Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !
गोवा सरकारकडून कृती आराखडा उच्च न्यायालयात सादर
पणजी, २१ डिसेंबर (वार्ता.) : ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव वागातोर येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. महोत्सवाला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे. ‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी हा कृती आराखडा न्यायालयात सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी प्रसिद्धि माध्यमांना दिली आहे.
(सौजन्य : prudent media goa)
महाधिवक्ता देविदास पांगम पुढे म्हणाले, ‘‘हा महोत्सव ३१ डिसेंबर या दिवशी होणार नाही. आराखड्यात ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवणे, ध्वनीप्रदूषण रोखणे आणि विविध समित्यांमधील समन्वय यांविषयी माहिती देण्यात आली आहे. महोत्सवासाठी उपसमिती नेमण्यात आली आहे आणि यामध्ये ‘सर्कल इन्स्पेक्टर’, पोलीस उपनिरीक्षक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्य महोत्सव परिसरात ३ ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. याखेरीज केंद्रीय ध्वनीप्रदूषण देखरेख समिती नेमण्यात आली आहे आणि यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकार्यांचा समावेश असणार आहे. या समित्या ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवणार आहेत आणि ध्वनीप्रदूषण झाल्यास आयोजकांना त्यावर नियंत्रण आणण्यास १० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. या १० मिनिटांमध्ये ध्वनीप्रदूषण बंद न केल्यास महोत्सव बंद केला जाणार आहे.’’
‘सनबर्न’ला १२ वाजेपर्यंत अनुमती’, या पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण !
पणजी : नियमानुसार रात्री १० वाजता ध्वनीक्षेपक बंद करावा लागतो. काही विशेष कारणासाठी सवलत देऊन ही मुदत रात्री १२ वाजेपर्यंत केली जाऊ शकते. जत्रा, लग्न समारंभ आदींसाठी ही सवलत दिली जाते. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले, ‘‘२४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कार्यक्रमांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती दिली जाणार आहे; मात्र यासाठी इच्छुकांनी खात्याकडे अर्ज करावा लागणार आहे.
(सौजन्य : RDXGOA GOA NEWS)
‘सनबर्न’ महोत्सव रात्री १२ वाजता बंद होईल, यासाठी पर्यावरण खाते सतर्क राहील.’’ ‘सनबर्न’ला रात्री १२ वाजेपर्यंत अनुमती दिली आहे का ?’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरणमंत्री सिक्वेरा म्हणाले, ‘‘सनबर्न’च्या आयोजकांनी किती वाजेपर्यंत महोत्सवाचे आयोजन करणार, याविषयी केलेल्या अर्जाविषयी मला माहिती नाही.’’
‘सनबर्न’ला प्रसारमाध्यमे विनाकारण प्रसिद्धी देत आहेत ! : पर्यटनमंत्री रोहन खंवटे
पणजी : पर्यटनमंत्री रोहन खवटे म्हणाले, ‘‘प्रसारमाध्यमे हल्ली प्रतिदिन ‘सनबर्न’ महोत्सवाला विनाकारण प्रसिद्धी देत आहेत.
(सौजन्य : prudent media goa)
सरकारसाठी हा केवळ एक कार्यक्रम आहे. पुढील वर्षी ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच महोत्सवासाठी अर्ज करू शकतात.’’
‘सनबर्न’ची राज्याला आवश्यकता आहे का ? : काँग्रेस
पणजी : ‘गोव्याला ‘सनबर्न’ने काय दिले ? अशा कार्यक्रमाची गोव्याला खरोखरच आवश्यकता आहे का?’, असा प्रश्न काँग्रेसचे पदाधिकारी विजय भिके यांनी काँग्रेस भवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. (काँग्रेसला एवढ्या वर्षांनी हा प्रश्न पडला का ? – संपादक)
विजय भिके पुढे म्हणाले, ‘‘सनबर्न’कडून थकित रक्कम सरकारने वसूल केली आहे का ? ‘सनबर्न’ला प्रोत्साहन देणे म्हणजे आपली संस्कृती संपुष्टात आणणे होय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ‘सनबर्न’साठी देशी आणि विदेशी पर्यटक येणार आहेत. त्यामुळे महोत्सवाला येणार्या पर्यटकांसाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी.’’