शनिशिंगणापूरमधील देवस्थानचे ४०० कर्मचारी जाणार बेमुदत संपावर !
संपामुळे भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता !
अहिल्यानगर – येथील शनिशिंगणापूर देवस्थानमधील कर्मचार्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी १२ सप्टेंबर आणि ५ डिसेंबर या दिवशी देवस्थान प्रशासनासह झालेल्या बैठकीत कामगारांच्या समस्यांविषयी तोडगा काढण्याची विनंती केली होती; मात्र अद्यापही देवस्थान प्रशासनाने तोडगा न काढल्याने अंततः कर्मचार्यांनी २५ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे. त्याविषयीचे पत्र श्री शनेश्वर देवस्थान कामगार युनियनने देवस्थान प्रशासनाला दिले आहे. नाताळाची सुटी आणि ख्रिस्ताब्द नववर्ष यांच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. शनिशिंगणापूरमधील देवस्थानचे ४०० कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानमधील कर्मचारी संपावर गेले, तर या ठिकाणी येणार्या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
देवस्थानातील सर्व कर्मचार्यांचे अनुभव आणि शैक्षणिक पात्रता यांनुसार पदनिश्चिती करावी, देवस्थानातील सर्व कर्मचार्यांना ७ वा वेतन आयोग मागील फरकासह त्वरीत लागू करावा, देवस्थानात अनुकंपा तत्त्वावर मृत झालेल्या कर्मचार्याच्या वारसास सेवेत समाविष्ट करण्यात यावे, देवस्थानातील सर्व कामगार कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळावी, अशा विविध मागण्या कर्मचार्यांनी केल्या आहेत.