सिंधुदुर्ग : मनसेच्या शिष्टमंडळाची बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी
मालवण येथे नौदलदिनाच्या निमित्ताने केलेल्या कामांची सविस्तर माहिती द्या !
सिंधुदुर्ग : मालवण येथे ४ डिसेंबर २०२३ या दिवशी झालेल्या नौदलदिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती, ‘हेलीपॅड’ बांधणे, चबुतरा बांधणे आणि अन्य कामे करण्यात आली. त्यामध्ये येथील तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालय येथे तात्पुरते ‘हेलीपॅड’ बांधण्यासाठी ९३ लाख ७६ सहस्र ५९२ रुपये निधी खर्च केला आहे. त्या कामांचे अंदाजपत्रक आणि निविदा यांची कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे केली आहे.
या वेळी अभियंता सर्वगोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. शहरातील बोर्डींग मैदान आणि ओझर येथे बांधण्यात आलेले ‘हेलीपॅड’ मालवण तालुक्यातील एकूण २५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे केलेले डांबरीकरण, १०० कि.मी. लांबीचा रस्ता सुस्थितीत करणे, तसेच रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, फलक लावणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम, त्यासाठी वास्तूविशारद (आर्किटेक्ट) नेमण्याकरता केलेले अंदाजपत्रक आणि निविदा, तसेच वास्तूविशारद यांची सविस्तर माहिती, कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हिडिओ शुटींग, ड्रोन शुटींग आणि छायाचित्र काढण्यासाठी काढलेल्या निविदा यांसह केलेली इतर कामे यांचे अंदाजपत्रक आणि निविदा यांच्या माहितीच्या कागदपत्रांची छायांकित (झेरॉक्स) प्रत मिळावी.
२. यासाठी केलेली काही कामे निविदा काढण्यापूर्वी करण्यात आल्याची चर्चा येथे चालू आहे. त्यानंतर घाईगडबडीत निविदांचे विज्ञापन देऊन निविदा काढण्यात आल्या. त्यामुळे खात्याचे शाखा अभियंता आणि मनसेचे तांत्रिक अभियंता यांच्या समवेत पहाणी करून त्या कामांचे मूल्यांकन करावे.
या वेळी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी अंदाजपत्रकाची माहिती लवकरच देण्याचे मान्य केले, तसेच ‘जानेवारी २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी जाऊन पहाणी करूया’, असे सांगितल्याचे उपरकर यांनी सांगितले.