कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांचे घोटाळे मुख्यमंत्र्यांकडून उघड !
एकाच आस्थापनाला २७० कोटी रुपयांची ५७ कामे देण्यात आली !
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेची २७० कोटी रुपयांची तब्बल ५७ कामे रोमिन छेडा यांना देण्यात आली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेच्या उत्तराच्या वेळी दिली.
मुंबईतील जिजामाता उद्यानामधील ‘पेंग्विन’साठीच्या व्यवस्थेचे काम उत्तरप्रदेशमधील रस्त्यांचे बांधकाम करणार्या आस्थापनाला देण्यात आले. या आस्थापनाने हे काम बोरीवली येथे कपड्यांचे दुकान असलेल्या रोमिन छेडा नावाच्या व्यक्तीला दिले. या कामानंतर कोरोनाच्या काळात ‘ऑक्सिजन प्लांट’चे ६० कोटी रुपयांचे काम रस्त्यांचे बांधकाम करणार्या त्याच आस्थापनाला देण्यात आले. हे कामही या आस्थापनाकडून रोमिन छेडा याला देण्यात आले. या कामातील २ टक्के रक्कम रस्ते बांधकाम करणार्या आस्थापनाच्या खात्यात, तर उर्वरित ९८ टक्के रक्कम रोमिन छेडा याच्या खात्यात जमा झाली. हे काम जुलै २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते. प्रत्यक्षात ऑक्टोबर २०२० मध्ये हे काम झाले; मात्र बनावट कागदपत्रे करून हे काम ऑगस्ट २०२० मध्ये झाल्याचे दाखवण्यात आले आणि केवळ ३ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. प्रत्यक्षात दंड ९ कोटी रुपये इतका घेणे अपेक्षित होते. यानंतर रोमिन छेडा यालाच प्रशासकीय कार्यालयांचे बांधकाम, पेग्विंग कक्षाची दुरुस्ती, पेग्विंनला मासे पुरवणे आदी विविध ८० कोटी रुपयांची कामे देण्यात आली. हा पैसा कुणाच्या खिशात गेला, हे चौकशीत उघड होईल.
बोगस रुग्ण आणि डॉक्टर दाखवून पैसे लाटले !
कोरोना महामारीच्या काळात ‘लाईफ लाईन’ या सुजित पाटकर यांच्या रुग्णालयामध्ये काल्पनिक रुग्ण आणि डॉक्टर दाखवून त्यांच्या नावाने वेतन लाटण्यात आले. त्यांचा औषधांचा व्ययही घेण्यात आला. ऑक्सिजन प्लांटमध्ये गंजलेले पाईप वापरण्यात आले. त्यामुळे काही रुग्णांना ‘ब्लॅक फंगर’चा त्रास झाला, तर काही रुग्णांचे डोळे गेले; परंतु यातून पैसे कमवणार्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
खिचडी घोटाळा उघड !
कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिका प्रशासनाकडून कामगार आणि गरीब नागरिकांना ३३ रुपयांमध्ये ३०० ग्रॅम खिचडी देण्याचे कंत्राट दिले. हे कंत्राट मूळ कंत्राटदाराने अन्य ठेकेदाराला दिले. ते देतांना १६ रुपयांत १०० ग्रॅम खिचडी देण्याचा ठेका दिला. हा घोटाळा उघड झाला आहे. खिचडी करण्यासाठी गोरेगाव येथील ‘परशियन दरबार’ हे हॉटेल दाखवण्यात आले; मात्र या हॉटेलच्या मालकाने खिचडी देण्याच्या ठेक्याशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. हा पैसा कुणाच्या खिशात गेला ? हे चौकशीत उघड होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
दुप्पट किमतीमध्ये ‘रेमडेसीवीर’ औषधाची विक्री !
कोरोनाच्या काळात महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात काम करणार्या राठोड नावाच्या व्यक्तीला भायखळा येथील महापौर बंगल्यामध्ये बोलावून त्यांना पोला हायड्र्रोलॅब या आस्थापनाला रेमडेसीवीर औषधांचा पुरवठा करण्याचे काम देण्यात आले. प्रतिनग ६५० रुपयांप्रमाणे ४० सहस्र रेमडेसीवीर औषधांचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले; मात्र ३१ सहस्र औषधांचा पुरवठा झाल्यावर याच आस्थापनाला २ लाख ‘रेमडेसीवीर’ औषधाचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले; मात्र या वेळी प्रतिनगासाठी १ सहस्र ५६८ रुपये देण्यात आले. याच काळात नवी मुंबई, भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका यांनी ६५० रुपयांत हे औषध खरेदी केले. याच औषधासाठी १ सहस्र ५६८ रुपये दिल्याने महानगरपालिकेच्या ६ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिका :लोकप्रतिनिधींची घोटाळे करण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी संबंधितांना त्वरित आणि कठोर शिक्षा हवी ! |