राममंदिराची उभारणी : कालचक्राचा महिमा आणि त्याचे सामर्थ्य !
‘काळ हा अनंत आहे. त्याच्यासमोर कुणाचेही काही चालत नाही. तो सर्वांत बलवान असून समुद्राला सुद्धा नष्ट करतो. आकाशातील सर्व नक्षत्र अस्तंगत करण्याची क्षमता काळात आहे. तो सिद्धांचा नाश करतो. दानवांना विदीर्ण करतो. अढळ स्थान प्राप्त केलेल्या ध्रुवाचा तो नाश करतो. सर्वांचे प्राण हरण करणार्या यमाचे प्राण हरण करण्याचीही त्याची क्षमता आहे. सर्वांत श्रेष्ठ मानले गेलेले ब्रह्मदेव, विष्णु आणि शंकर या त्रिदेवांना सुद्धा काळाला शरण जावे लागते. त्यांनाही मृत्यू स्वीकारावा लागतो’, अशा आशयाचे वर्णन आपल्याला ‘योगवासिष्ठ’ ग्रंथात ग्रंथित केलेले आढळते. यावरून आपल्याला काळाच्या सामर्थ्याची कल्पना येईल.
१. काळाच्या सत्त्वपरीक्षेला सामोरे गेल्यावर ध्येय साध्य होणे
आपण आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक ग्रंथांचे परिशीलन केले की, आपल्या लक्षात येईल की, काळाने अनेकांना उपद्रव दिला आहे. उपद्रव देतांना त्याने श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव केलेला आढळत नाही. असा हा अत्यंत कठोर असलेला काळ प्रत्येकाची परीक्षा घेऊन त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला अनुकूल ठरतो, ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. थोडक्यात मानवी जीवनात येणार्या संकटांना जो धीरोदात्तपणे तोंड देतो आणि जराही डगमगत नाही, अशा माणसाला तो त्याची सत्त्वपरीक्षा घेऊन मगच अनुकूल ठरतो.
रघुकुल कुळातील भगीरथ यांनाही काळाचे तडाखे सहन करावे लागले. त्यांना कठोर परिश्रम करावे लागले; पण त्यांनी आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याचे जीवन ध्येय निश्चित केले होते, ते प्राप्त होईपर्यंत हार मानली नाही. त्यांच्या त्या प्रयत्नामुळेच स्वर्गातील गंगा नदी भूतलावर अवतीर्ण झाली. तिच्या गतीला आपल्या बळाने संथ करण्याचा प्रयत्न ज्यांच्यामध्ये आहे, अशाच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भगीरथाला तपश्चर्या करावी लागली. या सर्व गोष्टींसाठी बराच काळ लागला. यश प्राप्त करण्यासाठी वाट पहावी लागली; पण भगीरथाने माघार घेतली नाही; म्हणूनच काळाने त्याच्यावर कृपादृष्टी करून त्याला त्याचे ध्येय साध्य करण्यास साहाय्य केले.
२. काळाचे मर्म जाणून प्रयत्न करणार्याचा गौरव होणे
काळ दैववादावर विश्वास ठेवत नाही. ‘काळ मानवाला प्रयत्नवादी बनवण्यासाठी या सर्व गोष्टी करत असतो’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, तसेच काळाच्या तडाख्याने माणूस उन्मत्त होत नाही. ‘माणसाचा उन्नतपणा, अहंकार नष्ट करण्याचे महान कार्य काळ करत असतो’, ही गोष्ट आपण नेमकेपणाने जाणून घेतली पाहिजे. ज्यांना काळाचे महत्त्व कळले आणि त्याचा स्वभाव कळला, त्या माणसांनी आलेल्या संकटांशी सामना केला, आततायीपणा केला नाही, तसेच संकटांना घाबरून किंवा कंटाळून हाती घेतलेले कार्य अर्ध्यावर टाकले नाही. ‘काळाने घेतलेल्या या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो, त्याच्यावर काळ प्रसन्न होऊन त्याच्यासाठी अनुकूल रूप धारण करतो’, हे मर्म ज्याला कळले, त्याने खरा पुरुषार्थ केला; म्हणून त्याचा गौरव केला जातो.
३. काळ कुणाला अनुकूल होतो ?
श्रीकृष्णाचा जन्म झाला तो कारागृहात. त्यासाठी श्रीकृष्णाचे माता-पिता देवकी आणि वसुदेव यांच्यासाठी अनुकूल काळ नव्हता. त्यांना कारावासात काळ कंठावा लागला. जन्माला आलेल्या प्रत्येक अर्भकाचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पहावा लागला. ते दुःख आणि यातना सहन केल्यानंतर भगवंत त्यांच्या पोटी जन्माला आले. ते जन्माला येताच बंधनातून मुक्त होऊन वसुदेव श्रीकृष्णाला गोकुळात सुरक्षित ठिकाणी पोचवू शकले. परत आल्यावर मात्र त्यांना पुनश्च बंधनात अडकून पडावे लागले. भगवंताचा विरह दीड दशक सहन करावा लागला. या अग्नीदिव्यातून गेल्यानंतरच त्यांची सुटका झाली. ही गोष्ट आपल्याला दृष्टी आड करून चालणार नाही.
