कला ईश्वरप्राप्तीसाठी असून अंतर्मुख राहून कलेचे सादरीकरण केल्यास त्यातून ईश्वराची अनुभूती येऊन आंतरिक आनंद मिळू शकणे
‘एकदा मी सांगली येथे एका कलाकाराचा सतारवादनाचा कार्यक्रम पहाण्यासाठी गेलो होतो. तो कलाकार आणि त्याला तबल्यावर साथ देणारा कलाकार या दोघांचेही एकूण वागणे आणि वेषभूषा चांगली नव्हती. त्यांचे वादनही अंतर्मनात जात नव्हते. त्यामुळे मी कार्यक्रमातून मध्येच उठून घरी निघून गेलो. कलाकारांचे हे वागणे पाहून माझ्या मनात कलाकारांच्या दुःस्थितीविषयी आलेले विचार येथे दिले आहेत.
१. कलाकारांची असात्त्विक वेशभूषा, वागणे इत्यादी पहातांना ‘कार्यक्रम न ऐकता उठून जावे’, असे वाटणे
मी सांगली येथे सतारवादनाचा कार्यक्रम पहाण्यासाठी गेलो होतो. तो सतारवादक कलाकार आणि त्याला तबल्यावर साथ देणारा कलाकार या दोघांच्याही तोंडात गुटखा अन् पान असल्याने त्यांच्याकडे पहातांना चांगले वाटत नव्हते. या दोन्ही कलाकारांचे केस मानेच्या खालपर्यंत होते. दोघांनीही पूर्ण काळा पोषाख परिधान केला होता. त्यांचा हा पूर्ण काळा पाेषाख आणि गुटखा अन् पान-सुपारी खाणे यांकडे बघवत नव्हते. कार्यक्रम चालू होण्याच्या वेळी ते दोघे कलाकार व्यासपिठावर आले, तेव्हा त्यांच्याकडे पहातांना ‘पुढचा कार्यक्रम न ऐकता उठून जावे’, असे मला वाटले.
२. कलाकारांचे सर्व लक्ष ‘स्वतः किती निपुण आहे’, हे दाखवण्याकडे अधिक असणे
त्या कलाकारांची ‘मी या कलेत किती पारंगत आहे’, हे प्रेक्षकांना दाखवण्याची पद्धत, कारण नसतांना मानेला झटका देऊन केस उडवणे, इत्यादींमुळे दोन्ही कलाकार अव्वल दर्जाचे असूनही वादनात ते स्वतःही तल्लीन होत नव्हते आणि रसिकांनाही मंत्रमुग्ध करू शकत नव्हते. त्यामुळे काही वेळाने मी कार्यक्रम सोडून घरी परतलो.
३. कलेने अंतर्मुख होणे आवश्यक असतांना बाह्य गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे बहिर्मुखता येणे
बरेच कलाकार ‘अनावश्यक हातवारे करणे, विविध अंगविक्षेप करणे’, अशा कृती करतात. अशा बाह्य गोष्टींना महत्त्व दिले जाण्यामुळे कलाकार बहिर्मुख होतो. कला ही व्यक्तीला अंतर्मुख करणारी असूनही कलाकाराने अशा बाह्य गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे कलाकाराची बहिर्मुखता वाढते.
४. अंतरातील भगवंताला अनुभवण्यासाठी अंतर्मुख होणेच आवश्यक असणे
कलेचा मुख्य उद्देश ‘कलेतून देवाला आळवणे किंवा देवाचे अस्तित्व अनुभवणे’, हा आहे. पोषाख, केशरचना, अनावश्यक हातवारे इत्यादी बाह्य गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे देवाला अनुभवता येणार नाही. बाह्य रूपाने कला किंवा संगीत यांद्वारे कधीही अंतरातील भगवंताला अनुभवता येणार नाही. जो कलाकार स्वतः ईश्वराचे अस्तित्व अनुभवू शकत नाही, तो श्रोत्यांना ईश्वराची अनुभूती, म्हणजेच आनंदाचा अनुभव कसा देणार ?
५. बाह्य देखाव्याने वरवरचे सुख मिळणे; पण आंतरिक आनंद मिळू न शकणे
कलाकारांच्या कलेतील निपुणतेच्या समवेतच त्यांची वेशभूषा, बोलणे आणि रहाणीमान यांचा परिणाम त्यांची कला अन् श्रोतृवर्ग यांवर होतो. कलाकाराने बाह्य गोष्टींकडेच लक्ष दिले, तर त्याने कला प्रस्तुत केल्यावर श्रोतृवर्गालाही वरवरचे श्रवणसुख मिळते; मात्र असे बहिर्मुख संगीत देवापर्यंत पोचत नाही; कारण जिथे बहिर्मुखता आहे, तिथे देव वास करत नाही. कलाकार निर्मळ, सहजभावात असलेला आणि साधना करणारा असेल, तरच तो त्याची कला किंवा संगीत यांतून देवाला अनुभवू शकतो.
६. कलेतील निपुणतेच्या समवेतच कलाकार सात्त्विक असणे, दिसणे आणि त्याची साधना असणे आवश्यक असणे
कलाकर जेवढा साधा, सहजभावात असेल, तेवढी त्याची कला अंतर्मनातून प्रकट होईल. संगीत, म्हणजे ‘नादब्रह्म’ ! जिथे बाह्य गोष्टी संपतात, तिथूनच खरे संगीत चालू होते आणि तेव्हाच नादब्रह्माची अनुभूती येते. हे खरे अंतरातील संगीत असते. अशा संगीताला बाह्य रूप किंवा वेश यांची आवश्यकताच नसते. संत हरिदास किंवा संत मीराबाई आदी संतांची उदाहरणे आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत. त्यांचे गाणे केवळ देवासाठीच होते. त्यांनी ना कधी वेशभूषेकडे लक्ष दिले, ना कधी केशरचनेकडे, तरीही त्यांचे संगीत देवापर्यंत आणि लोकांपर्यंतही पोचले.
७. कलेतून ईश्वराची अनुभूती घेऊन जिवाचा उद्धार करून घेता येणे
कला हे कलाकाराला मिळालेले वरदान असून तो देवाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. ‘कला ही कलाकराच्या उद्धारासाठी आहे’, हे लक्षात घेऊन कलासाधना किंवा संगीतसाधना केल्यास, कलाकाराने त्याची कला मनोभावे देवाचरणी अर्पण केल्यास त्याचा उद्धार होणारच आहे.
‘कलाकारांनो, बाह्य गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा अंतर्मुखता साधून संगीतसाधना करा. संगीत किंवा कला यांतून ईश्वराला अनुभवा. ‘कलेला साधनेची जोड दिल्यास देव दूर नाही’, हेच त्रिवार सत्य आहे.’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सतारवादक आणि वाद्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१२.११.२०२३)