समृद्धी महामार्गांवरील अपघात अल्प होण्यासाठी वाहतुकीसंबंधी उपाययोजानंवर भर देणार ! – शंभूराजे देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – समृद्धी महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी परिवहन महामंडळाकडून ८ पथके, तर पोलीस आयुक्तालयांकडून १४ पथके सिद्ध केली आहेत. ४ सहस्र वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे. तसेच टोलनाक्यांवर टायर तपासणी, वाहनतळ नसूनही उभी केलेली (‘नो पार्किंग’मध्ये असलेली), ‘रिफ्लेक्टर’ नसलेली वाहने, ‘लेन कटींग’ करणारी (आखून दिलेला मार्ग पालणारी), तसेच अधिक वेगाने धावणारी वाहने यांची तपासणी केली जाते, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. ‘समृद्धी महामार्गांवरील अपघातां’विषयी आमदार अनिल परब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
देसाई म्हणाले की, वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे ५१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी झालेल्या अपघातांतील दोषी परिवहन विभागाच्या २ अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याविषयी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याचे अन्वेषण करून समयमर्यादेत आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल.
अनिल परब यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देतांना देसाई म्हणाले की, आपण सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा अपघातस्थळाचे सीसीटीव्ही छायाचित्रण पाहू. अपघातग्रस्त वाहनांची पडताळणी, प्रवासी संख्येची अनुमती आणि इतर आवश्यक नियमांचे पालन केले कि नाही याचे पुन्हा नव्याने अन्वेषण करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकार्यांना देऊ.