पांडवांविषयीही तसेच घडले. काळ हा दुष्टांसाठी नेहमीच अनुकूल, तर सज्जनांसाठी प्रतिकूल राहिला आहे. दुष्टांमध्ये मुळातच उपद्रव मूल्य सर्वाधिक असते, तसेच त्यांचे सामर्थ्यसुद्धा अफाट असते. आपल्यात बळ निर्माण करण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न चिकाटीने करावा लागतो. ती चिकाटी सामर्थ्य वाढवत असते. दुष्टांचा संहार करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य प्राप्त होताच काळ अनुकूल होतो आणि दुष्टांवर सहज विजय संपादन करता येतो. त्याचप्रमाणे सामर्थ्य संपन्न असलेला माणूस हा विनयशील असला पाहिजे. जे दुर्बल, प्रामाणिक आणि सर्वसामान्य आहेत, अशा जनतेविषयी ज्याच्या मनात आपुलकी अन् करुणा भाव आहे, त्यांनाच काळ अनुकूल होतो. प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचीही काळाने परीक्षा घेतली. त्यात ते उत्तीर्ण झाले; म्हणून काळ त्यांच्यासाठी अनुकूल राहिला, हे या उभय देवतांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात येते.
४. प्रभु श्रीरामांचा राज्याभिषेक आणि वर्तमानातील त्यांचे मंदिर यांसाठी करावा लागलेला संघर्ष !
बाबराने आपल्या देशावर आक्रमण करून अयोध्यानगरीत असलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर उध्वस्त केले. त्या मंदिराची पुन्हा स्थापना करण्यासाठी आपल्याला ५ शतकांपेक्षाही अधिक काळ संघर्ष करावा लागला, हे आपल्याला ज्ञात आहेच. त्याचे स्मरण करून देतांना भाजपचे प्रवक्ते श्री. सुधांशु त्रिवेदी यांनी काही सूत्रे मांडली आहेत, ती आपण पाहू…
अ. ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी राममंदिराचा शिलान्यास करण्यात आला. तो दिवस होता कार्तिक शुक्ल एकादशीचा ! ही ‘प्रबोधिनी एकादशी’ म्हणून ओळखली जाते. या दिवशी देव जागे होतात.
आ. पहिली कार सेवा चालू झाली, त्या दिवशी गोळीबार करण्यात आला. तो दिवस होता ३० ऑक्टोबर १९९०. त्या दिवशी कार्तिक शुक्ल एकादशीच होती.
इ. ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी न्यायालयाने राममंदिर उभारण्यासाठी अनुमती देणारा निकाल घोषित केला. त्या दिवशी सुद्धा कार्तिक शुक्ल एकादशी होती.
ई. प्रभु श्रीराम जिथे जन्माला आले, तेथील पहिली पूजा महंत दिग्विजय नाथांनी केली. वर्ष १९८६ मध्ये रामजन्मभूमी न्यासाचे पहिले अध्यक्ष होते दिग्विजय नाथांचे शिष्य महंत अवैद्यनाथजी ! वर्ष २०१९ मध्ये शीलान्यास झाला, त्या वेळी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते महंत अवैद्यनाथांचे शिष्य योगी आदित्यनाथ !
असे दाखले दिल्यानंतर श्री. त्रिवेदी पुढे कालचक्राचा महिमा सांगतांना म्हणतात, ‘‘श्रीरामांचा राज्याभिषेक सहजतेने झाला नाही. राज्याभिषेक ज्या दिवशी होणार त्याच दिवशी त्यांना राजवस्त्रे उतरवून यतीवेश धारण करून वनवासात जावे लागले. १४ वर्षांच्या या वनवासात त्यांना महातपस्विनीचा उद्धार करावा लागला. त्यानंतर निषाध राजाचा राज्याभिषेक करावा लागला. एवढ्यावर भागले नाही, तर पुढे सुग्रीव आणि बिभीषण या दोघांचाही राज्याभिषेक श्रीरामांच्या हातून घडला. अख्ख्या जगतावर अन्याय करणार्या अनेक राक्षसांशी युद्ध करून त्यांचे सामर्थ्य त्यांच्यासह नष्ट करावे लागले. रावणासारख्या महाभयंकर राक्षसाशी संघर्ष करून त्याचा पराभव करावा लागला. अशा अनेकानेक संकटांना सामोरे जावे लागले, लढाया कराव्या लागल्या. प्रभु श्रीरामांच्या पत्नीचे अपहरण झाले. एका महापराक्रमी राज्यकर्त्याच्या पत्नीचे अपहरण होते, ही घटना त्या राज्यकर्त्याच्या काळजाला अनंत यातना देणारी असते. ती यातनाही त्यांना सहन करावी लागली. त्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक झाला आहे.’’
