६ देश वगळता अन्य देशांतील वैद्यकीय प्रमाणपत्र अवैध मानले जाईल ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
मुंबई – चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन हे देश वगळता अन्य देशांतून वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले असेल, तर त्यांना परीक्षा देण्याची आवश्यकता आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना सातत्याने बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेल्या १२३ विद्यार्थ्यांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने शोध घेतला आहे. त्यात राज्यातील ३ विद्यार्थी होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
विदेशी वैद्यकीय पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना २ नोंदणी बंधनकारक
वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय आयोग संस्थेत नोंदणी करणे बंधनकारक असते. परदेशातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यक विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र वैद्यकीय आयोग या दोन्ही संस्थांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे, तसेच एक वर्षाची वैद्यकीय क्षेत्रात आंतरवासिता (इंटर्नशीप) करणेही बंधनकारक आहे.