कोरोनाचे रुग्ण आढळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ‘मॉक ड्रिल’
मुंबई – राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये कोरोना विषयक ‘मॉक ड्रिल’ घेतले आहे. या वेळी प्राणवायूपासून औषधे, खाटा आदी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. केंद्राच्या सूचनेवरून ही पडताळणी करण्यात आली. सर्व महापालिकांना या संदर्भातील दक्षतेच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. आयुक्त डॉ. करंजकर यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कोरोनासाठी सर्व सज्जतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
भारतात ‘जे.एन्. १’ या ओमायक्रॉन नावाच्या विषाणूचे आतापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. गोव्यात १९ आणि केरळ मध्येही रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गात एकाला लागण झाली आहे. हा विषाणू घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितले आहे. हा विषाणू सौम्य असला, तरी वेगाने पसरण्याची शक्यता आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने ५३० चाचण्या केल्या असून यात ३८० रॅपिड चाचण्या करण्यात आल्या, तर १७२ आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्या केल्या आहेत. आरोग्य विभागानेही इन्फ्लुएंझा सारखे आजार आणि तीव्र श्वसनासंदर्भातील आजार असलेल्या रुग्णांचे सक्षमपणे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या फ्ल्यूची साथ जोरात आहे आणि कोरोना महामारीची पार्श्वभूमी आहे. आरोग्य विभागाकडे साडेतीन लाख आर्.टी.पी.सी.आर्. किट्स आहेत. तसेच सुमारे १७ रॅपिड अँटिजेन किट्स आहेत.