माळशेज घाटात काचेचा पूल उभारणार !
बदलापूर (जिल्हा ठाणे) – निसर्गरम्य माळशेज घाटात काचेच्या पुलाच्या उभारणीस शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. ‘खाजगी-सार्वजनिक भागिदारी’ अथवा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्त्वाने हा प्रकल्प उभारावा, असेही बैठकीत ठरले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज घाटाच्या माथ्यावरील पठारावर विश्रामगृह आहे. त्यालगत एक मजली इमारत आणि त्यासमोर काचेच्या पुलाची उभारणी केली जाईल. इमारत, तसेच काचेच्या पुलावरून निसर्गाचा आस्वाद घेता येईल. यासाठी सुमारे २६५ कोटी ९७ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.