Justin Trudeau : (म्हणे) ‘गुरपतवंत सिंह पन्नूच्या प्रकरणात अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारत नरमला !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे भारताला खिजवणारे विधान !
ओटावा (कॅनडा) – भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये अचानक पालट होतांना दिसत आहेत. खलिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येसाठी भारत सरकारच्या कर्मचार्यांनी संपर्क साधल्याचा आरोप अमेरिकेने भारतावर केल्यानंतर हा पालट झाला आहे. कदाचित् भारताला हे लक्षात आले आहे की, ते नेहमीच आक्रमक भूमिका घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भारताची सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारत नरमला आहे, अशी टीका कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आतंकवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी वक्तव्य करतांना ‘कुठल्याही घटना अमेरिका-भारत संबंधांवर परिणाम करू शकत नाहीत’, असे म्हटले होते. त्यावरून ट्रुडो यांनी वरील विधान केले.
ट्रुडो पुढे म्हणाले की,
१. पन्नू प्रकरणात अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारतीय यंत्रणा अन्वेषणात सहकार्य करण्यास सिद्ध झाल्या आहेत. आता निज्जर हत्येच्या प्रकरणाच्या अन्वेषणात भारताकडून कॅनडालाही असेच सहकार्य मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे या प्रकरणातील खर्या गुन्हेगारांना शिक्षा होईल. (ट्रुडो यांनी भारतीय दूतावास, हिंदूंची मंदिरे आदींवर आक्रमण करणार्या खलिस्तान्यांना आधी पकडून शिक्षा करून दाखवावी आणि मग निज्जरच्या हत्येविषयी बोलावे ! – संपादक)
२. आम्हाला भारताशीत संघर्ष नको आहे, तसेच संबंधही सुधारायचे आहेत. (संबंध सुधारण्यासाठी तसे वागावेही लागते ! – संपादक) आम्हाला इंडो-पॅसिफिक रणनीती पुढे न्यायची आहे; परंतु लोकांचे अधिकार आणि सुरक्षितता यांसाठी लढणे, हे कॅनडाचे कर्तव्य आहे. (लोकांचे अधिकार आणि भारतविरोधी खलिस्तानी आतंकवाद्यांचे अधिकार यांत भेद आहे. ट्रुडो दोघांना समान मानू शकत नाहीत. खलिस्तान्यांना पाठीशी घालणे, हे जर कॅनडाचे कर्तव्य असेल, तर त्याचे भारताशी कधीही संबंध सुधारले जाणार नाहीत, हे त्यांनी कायमचे लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका‘ट्रुडो यांना भारताला खिजवण्यापेक्षा त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करणार्या खलिस्तान्यांवर कारवाई करावी’, अशा शब्दांत भारताने त्यांना सुनावणे आवश्यक आहे ! |