नागपूर मडगाव प्रतीक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला मध्य रेल्वेकडून मुदतवाढ
ही रेल्वेसेवा कायमस्वरूपी करण्याची होत आहे मागणी
रत्नागिरी – नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणार्या विशेष रेल्वे गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ३१ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे.
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गुढीपाडवा आणि होळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी गाडी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत घोषित करण्यात आली होती; मात्र या गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३१ मार्च २०२४ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने ही रेल्वेसेवा कायमस्वरूपी करण्याची मागणी रेल्वे आणि प्रवासी संघटनचे वैभव बहुतूले यांनी रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव आणि केंदीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.