Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक : प्रचाराच्या वेळी अपंगांना ‘लंगडा’ आणि ‘मुका’ म्हणण्यावर बंदी !

नवी देहली – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी अपंगांच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. प्रचाराच्या वेळी अपंगांसाठी अपमानास्पद भाषा वापरली जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यांतर्गत ‘मुका’, ‘वेडा’, ‘आंधळा’, ‘एक डोळा नसलेला’, ‘बहिरा’, ‘लंगडा’, ‘अशक्त’ असे शब्द अपंगांसाठी वापरू नयेत, असे आयोगाने पक्षकारांना सांगितले. प्रचाराच्या वेळी नेत्यांची भाषणे, सोशल मीडिया पोस्ट, विज्ञापन आणि प्रसिद्धीपत्रकात असे शब्द वापरू नयेत. त्याचे उल्लंघन करणार्‍यांना ‘अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६’च्या कलम ९२ अंतर्गत ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. पक्षांनी अपंगांना सदस्य बनवावे. त्यामुळे अपंगांचा निवडणुकीत सहभाग वाढेल, असेही आयोगाने सांगितले आहे.

  • मे २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपासून अपंगांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा !
  • अपंगांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून गेल्या काही काळापासून अनेक प्रयत्न !
  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्यासाठी विशेष सुविधा चालू !
  • यांतर्गत ४० टक्क्यांहून अधिक अपंगांना घरबसल्या मतदान करण्याची व्यवस्था !
  • अपंगांना निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत एक फॉर्म भरणे आवश्यक ! त्यानंतर शासकीय कर्मचारी मतदानासाठी अपंगांच्या घरी पोचतात. या प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात येते.
  • मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान यांच्यासह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.