गोवा : भोम येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झाडांच्या मूल्यांकनाला ग्रामस्थांचा विरोध !
पोलिसांकडून २२ जणांना अटक
फोंडा (गोवा), २० डिसेंबर (वार्ता.) : भोम येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या आड येणार्या झाडांचे मूल्यांकन करण्याच्या सरकारी प्रक्रियेला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. या वेळी विरोध करणार्या २२ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले. या २२ जणांमध्ये महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना कुळे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार २० डिसेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाने भोम येथे चौपदरीकरण करतांना कापल्या जाणार्या झाडांचे मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हेमंत देसाई, साहाय्यक मामलेदार रुचिका बिर्जे आणि पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर उपस्थित होते.
(सौजन्य : prime media goa)
ही प्रक्रिया चालू केल्याचे समजताच भोम येथील ग्रामस्थांनी तिथे धाव घेऊन संबंधित सरकारी अधिकार्यांना खडसावले आणि लोकांचा विरोध असूनही काम चालू करणार्या सरकारचा निषेध केला. शेवटी पोलिसांनी काही जणांना कह्यात घेतले. त्यानंतर विरोध करणार्या काही महिलांनीही स्वतःला अटक करवून घेतली. यामध्ये स्थानिक लोकांसह सरपंच दामोदर नाईक आणि इतर काही पंचांनीही अटक करवून घेतली. या वेळी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सध्या गावात तणावाचे वातावरण आहे. भोम गावातील या चौपदरी महामार्गावरून बराच काळ वाद चालू आहे.