गोवा : २८ पोलीस उपअधीक्षकांची थेट भरती रहित करणार !

गोवा सार्वजनिक सेवा आयोगाची उच्च न्यायालयात माहिती

पणजी, २० डिसेंबर (वार्ता.) : सरकारच्या सूचनेनुसार २८ पोलीस उपअधीक्षकांची थेट भरती रहित करणार असल्याची माहिती गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने उच्च न्यायालयात ९ पोलीस निरीक्षकांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला दिली. यापूर्वी राज्य सरकारने ही भरती करण्याची प्रक्रिया रहित करण्याचा आदेश गोवा सार्वजनिक सेवा आयोगाला दिला होता आणि प्रक्रिया रहित करण्यास आयोगाने नकार दिला होता. ‘सरकार उपअधीक्षक पदासाठी आर्युमर्यादा वाढवण्याचा विचार करत असल्याने ही भरती प्रक्रिया रहित करू इच्छित आहे’, असे सरकारने आयोगाला सांगितले होते. गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने नवीन उपअधीक्षकांची निवड करण्यासाठीची प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते.