तेव्हा मला पुन्हा गुरुमाऊलीचे माझ्याकडे पहाणारे हसरे मुख दिसत होते. हे मी पुनःपुन्हा अनुभवत होते. त्यांचे मुख विश्वप्रीतीमय, गुलाबी आणि तेजोमय होते. काही क्षण गुरुमाऊली डोळे उघडत होती आणि पुन्हा ध्यानात असल्यासारखी डोळे मिटत होती. मला नेहमी श्री गणेशाचे असेच दर्शन होते. या वेळी तशीच अनुभूती गुरुमाऊलीच्या संदर्भात आली.
२. ‘परम पूज्य डॉक्टर ।’, असा नामजप करतांना सहस्रारचक्रात वेगाने हालचाली जाणवून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे साक्षात् पंचमुखी हनुमानाच्या रूपात दर्शन होणे
एकदा ‘परम पूज्य डॉक्टर ।’, हा नामजप करून ‘काय अनुभूती येतात ?’, ते पहाण्यास सांगितले होते. मी साधारण १५ ते २० मिनिटे ‘परम पूज्य डॉक्टर ।’, हा नामजप केला. त्या वेळी जणू ‘देव दान देण्यासाठीच बसला आहे’, असे मला जाणवले. काही मिनिटांतच मला माझ्या सहस्रारचक्रात वेगवान हालचाली जाणवू लागल्या. गुरुमाऊलीने मला एक, एक मुखदर्शन घडवून साक्षात् पंचमुखी हनुमानाच्या रूपात दर्शन दिले. परम पूज्य, जशी झाडे उगवावीत, तशी एका मागोमाग एक अशी अनेकानेक मुखे उगवत होती. त्या वेळी ‘समष्टीत, चराचरात गुरुदेवच व्याप्त आहेत’, हे मला अनुभवता आले.
या अनुभूतींतून गुरुदेवांनी मला दाखवून दिले की, ते चराचरात व्याप्त आहेत. त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी) कोटीशः कृतज्ञ आहे.
– सौ. नेहा विनायक पावसकर, विलेपार्ले, मुंबई. (१६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |