संपादकीय : ‘नाटकी’ खासदार !
संसदेत गदारोळ घालणार्या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी संसदेच्या पायर्यांवर आंदोलन केले. या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. या वेळी धनखड यांचे बोलणे, हसणे आदींची खालच्या पातळीला जाऊन टर उडवण्यात आली. यास उपस्थित खासदारांनी विरोध तर सोडाच, उलट हसून आणि टाळ्या वाजवून ‘जल्लोष’ केला. या सर्वांवर कहर म्हणजे ‘भावी पंतप्रधान’ म्हणून संबोधले जाणारे राहुल गांधी यांनी हा प्रकार रोखण्याऐवजी स्वतः या नकलीचे त्यांच्या भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण केले. ‘देशाला वाट दाखवण्यासाठी आपण ज्यांना निवडून दिले, तेच लोक देशाची कशी ‘वाट’ लावत आहेत ?’, हे सार्या जगाने पाहिले. ‘स्वतःच्या निलंबनाचे काहीही सुवेरसुतक नसलेले हे खासदार जनतेशी किती प्रामाणिक आहेत ?’, हेही या निमित्ताने सर्वांना कळले. शाळेत मस्ती केल्यामुळे वर्गाबाहेर काढलेल्या विद्यार्थ्याच्या चेहर्यावरही गांभीर्य किंवा खंत असते; पण हे खासदार त्यांचे निलंबन जणू ‘एन्जॉय’ करत होते. याचे मूळ कारण निलंबनाच्या पुढे कारवाई करण्याची आपल्या व्यवस्थेत तरतूदच नाही. हे निलंबन केवळ काही दिवसांपुरतेच असते. पुढच्या अधिवेशनाला पुन्हा हेच खासदार गदारोळ घालायला मोकळे असतात; म्हणून गेल्या ७५ वर्षांत खासदारांच्या गदारोळाची समस्या सुटू शकलेली नाही. दुसरे म्हणजे ज्यांची नक्कल केली गेली, ते देशाचे उपराष्ट्रपती आहेत. ‘त्यांचाही मान न राखणारे विरोधी पक्ष सर्वसामान्य जनतेला काय किंमत देत असतील ?’, याचा विचारच न केलेला बरा. याच आंदोलनात हेच खासदार ‘मोदी सरकारने आम्हाला निलंबित करून लोकशाहीची हत्या केली आहे’, अशी ओरड करत होते. मग ‘लोकशाहीने दिलेल्या उच्चपदावरील व्यक्तीची टर उडवणे, ही लोकशाहीची हत्या नव्हती का ?’, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ‘अशांची सदस्यताच संपुष्टात आणली पाहिजे’, असे मत जनतेकडून व्यक्त होते; परंतु अशांना सदस्यताच मिळू न देण्याचे दायित्व आणि खबरदारी जनतेने घेतली पाहिजे. हेच या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण ठरेल !