वाराणसी येथील ‘ज्ञानवापी’विषयीच्या इतिहासावर आधारित पुस्तक लवकरच ! – विक्रम संपत, प्रसिद्ध लेखक
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे येथील पुस्तक महोत्सव !
पुणे – वाराणसी येथील ‘ज्ञानवापी’विषयीच्या इतिहासावर आधारित पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यासाठी अनेक कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. इतिहासाचा अभ्यास मी दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळीही केला नव्हता. फेब्रुवारीमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी दिली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज-गैरसमज’ या विषयावर संपत बोलत होते. अमित परांजपे यांनी संपत यांच्याशी संवाद साधला. महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलताना संपत म्हणाले की,
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वापर राजकीय पक्षांनी केवळ स्वत:च्या लाभासाठी केला. पक्षांनी निवडणुकीत, जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनेक आश्वासने दिली; मात्र आश्वासनांच्या पूर्ततेविषयी तत्परतेने काम केले नाही.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी महाराष्ट्राबाहेरील लोकांना माहिती नाही. सावरकरांवर सखोल पुस्तक नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस्.ई.) पुस्तकांत माहिती नाही. आपल्या इतिहासात ठराविक लोकांनाच स्थान दिले असून, इतरांना डावलल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा इतिहास माहिती नसतांनाही काही लोक त्यांच्यावर टीका करतात. सावरकर यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा विरोध करा; मात्र त्यापूर्वी त्यांच्याविषयीचे तथ्य जाणून घेतले पाहिजे.
४. नोटेवर कधीपर्यंत एकाच व्यक्तीचे छायाचित्र रहाणार हे माहीत नाही; पण स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा थोर महापुरुषांचे छायाचित्र नोटेवर कधी येणार ? याची प्रतीक्षा आहे.