तीव्र शारीरिक त्रास होत असतांना ‘गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे सेवा करतांना कोणताही त्रास न होता उत्साह जाणवणे
१. अकस्मात् चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि रक्तदाब न्यून होणे, असे त्रास होणे आणि महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त सेवा करायची असणे
१ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप ५ मिनिटे केल्यावर त्रास न्यून होणे : ‘१७.७.२०२३ या दिवसापासून महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन प्रारंभ होणार होते. त्यानिमित्त सेवेसाठी, तसेच एका वैयक्तिक कामानिमित्त मी ५ दिवस आधी मुंबई येथे गेलो होतो. एक वैयक्तिक काम पूर्ण झाल्यानंतर दादर येथे सेवेच्या ठिकाणी सेवा करतांना मला अकस्मात् चक्कर आली. मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. माझा रक्तदाब न्यून झाला होता. ‘मला काहीतरी होत आहे’, या विचाराने मला भीतीही वाटत होती. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मी त्रास दूर होण्यासाठी नामजप विचारल्यावर त्यांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे करायला सांगितला. मी ५ मिनिटे हा नामजप केल्यावर मला होत असलेला त्रास न्यून झाला आणि मला बरे वाटू लागले.
१ आ. दुपारचा महाप्रसाद घेत असतांना पुन्हा चक्कर येणे; मात्र मनात काळजीचे विचार नसणे : त्या दिवशी मी ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे केल्यावर दुपारचा महाप्रसाद घेण्यासाठी गेलो. मी दुपारचा महाप्रसाद घेत असतांना मला पुन्हा चक्कर आल्यासारखे झाले. त्या वेळी माझ्या मनात कोणतेही नकारात्मक किंवा काळजीचे विचार नव्हते; मात्र ‘असे का होत आहे ?’, ते माझ्या लक्षात येत नव्हते.
१ इ. भक्तीसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीमुळे उत्साह वाढणे; मात्र ‘पुष्कळ थकवा असल्याने अधिवेशनानिमित्त सेवा करता येईल का ?’, असे वाटणे : मी त्याच स्थितीत विश्रांती घेण्यासाठी खोलीत गेलो. त्या दिवशी गुरुवार असल्याने दुपारी मी भक्तीसत्संग ऐकत होतो. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीमुळे माझा उत्साह वाढला. मला होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाला; मात्र मला पुष्कळ थकवा होता. त्यामुळे मला २ दिवस काही सेवा करता आली नाही. तेव्हा मला वाटले, ‘३ – ४ दिवसांनी विधीमंडळाचे अधिवेशन चालू होणार आहे. मला सेवा करायला जमेल का ? मला दिवसभर सेवेसाठी फिरता येईल का ?’
१ ई. गुरुदेवांना प्रार्थना करून सेवा करणे आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे सेवेसाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे : अधिवेशनाच्या २ दिवस आधी मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून सेवा करायला प्रारंभ केला. त्या वेळी माझा उत्साह वाढला. अधिवेशनाच्या कालावधीत रेल्वेने ये-जा करण्याऐवजी गुरुदेवांच्या कृपेमुळे सेवेसाठी चारचाकी वाहनाची व्यवस्थाही झाली. त्या वेळी ‘गुरुमाऊली किती काळजी घेतात !’, याची मला प्रचीती आली.
१ उ. स्वत:ला होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास यांचा विचार न करता गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून सेवा केल्याने सेवेत उत्साह जाणवणे : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट विधीमंडळात सेवेसाठी आले होते. त्यामुळे माझ्या सेवा करण्याच्या उत्साहात वाढ झाली. ‘गुरुदेव आहेत. ते सर्वकाही पहातील’, या श्रद्धेने मी सेवेसाठी गेलो. गेले काही दिवस पावसाचा जोर पुष्कळ होता, तरीही मी दिवसभर विधीमंडळात सेवेनिमित्त फिरणे, बातम्या घेणे, संपर्क करणे, अशा विविध सेवा केल्या. मला बाहेर फिरतांना कुठेही शारीरिक त्रास जाणवला नाही. सर्व सेवा पूर्ण करून रात्री सेवाकेंद्रात येण्यासाठी मला उशीर होत असे, तरीही मला उत्साह होता. ‘मला काही त्रास होत होता’, हेही मी विसरलो. विधीमंडळातून आल्यावर थोडा वेळ नामजपादी उपाय आणि सेवा करून मला रात्री झोपायला पुष्कळ उशीर होत असे, तरीही मी सहजतेने दुसर्या दिवशी सकाळी लवकर सेवेला जाऊ शकत होतो. ‘सेवेला गेल्यावर गुरुदेव सर्व काळजी घेतात’, या विचारामुळे मला सलग ४ दिवस सेवेला जाता आले.
२. गोवा येथील शिबिरासाठी जायला निघतांना मूत्रपिंडामध्ये असह्य वेदना होऊ लागणे आणि संतांनी नामजपादी उपाय केल्यामुळे विनाअडथळा प्रवास करता येणे
२ अ. ‘बॅगा’ भरण्यासाठी घेतल्यावर अकस्मात् मूत्रपिंडामध्ये तीव्र वेदना होणे, वेदनाशामक गोळी घेऊनही वेदना न्यून न होणे आणि ‘प्रवास करता येणार नाही’, असे वाटणे : २०.७.२०२३ या दिवशी रात्री ८.३० वाजता आम्ही दादर येथून गोवा येथे होणार्या शिबिरात सहभागी होण्यासाठी निघणार होतो. त्याआधी मला कोणताही त्रास होत नव्हता. आम्ही ‘बॅगा’ भरण्यासाठी घेतल्यावर अकस्मात् मला लघवीच्या ठिकाणी काहीशा वेदना जाणवू लागल्या; मात्र मला लघवीला होत नव्हते. १५ मिनिटांनी मला पोटाच्या डाव्या बाजूला मूत्रपिंडामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. मला वेदना असह्य होत असल्यामुळे मी लोळत होतो. त्या वेळी मी वेदनाशामक गोळी घेतली; मात्र वेदना न्यून होत नव्हत्या. तेव्हा मला वाटले, ‘मी गोव्याला जायला कसा निघणार ? मला प्रवास करता येणार नाही.’
२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारणे, त्यांनी स्वतःही नामजपादी उपाय करणे आणि ३० ते ४५ मिनिटांनी वेदना न्यून होत जाऊन वेदना नाहीशा होणे : त्या वेळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना भ्रमणभाष करून माझी स्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी ‘घेतलेले औषध योग्य आहे’, असे सांगितले आणि शक्यतो प्रवास टाळण्याविषयी सुचवले. त्यांनी याविषयी संतांना विचारून घेण्यास सुचवले. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी ‘मूतखड्यामुळे असे होत असावे’, असे सांगितले. (याआधीही मला एक-दोन वेळा असा त्रास झाला होता.) त्यांनी ‘श्री दुर्गादेव्यै नम:-श्री दुर्गादेव्यै नम:-श्री दुर्गादेव्यै नम:-श्री दुर्गादेव्यै नम:-श्री हनुमते नम:’ असा नामजप १ घंटा करायला सांगितला, तसेच त्यांनी स्वत:ही नामजपादी उपाय करायला प्रारंभ केला. त्यांनी उपाय करण्यास प्रारंभ केल्यावर ५ ते १० मिनिटांनी मला लघवीला झाले. माझे असे २ – ३ वेळा प्रसाधनगृहात जाणे झाले. त्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनी माझ्या वेदना न्यून होत जाऊन पूर्णपणे थांबल्या.
२ इ. मी प्रवास करण्याच्या संदर्भात सद्गुरु गाडगीळकाकांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘प्रवास करायला काही अडचण नाही. प्रवासात अधिकाधिक पाणी प्यायला हवे.’’ तेव्हा माझा प्रवास करण्याचा निश्चय झाला.
२ ई. प्रकृती ठीक नसल्याने सहसाधकांनी साहाय्य करणे, प्रवासात साधक समवेत असणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्याने पुन्हा औषध घ्यावे न लागणे अन् प्रवासात काही त्रास न होणे : या वेळी मला काही करता येत नसल्यामुळे श्री. अभिषेक मुरुकटे यांनी मला ‘बॅग’ भरायला साहाय्य केले. श्री. सागर चोपदार यांनी आधुनिक वैद्य मराठेकाकांनी सांगितलेली औषधे आणून दिली. मी बसलेल्या रेल्वेच्या डब्यात अन्य साधक असल्याचे पाहून माझा उत्साह वाढला. प्रवासातही साधकांनी माझी काळजी घेतली. मला प्रवासात कोणताही त्रास झाला नाही.
मला प्रवासात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करता आला. मी अधिक पाणी पित असल्यामुळे १ – २ घंट्यांनी मला लघवीला जावे लागत होते. आधी मला लघवी होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. नंतर तेही पूर्ववत् झाले. १२ घंट्यांच्या प्रवासात मला पुन्हा औषध घ्यावे लागले नाही.
वरील दोन्ही प्रसंगांत गुरुदेवांनी माझी सर्वतोपरी काळजी घेतली. त्याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला साधनावृद्धी शिबिरातही सहभागी होता आले.
३. या प्रसंगांतून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. शारीरिक त्रास कितीही असला, तरीही श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून सेवेला गेल्यावर काही त्रास होत नाही. उलट सेवेतील उत्साह वाढतो आणि शारीरिक त्रासही न्यून होतो.
आ. संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर कितीही त्रास असला, तरीही तो सामान्य होऊन सहजतेने साधना करता येते.
४. थोड्या प्रमाणात असणारा त्रासही शिबिरात सहभागी झाल्यावर उणावणे
रामनाथी आश्रमातील शिबिरात सहभागी झाल्यावर आरंभी २ – ३ दिवस मला थोड्या प्रमाणात मूत्रपिंडाच्या ठिकाणी वेदना होत होत्या. मी मुंबई येथे असतांना मला प्रत्येकी २ घंट्यांनी काहीतरी खावे लागत होते. अन्यथा मला चक्कर आल्यासारखे होत होते. मी शिबिरात सहभागी झाल्यावर संतांमधील चैतन्यामुळे त्रास न्यून झाल्याचे मला आतून जाणवत होते. शिबिराच्या चौथ्या दिवशी मला सहजतेने वावरता येत होते. त्या दिवशी प्रसाद आणि महाप्रसाद घेण्याच्या वेळेत मला सेवाही करता आली. ‘शिबिरातील चैतन्यामुळे माझा शेष शारीरिक त्रास दूर झाला’, असे मला जाणवले. माझ्या उत्साहात वाढ झाली आणि माझा अधिकाधिक साधना करण्याचा निश्चय झाला.’
– श्री. अरविंद पानसरे, फोंडा, गोवा. (७.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |