संपादकीय : निर्नायकी ‘इंडिया’ !
काँग्रेससह देशातील २८ विरोधी पक्षांची एकत्रित आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची चौथी बैठक देहलीत पार पडली. यापूर्वी या आघाडीच्या पाटलीपुत्र, मुंबई आणि बेंगळुरू येथे झालेल्या ३ बैठकांप्रमाणे याही बैठकीची फलनिष्पत्ती अपेक्षेप्रमाणे शून्य होती. मुळात केवळ मोदीद्वेषावर आधारलेल्या या आघाडीला स्वतःची अशी काहीच ध्येयधोरणे नाहीत. प्रत्येक बैठकीत केवळ एकत्र येणे, जेवणावळी झोडणे आणि निघून जाणे, एवढेच होते. नुकत्याच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत या आघाडीच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतरची ही पहिली बैठक होती. त्यामुळे तिला विशेष महत्त्व होते; परंतु अपेक्षेप्रमाणे या बैठकीत या पराभवाचे कुठलेही चिंतन झाले नाही. यामागचे कारण म्हणजे या आघाडीच्या दृष्टीने हा पराभव केवळ काँग्रेस पक्षाचा होता, इंडिया आघाडीशी त्याचा संबंध नव्हता. तथापि समजा जर या ३ राज्यांमध्ये काँग्रेस जिंकली असती, तर ‘याचे संपूर्ण श्रेय ‘इंडिया’ आघाडीने केवळ काँग्रेसला दिले असते का ?’, याचे उत्तर निश्चितच ‘नाही’ असे आहे. हा विजय ‘इंडिया’ आघाडीने स्वतःचा म्हणून जोरदार साजरा केला असता. ‘सुख के सब साथी, दुख में न कोई’ म्हणतात ते हेच ! लोकसभेच्या निवडणुका अवघ्या ३-४ मासांवर येऊन ठेपल्या आहेत. तरीही ‘इंडिया’ आघाडीचा नायक, म्हणजेच पंतप्रधानपदाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. या पदासाठी ‘इंडिया’ आघाडीचे प्रणेते तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी असे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून रांगेत उभे आहेत. त्यामुळे या पदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची शिफारस करून आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे या पदाचे प्रबळ दावेदार असलेले नितीश कुमार यांना हे अजिबात रुचले नाही. याविषयी त्यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. त्यांची वकिली त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव यांनी केल्याचे समजते ! काही वेळाने यादव आणि नितीश कुमार बैठक सोडून निघून गेल्याचे सांगण्यात आले. थोडक्यात याही बैठकीत जेवणावळी झोडण्याविना दुसरे काहीही झालेले नाही आणि ‘इंडिया’ आघाडी पुन्हा एकदा निर्नायकीच राहिली ! वास्तविक या बैठकीत ३ राज्यांत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करणे अपेक्षित होते. ‘आघाडी कुठे न्यून पडली ?’, ‘यापुढे तरी ती सरकारच्या वरचढ कशी ठरेल ?, ‘त्यासाठी व्यूहरचना कशी असावी ?’ आदींवर मंथन व्हायला हवे होते, जे झाले नाही. ज्या आघाडीचा जन्मच द्वेषातून झाला आहे, तिच्याकडून अशी अपेक्षा तरी कशी करणार ? खरे म्हणजे ३ राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन सनातन धर्माला केलेला विरोध, हे या आघाडीच्या पराभवामागचे मूळ कारण आहे. या विरोधामुळे हिंदूंची या आघाडीप्रती प्रचंड अप्रसन्नता निर्माण झाली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले; परंतु आघाडीतील नेते हे कधीही मान्य करणार नाहीत. थोडक्यात या बैठकीत ना पराभवाचे चिंतन झाले, ना आघाडीचा नेता ठरला. जी आघाडी स्वतःचा नेता ठरवू शकत नाही, ती १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ? उमेदवार नव्हे, तर केवळ दावेदार असणार्या अशा हिंदुद्वेषी आघाडीचा भविष्यात ३ नव्हे, तर ३०० जागांवर पराभव झाला, तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही !
स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ? |