‘वर्तमानकाळात काय घडले’, ते सांगताना श्री. सुधांशु त्रिवेदी म्हणतात, ‘‘राममंदिराच्या निर्मितीपूर्वी राष्ट्रपतीपदावर रामनाथ कोविंद आणि त्यांच्या नंतर श्रीमती द्रौपदी मुर्मू या विमुक्त जातीतील पहिली महिला विराजमान झाली.’’ श्रीरामांच्या काळात त्यांना जे करावे लागले, तेच आजच्या काळात आपल्याला करावे लागले, तेव्हा आपल्याला यश प्राप्त झाले, हा काळाचा महिमा आहे.
५. ‘यश येईपर्यंत प्रयत्न करत रहाणे हाच पुरुषार्थ’, हीच काळाची शिकवण !
न्याय प्रस्थापित करण्ो, नैतिकता जतन करण्ो, संस्कृती आणि धर्म अबाधित ठेवण्ो यांसाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. त्यासाठी अनंत यातना सहन कराव्या लागतात. अनेकांना आपल्या प्राणांची आहुती सुद्धा द्यावी लागते. त्याविना संस्कृती, धर्म, न्याय आणि नीती यांचा विजय होऊ शकत नाही. ‘विजय संपादन करण्यासाठी अथक परिश्रम करण्यासह अपयशाचा सामना करावा लागला, तरी प्रयत्न करणे सोडायचे नाही. दैववादावर विसंबून न रहाता पुरुषार्थ करावा लागतो, तेव्हाच प्रतिकूल असलेला काळ आपल्यासाठी अनुकूल होतो’, अशी शिकवण देण्याचे काम सर्वसामर्थ्यवान असलेला काळ करतो, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
तात्पर्य, काळ हा सर्वांत बलवान आणि प्रतिकूल असला, तरी आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही. यश येईपर्यंत प्रयत्न करत रहाणे, हाच पुरुषार्थ आहे. आपल्या संस्कृतीने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी पराकाष्ठेचा संघर्ष करावा लागतो. सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे अर्थार्जन करण्यासाठी सुद्धा अपार श्रम अन् प्रयत्न करावे लागतात. आपल्या शुभ वासना पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्नाला पर्याय नाही, तसेच मोक्षप्राप्तीसाठी साधना, तपश्चर्या, अध्ययन आणि सत्कर्म अशा सर्व प्रकारचे प्रयत्न करावे लागतातच. या प्रयत्नांमुळे माणसात प्रतिकारक क्षमता निर्माण होते. ही प्रतिकारशक्तीच यश प्राप्तीसाठी महत्त्वाची असते.
प्रभु श्रीरामांना राज्याभिषेक होण्याऐवजी वनवास भोगावा लागला, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच काळ प्रतिकूल असल्याचे त्यांना जाणवले. त्या प्रतिकूल काळाला अनुकूल करण्यासाठी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्या संकटांवर मात करावी लागली, तसेच हातून सत्कार्यही करावे लागले. हे सारे केल्यानंतर त्यांच्यासाठी काळ अनुकूल झाला. भगवान श्रीकृष्णांविषयीही तसेच घडलेले आपल्याला दिसते. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे जसे देव आहेत, तसे ते राष्ट्रपुरुष आहेत. ते सत्ताधीश होते. त्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊन न्याय प्रस्थापित केला. म्हणूनच महाभारतात महर्षि व्यास यांनी ‘राजा कालस्य कारणम्’ (राजा हाच काळाला कारणीभूत असतो), असा सिद्धांत मांडला. जो प्रवाहपतीत असतो, त्याच्या हातून कोणताही पुरुषार्थ वा पराक्रम घडत नाही. त्याच्यात प्रतिकारनिष्ठा नसते. त्यामुळे तो काळाच्या तडाख्यात नष्ट होऊन जातो.
६. तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य अबाधित ठेवणे, हे आपले कर्तव्य !
जे जे महापुरुष होऊन गेले, त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला प्रतिकूल काळ होता; पण त्यांनी त्या प्रतिकूल काळाला अनुकूल करून घेतले. ‘योगवासिष्ठ’ या ग्रंथात ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे तिन्ही देव काळाच्या प्रभावामुळे नष्ट होतात’, असे ग्रंथित केले आहे.
अपार कष्टाने प्रतिकूल काळावर मात करून अनुकूल काळ प्रस्थापित करण्याचे काम महापुरुषांनी केलेले असते. हे कार्य त्यांनी ज्या क्षेत्री केलेले असते, ते क्षेत्र ‘पवित्र तीर्थक्षेत्र’ म्हणून ओळखले जाते. अशा तीर्थक्षेत्री जाऊन आपण गैरवर्तन केले, तर अनुकूल असलेला काळ हळूहळू प्रतिकूल होण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखावे लागते. अन्यथा अपार कष्ट घेऊन काळाला अनुकूल करणार्या महापुरुषांच्या प्रयत्नांना तिलांजली दिल्यासारखे होते. हे पाप आपल्या हातून घडू नये; म्हणून ‘सर्व तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य अबाधित ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. ते निष्ठेने प्रयत्नपूर्वक बजावले पाहिजे’, हा बोध आपण यातून घेतला, तरच आपल्या सर्वांचे त्यात कल्याण आहे.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (५.१२.२०२३)