डोंबिवली शहराजवळील खाडीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा !
पुलाला धोका निर्माण होऊ शकतो !मोठागाव रेतीबंदर भागात उड्डाण पुलाच्या भागात सतत वाळू उत्खनन केल्याने भविष्यात पुलाला धोका निर्माण होण्याची भीती बांधकाम क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वाळू तस्करांनी कोपर भागात रेल्वे मार्गाला धोका निर्माण होईल, असे उत्खनन केले आहे. कोपर भागातील कांदळवन क्षेत्र वाळू तस्करांनी नष्ट करून या भागाला पावसाळ्यात सर्वाधिक धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. डोंबिवली शहराचा एक भागच वाळू तस्कर नष्ट करत आहेत. त्यांनी खाडी किनारची खारफुटी नष्ट केल्याने त्याचा शेतभूमीवर दुष्परिणाम होऊ शकतो, तसेच येथील अनेक पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. |
डोंबिवली – मोठागाव, कोपर भागात, देवीचा पाडा, मेंग्या बाबा मंदिर येथे दिवस-रात्र अवैध रेती उपसा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. उल्हास खाडीतून तब्बल १० ते १२ सक्शन पंपांच्या साहाय्याने हा उपसा होत आहे. या अवैध प्रकाराकडे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. उपसलेली रेती रात्रीच तात्काळ खाडी किनारी आणून ती डम्परमध्ये टाकून विक्रीसाठी नेली जात आहे.
काही दिवसांपूर्वी सतत कारवाया होत असल्याने हा उपसा नियंत्रित झाला होता. महसूल विभागाकडून रेती माफियांवर नियमित कारवाई चालू असूनही ठराविक भागात मात्र वाळू तस्कर महसूल अधिकार्यांना दाद देत नसल्याचे लक्षात येते.
या तस्करांकडे शस्त्रे असतात. त्यामुळे स्थानिक नागरिक, महसूल अधिकारी या तस्करांना रोखण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, असे लक्षात येते. त्यांच्याविरोधातील तक्रारीकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकासंबंधितांवर कारवाई केव्हा होणार ? |