भगवद्गीतेचे पृथ्वीवर अवतरण !.
आज ‘गीता जयंती’ आहे. त्या निमित्ताने..
‘मार्गशीर्ष शुक्ल ११ या तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास गीतेचा उपदेश केला आणि सर्व जगात अद्वितीय ठरलेल्या ‘भगवद्गीतेचा’ जन्म झाला. गीतेच्या जन्मकथेची कहाणीही संस्मरणीय अशीच आहे.
मदाने उन्मत्त झालेल्या कौरवांकडून पांडवांवर अतोनात अन्याय झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने युद्ध टाळण्यासाठी केलेली शिष्टाई फुकट गेली, तेव्हा कुरुक्षेत्रावर कौरवांचे ११ आणि पांडवांचे ७ अक्षौहिणी सैन्य येऊन ठेपले. महाभारताच्या या युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य स्वतः श्रीकृष्णाने स्वीकारले आणि प्रत्यक्ष युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी ज्यांच्याशी आपणांस लढायचे आहे, त्या विरांना निरखून पहाण्याच्या हेतूने अर्जुनाने समोरील सैन्याकडे नजर टाकली, तेव्हा त्याच्या मनात आले, ‘हे लक्षावधी वीर, प्रिय पितामह भीष्म, आचार्य, बंधू, आप्त, मित्र यांच्याशी लढून का मी राज्य मिळवणार ?’ अर्जुन हताश झाला आणि त्याच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले अन् ‘‘गोविंदा, या कुलक्षयापासून त्रिखंडाचे राज्य मला मिळाले, तरी नको. मी युद्ध करणार नाही’’, असे श्रीकृष्णाला सांगून अर्जुनाने धनुष्य खाली टाकले. क्षत्रियाने स्वतःचा धर्म सोडला.
श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश
त्या वेळी श्रीकृष्णाने त्याला गीतेच्या माध्यमातून धर्माचा उदात्त उपदेश केला, ‘‘अर्जुन तुझ्यासारख्या विराचे ठायी हे कारुण्य योग्य नाही. धर्मयुक्त युद्धाहून कोणतीही अन्य गोष्ट क्षत्रियास श्रेयस्कर नाही. तेव्हा सुख-दुःख, लाभ-अपलाभ, जय-पराजय यांस समान लेखून युद्धास आरंभ कर आणि ध्यानात असू दे की, जेथे कृष्ण अन् पार्थ आहेत तेथे श्री, विजय आणि नीती यांचे वास्तव्य असते.’’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))