Macron on Gaza : आतंकवादाशी लढणे, याचा अर्थ गाझाला नष्ट करणे नव्हे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
इस्रायलकडून गाझा पट्टीवर चालू असलेल्या आक्रमणाचे प्रकरण !
पॅरिस (फ्रान्स) – इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष चालू होऊन आता अडीच महिने झाले आहेत. दोघांकडून गाझा पट्टीत युद्ध चालू असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यावर टिपणी केली आहे. ते म्हणाले, ‘‘आतंकवादाचा विरोध करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गाझा पट्टीला नष्ट करणे अथवा नागरिकांना लक्ष्य करणे, अशा विचारांना आपण कुठेही थारा द्यायला नको.’’ इस्रायलची प्रतिक्रिया अयोग्य असून त्याने आक्रमण थांबवले पाहिजे. प्रत्येक जिवाचे मूल्य एकसारखेच असून आपण त्यांचे रक्षण केले पाहिजे.
१. या वेळी मॅक्रॉन यांनी इस्रायलने स्वत:चे रक्षण करण्यासाठी आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या त्याच्या अधिकाराचेही समर्थन केले. ‘असे असले, तरी सामान्य नागरिकांचे संरक्षण झाले पाहिजे आणि मानवाधिकारांकडे पहाता युद्धविराम लागू झाले पाहिजे’, असेही ते म्हणाले.
२. हमासच्या आतंकवाद्यांनी ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या आक्रमणात इस्रायलचे १ सहस्र १५० लोक मारले गेले. या वेळी हमासने २५० हून अधिक इस्रायली आणि अन्य देशांचे नागरिक यांना ओलीस ठेवले. त्यांना अजूनही सोडलेले नाही. दुसरीकडे इस्रायली सैन्याने केलेल्या प्रतिआक्रमणात आतापर्यंत २० सहस्र हून अधिक लोक ठार झाले आहेत.