Boycott Sunburn : सनबर्न महोत्सवाचे निरीक्षण करण्यासंबंधी कृतीविषयक नियोजन गोवा सरकार न्यायालयात सादर करणार

‘सनबर्न’ आणि अन्य ‘ईडीएम्’ यांसारखे कार्यक्रम गोव्यातून कायमचे हद्दपार करावेत आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी

पणजी, २० डिसेंबर (वार्ता.) : २८ ते ३० डिसेंबर २०२३ या दिवसांत वागातोर येथे होणार्‍या सनबर्न महोत्सवाचे निरीक्षण करण्यासंबंधी कृतीविषयक नियोजन २१ डिसेंबरला गोवा सरकार उच्च न्यायालयात सादर करणार आहे. सनबर्नच्या विरोधात हणजुणे येथील एका विकलांग मुलाने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली असून या मुलाने केलेल्या सूचना सरकारने त्यांच्या कृतीविषयक नियोजनात विचारात घ्याव्यात, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या कृतीविषयक नियोजनानुसार पोलीस खात्यातील उच्च श्रेणीतील अधिकार्‍यांचा एक विभाग स्थापन करण्यात येणार असून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उपविभागीय जिल्हाधिकारी हे कृतीविषयक नियोजन सिद्ध करतील आणि नियोजनानुसार या महोत्सवाला दिलेल्या अनुज्ञप्ती योग्य आहेत कि नाहीत, हे पडताळून पहाणार आहेत.